fbpx

World Poetry Day: जागतिक काव्य दिन 21 मार्च

World Poetry Day

World Poetry Day: कविता हे सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचे एक अनमोल स्वरूप! लहान असल्यापासूनच बालगीते, बडबड गीते, अंगाई गीते ऐकतानाच आपली आणि कवितेची गट्टी होते. मग पुढे भावगीते, शौर्य गीते, भक्तिगीते, भूपाळी अशा अनेक काव्य प्रकारातून आपण काव्य या लेखन प्रकाराला आपल्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व देतो!

प्रेम, दुःख, विलाप, विद्रोह अशा विविध मानवी भावना शब्दात  प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते.

एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले होते की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण काव्य हा प्रकार प्रत्येकाच्या मनाला भावणे हे गरजेचे असते.

विलियम वार्डस्वर्थ  ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feelings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता. याच कवितेला मान देणारा असा आजचा हा ‘ जागतिक काव्य दिवस ‘ (World Poetry Day).

हे ही वाचा: मकर संक्रांत १४ जानेवारी

World Poetry Day: कधी पासून साजरा होतोय

सर्व रसिकांना, श्रोत्यांना दर्जेदार आणि अजरामर कवितांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या सर्व कवींना गौरवणारा असा हा जागतिक काव्य दिवस (World Poetry Day) २१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो. जागतिक काव्य दिन दरवर्षी २१ मार्च रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये युनेस्को ( UNESCO ) च्या  तिसाव्या जनरल कॉन्फरन्समध्ये हा उपक्रम सुरू झाला.

कवी आणि कवितांच्या सर्जनशील वैभवाचा सन्मान करणे, भाषिक विविधतेचे समर्थन करणे आणि लुप्त होत चाललेल्या भाषांना प्रोत्साहन देणे , जगभरातील कवी आणि कवयित्रींचा सन्मान आणि समर्थन करणे हा काव्य दिनाचा मुख्य उद्देश आहे. जगभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी – कवयित्री यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या काव्य चळवळीची ओळख म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

कविता हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि पौराणिक काळापासून अस्तित्वात आहे. आणि त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी काव्य दिन साजरा करणे आवश्यक आहे. जागतिक कविता दिन दरवर्षी अनेक संस्था शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कविता लेखन सारख्या स्पर्धा आयोजित करून मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.

कविता ही केवळ कवीसाठीच नाही तर प्रत्येक श्रोत्यासाठी  महत्त्वाची असते, त्यामुळे या दिनानिमित्त सरकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकही या दिवसाचा प्रचार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. जागतिक काव्य दिनानिमित्त, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि साहित्य अकादमीतर्फे अनेक काव्य महोत्सव आयोजित केले जातात. यात कवींना पारितोषिकांचे वितरण आणि पुरस्कार देखील केले जातात.

कोरोनाचे सावट

मागच्या दोन वर्षात जगभरात उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीचा परिणाम या महोत्सवावरही झाला आहे. परंतु, हे सावट दूर होत आता अनेक संस्थांद्वारे अनेक काव्य वाचन, काव्य सादरीकरण उपक्रम , स्पर्धा ठिकठिकाणी आयोजित होताना दिसत आहेत. शहरी असो वा ग्रामीण सर्वच भागातील कवी कवयित्री या कार्यक्रमात  उत्साहाने सहभागी होऊन उत्तमोत्तम काव्य रचना रसिकांसमोर सादर करत आहेत.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्व कवी, कवीयित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या (World Poetry Day) खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन !