fbpx

School Connect: ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी नवीन शैक्षणिक धोरण संपर्क अभियान

School Connect Conference on New Education Policy

नवीन शैक्षणिक धोरण संपर्क अभियान: ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळ संचलित जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यासंबंधीचे संपर्क अभियान स्कूल कनेक्ट हे आयोजित करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातर्फे मुंबई व कोकण परिसरातील सर्व जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व उपप्राचार्यांसाठी हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या संपर्क अभियानाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी या कार्यक्रमाचे व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दलचे प्रास्ताविक सादर केले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर कविता लघाटे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याबद्दल थोडक्यात दिशादर्शन केले. यावेळी बोलताना डॉक्टर अजय भामरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या, तर डॉक्टर कविता लघाटे यांनी विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक धोरणाचा कसा लाभ घेता येईल याबद्दल विवेचन केले.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल माहिती

कोकण विभागाचे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल माहिती दिली. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांमधील व भारतीय शिक्षण पद्धतीतील बलस्थानांबद्दल बोलताना सर्वांगीण प्रगतीच्या बाबतीत भारत हा जगातील इतर देशांना सहजपणे मागे टाकू शकतो असे प्रतिपादन केले, तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील एकूणच सर्व तरतुदींची व होणाऱ्या नवीन बदलांची विस्तृतपणे माहिती उपस्थितांना दिली.

महाराष्ट्रात जून 2024 पासून लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण

विशेषतः जून 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन करावे व सर्वांनी मिळून एकत्रपणे यशस्वीपणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून 2024 पासून केली जावी असे मत मांडले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मेजर मायनर विषय तसेच इतर कौशल्य आधारित विषय आंतरविद्याशाखीय पर्याय पद्धत अशा विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी उपस्थित प्राचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कुलगुरूंनी उत्तरे दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 माहितीपत्रकाचे वाटप

विद्यापीठातर्फे सर्व उपस्थित प्राचार्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यासंबंधीच्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी – बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीतील सदस्य डॉ. सुचित्रा नाईक यांनी केले. या कार्यशाळेला मुंबई विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्य गीत व विद्यापीठ गीताने झाली, तर समारोप वंदेमातरम गीताने झाला .या कार्यशाळेला वरिष्ठ महाविद्यालयातील 155 प्राचार्य तर कनिष्ठ महाविद्यालयातील 315 प्राचार्य व उपप्राचार्य उपस्थित होते.