fbpx

राष्ट्रीय गणित दिवस : 22 डिसेंबर

आपल्या संपूर्ण शालेय जीवनाच्या अभ्यासात, सर्वात महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित. फक्त उच्च शिक्षणाच्या दृष्टीनेच नाही तर रोजच्या दैनंदिन व्यवहारीक आयुष्यात देखील अविभाज्य घटक असलेला विषय म्हणजे गणित! 

असं खूप कमी वेळा होतं की एखाद्याला विचारावं तुझा आवडता विषय कोणता आणि त्याने सांगावं की ‘ गणित ‘ …कारण इतर गद्य विषयांच्या तुलनेने गणिताचा अभ्यास करणे, सूत्र पाठ करणे , ताळाबेरिज करणे, अपेक्षित अचूकता हे सर्व लहान वयातील मेंदूला थोडे क्लिष्ट वाटते. परंतु जर वेळीच गणिताची गोडी निर्माण झाली तर पुढे मेडिकल, इंजिनिअरिंग अशा कोणत्याही क्षेत्रातील उच्च शिक्षण घेताना, त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना कठीण जात नाही.

तर आज ह्या विषयाचा आवर्जून उल्लेख करण्याचें कारण म्हणजे आज आहे राष्ट्रीय गणित दिवस! त्या अनुषंगाने आजच्या ह्या दिवसाचा  इतिहास, महत्त्व जाणून घेण्या विषयी हा लेख!

गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती

ज्यांच्या स्मरणाने हा दिवस गणित दिवस म्हणून ओळखला जातो त्या गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी आणि त्यांच्या  योगदानाविषयी माहिती नवीन पिढीला होणे गरजेचे आहे. 

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 डिसेंबर 2012 रोजी, चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात घोषणा केली की, दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. 

दरवर्षी 22 डिसेंबर रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्या मागचा मुख्य उद्देश आजच्या काळात गणिताचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविणे हा आहे.  भारतात विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध स्पर्धा, गणितीय उपक्रम आणि गणितीय प्रश्नमंजुषा आयोजित केल्या जातात ज्यात  देशभरातील गणितातील हुशार  विद्यार्थी सहभागी होतात.

श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी…

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी कोइम्बतूरच्या इरोड गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. 

लहानपणी रामानुजन इतर सामान्य मुलासारखेच होते. त्यांना वयाच्या तीन वर्षांपर्यंत होईपर्यंत बोलताही येत नव्हते. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने प्राथमिक परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘ए सिनोप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्योर अँड एप्लाइड मॅथेमॅटिक्स’ नावाचे एक पुस्तक त्यांनी पूर्ण वाचून काढले. या पुस्तकात हजारो प्रमेये आहेत. ज्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला.पुढे मग  त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली.

१९११ मध्ये त्यांचा जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये १७ पानांचा एक पेपर प्रकाशित झाला. १९१२ मध्ये रामानुजन यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण तोपर्यंत त्यांना एक हुशार गणितज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती.

पहिले महायुद्ध सुरु होण्याच्या काही महिन्यापूर्वी रामानुजन ट्रिनिटी कॉलेजमध्ये आले. 1916 मध्ये त्यांनी बॅचलर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. 1917 साली ते लंडन मॅथेमॅटिकल सोसाईटीसाठी निवडले गेले. पुढील वर्षी त्यांना एलीप्टिक फंक्शन आणि संख्या सिद्धांतावरील संशोधनासाठी रॉयल सोसाईटीचा फेलो म्हणून निवडण्यात आले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवडण्यात आलेले पहिले भारतीय ठरले. 

रामानुजन यांनी तेथे 20 रिसर्च पेपर पब्लिश केले. 1918 साली त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा सदस्य बनवण्यात आलं. भारत पारतंत्र्यात असताना रामानुजन यांची सोसायटीचा सदस्य म्हणून निवड होणे ही खरंच मोठी बातमी होती.  रॉयल सोसायटीच्या इतिहासात रामानुजन यांच्या इतक्या कमी वयाचा कोणीही आजवर सदस्य झाला नव्हता. 

रामानुजन यांना ब्रिटनचे  वातावरण सहन न होऊन 1917 मध्ये त्यांना टीबी झाला. 1919 मध्ये त्यांनी प्रकृती फारच बिघडली. त्यामुळे ते भारतात परत आले. 26 एप्रिल 1920 साली वयाच्या 32 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजारी असतानाही त्यांनी आपलं गणितासंबंधी काम कधी सोडलं नाही. 

रामानुजनची नोट बुक

रामानुजन यांनी अनेक प्रमेय तयार केली आहेत, ज्यातील अनेक अजूनही सुटू शकलेली नाहीत. त्यांचे एक रजिस्टर 1976 मध्ये ट्रिनीटी कॉलेजमध्ये मिळाले होते, ज्यात अनेक थेरम आणि फॉर्म्युले आहेत. या रजिस्टरला ‘रामानुजनची नोट बुक’ असं म्हटलं जातं. यातील अनेक थेरम सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. 

जीवनावर आधारित चित्रपट

 रामानुजन यांची बायोग्राफी ‘द मॅन हू न्‍यू इंफिनिटी’ 1991 साली पब्लिश झाली होती. 2015 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘The Man Who Knew Infinity’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता देव पटेल यांने रामानुजन यांचे पात्र साकारले आहे. 

रामानुजन आजच्या ह्या नवीन अद्ययावत साधनांच्या, तंत्रज्ञानाच्या काळातही केवळ भारतीयच नाही तर परदेशी गणित तज्ज्ञांसाठी प्रेरणास्तोत आहेत ही खरोखरच  भारतीयांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.

आणि म्हणूनच, गणितज्ञ रामानुजन यांना आजच्या या स्मरण दिनी शतशः नमन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *