fbpx

विमानतळावरील चेक इनच्या रांगेतून होणार प्रवाशांची सुटका

वाराणसी आणि बेंगळुरू विमानतळावर ‘डिजी यात्रा सुविधा’ (Digi Yatra) सुरु करण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या पाच विमानतळांवर ही सुविधा आणण्यात येणार आहे.

भारतातल्या निवडक विमानतळावर आता प्रवाशांना एक चांगली सुविधा मिळणार आहे.  १५ ऑगस्ट २०२२ पासून वाराणसी आणि बंगळुरू या देशातील दोन विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मते या डिजी यात्रेमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.  चेक इन मध्ये जाणारा त्यांचा वेळ वाचणार आहे.

डिजी यात्रा म्हणजे काय?

विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ‘डिजी यात्रा’ सुविधेबाबत माहिती दिली आहे. डिजी यात्रा हा मोबाईल वॉलेट आधारित ओळख प्लॅटफॉर्म आहे जो  प्रवाशाच्या तपशीलाची पडताळणी करण्यात मदत करेल. डिजी यात्रेद्वारे विमानतळांवर फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे प्रवाशांची तपासणी केली जाईल. याद्वारे प्रवाशांची डिजीटल ओळख होईल आणि चेक इनची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.

डिजी यात्रेसाठी मोबाईलवरून नोंदणी

विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवाशांना मोबाईलद्वारेही डिजी यात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे. मोबाइल विमानतळावर स्थापित डिजी यात्रा क्यूआर कोड स्कॅन करेल, त्यानंतर संबंधित अनुप्रयोग मोबाइलवर अपलोड केला जाईल. प्रवाशांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर इत्यादींचा तपशील भरावा लागेल. त्यानंतर डिजी मशिनमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्याने प्रवाशाचा चेहरा स्कॅन केल्यानंतर गेट उघडेल. एकदा डिजी यात्रेची नोंदणी झाल्यानंतर, प्रवासी कोणत्याही डिजी यात्रेने सुसज्ज विमानतळावरून प्रवास करताना त्यांचे चेहरे स्कॅन करून प्रवेश करू शकतील.

प्रवाशांना काय फायदा होणार?

पूर्वी चेक इनसाठी प्रवाशांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागायचे. मात्र, ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना चेक इन करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.  ही प्रक्रिया खूपच अल्पदरात काम करेल आणि प्रवाशांना त्यांचे वैयक्तिक तपशील जतन करण्यासही  मदत करेल. डिजी यात्रा फाउंडेशन (DYF) अंतर्गत सर्व प्रवाशांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आणि विमानतळ चेक-इन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘डिजी यात्रेची मदत होणार आहे.

डिजी यात्रा सेवा नेमकी कुठल्या शहरांत?

डिजी यात्रेच्या माध्यमातून प्रवाशाच्या बोर्डिंग पासशी संबंधित माहिती डिजीटल स्कॅन केली जाणार आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि कॉन्टॅक्टलेस होईल. ही नवी सुविधा प्रथम बंगळुरू आणि वाराणसी विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे. यानंतर ही सुविधा देशातील इतर विमानतळांवरही वेगळ्या टप्प्यात लागू करण्यात येणार आहे.

या विमानतळांवरही उपलब्ध होणार

बंगळुरू आणि वाराणसी विमानतळांव्यतिरिक्त आणखी ५ विमानतळांवर ‘डिजी यात्रा’ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळामध्ये पुणे, विजयवाडा, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबादच्या विमानतळांचा समावेश आहे. मार्च २०२३ पासून या सर्व विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा सुरू होणार आहे.