fbpx

World Wildlife Day: जागतिक वन्य जीव दिवस ३ मार्च

World Wildlife Day

World Wildlife Day: बालवयापासून इसापनीती, चांदोबा, पंचतंत्र, चंपक यासारख्या बाल कथांच्या मासिकातून, पुस्तकातून आपल्या प्राण्यांची ओळख होते,मनोमन दोस्ती होते,त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होते. गोष्टीत भेटणाऱ्या या वन्य जीवांचे वेगवेगळे स्वभाव कथेत मांडले जातात… शुर, वीर, मायाळू, घाबरट असे प्राणी गोष्टीत फार गमतीदार वाटतात…त्यांच्यामुळे आपले बालपण फार रंगतदार होते.असे हे प्राणी, पृथ्वीतलावरील सर्व सजीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Wolrd Wildlife Day: का साजरा केला जातो?

वन्यजीव म्हणजे  जंगलात राहणारे जीव- प्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी, वृक्ष आणि एकूणच सर्व जीवमात्र. वन्य जीवांचे हे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी  ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ (World Wildlife Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन, त्यांचे अन्नसाखळीतील महत्त्व, या विषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

2013 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिवेशनात, ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day) म्हणून घोषित केला गेला.  दिनांक ३ मार्च १९७३ रोजी तब्बल  १८० देशांनी नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा मान्य केला म्हणून या दिवसाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या दिवसाच्या निमित्ताने वन्यजीवांच्या निवार्याचे, त्यांच्या रक्षणाचे, त्यांना असणारे धोके समजून घेण्याचे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.

हे ही वाचा: आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर

World Wildlife Day: 2022 ची थीम

यंदाच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये, या दिवसाची थीम आहे ‘पर्यावरण प्रणाली पुनर्संचयित करण्यासाठी मुख्य प्रजाती पुनर्प्राप्त करणे. ‘ 

अस्तित्वाच्या दृष्टीने आपल्या पर्यावरणातील वनस्पती आणि जीवजंतूंच्या  धोक्यात आलेल्या प्रजातींबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कार्यक्षम उपाय तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे यंदाच्या थीम चे मुख्य उद्दिष्ट आहे.

भारतीय वन्यजीव मंडळाने 1952 मध्ये संपूर्ण भारतातील वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडली होती. सुरुवातीला, वन्यजीव दिन 1955 मध्ये साजरा करण्यात आला, परंतु 1957 मध्ये तो वन्यजीव सप्ताह म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आला.