fbpx

आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय शांतता दिन

शांतता! जगात प्रत्येक व्यक्तीला हवी असणारी गोष्ट! वरवर पाहता, मनुष्याला फक्त वातावरणीय शांतताच हवी असते असे गृहीत धरले जाते. पण वास्तविक दृष्ट्या बघितले तर मनुष्य कायमच फक्त आसपासच्या वातावरणातील शांतताच नाही तर एकंदरीत सामाजिक, मानसिक, भौतिक, शारीरिक स्वास्थ्य रुपी शांततेच्या शोधात असतो. याच शांततेचे महत्व जाणून, आणि त्यावरील एकवाक्यता एकमताने संमत करून दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.

1981 मध्ये सुरवात

जगभरात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जे अपरिमित नुकसान झाले, हानी झाली त्या पार्श्वभूमीवर हा जागतिक शांतता दिवस साजरा करण्याची गरज निर्माण झाली. 1981 मध्ये जगभरातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून घोषित केला.

जगात जाती, धर्म, पंथ, समुदाय, श्रीमंत, गरीब अशा मुद्द्यांवरून होणारे मतभेद नष्ट व्हावेत, जगाला भेडसावणारा आतंकवाद संपुष्टात यावा,भाषिक- वांशिक व धार्मिक दंगलींमुळे नांदणारी अशांतता नाहीशी व्हावी, गुन्हेगारी, अत्याचार, असमानता, मानवी पिळवणूक थांबावी या सर्व सद्हेतूने या दिवसाची स्थापना झाली.

हे ही वाचा: जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबर

पीस बेल – शांतीच्या आशेचे प्रतीक

1954 मध्ये युनायटेड नेशन्स असोसिएशन ऑफ जपानने पीस बेल ही भेट दिली होती. 1951 मध्ये पॅरिसमधील महासभेच्या सहाव्या अधिवेशनात जपानच्या संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सल्लागार आणि निरीक्षक चियोजी नाकागवा यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. पीस बेल (शांती बेल) ही शांतीच्या आशेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.

प्रत्येक वर्षी २१ सप्टेंबरला शांतता दिवस साजरा करण्यासाठी एक स्पेशल थीम असते. २०१९ मध्ये ‘क्लायमेट अॅक्शन फॉर पीस’ ही थीम , २०२० मध्ये शेपिंग पीस टुगेदर, २०२१ या वर्षी रेकव्हरिग बेटर फॉर सस्टेनबल वर्ल्ड ही थीम होती तर यंदा 2022 मध्ये एंड रेसिझम ही थीम आहे.

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा जगभरातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पांढरी कबुतरं ही शांतीचे प्रतिक मानण्यात येतात. भारतात आजच्या दिवशी पांढऱ्या कबुतरांना आकाशात मुक्त करण्यात येते.

एकूणच आपल्या आयुष्यात शांतीचे अनन्य साधारण महत्व आहे. जिथे दया, क्षमा, शांती असते त्या ठिकाणी सुख, समाधान, बंधुभाव, मधुरता, आणि आनंद असतो. आपणही आपल्या परीने आसपासच्या आणि आपल्या मनातल्या शांतताकारक विचारांची आणि कृत्यांची कास धरून एक शांतीप्रिय देश म्हणून आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करण्यात प्रयत्नशील राहू.