fbpx

मकर संक्रांत १४ जानेवारी 

नवीन वर्षात नव्या उत्साहात नवी स्वप्ने, नवीन आशा घेऊन येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा मधुर गोड संवादाने सुरुवात होणारा हा मकर संक्रांतीचा दिवस! 

सण एक… नावे अनेक!

मकरसंक्रात हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला. तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात त्याला संक्रांती म्हणतात. पंजाब आणि हरियाणामध्ये हा सण नवीन पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. तर आसाम मध्ये हा सण बिहुच्या रुपात साजरा केला जातो.या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची पुजा केली जाते.  संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिला संक्रातींच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करतात. यानिमित्ताने एकमेकींना तिळगुळ, आणि विविध भेट वस्तूंचे वाण देण्याची पद्धत आहे.

संक्रांतीचे unique वाण!

या वर्षीच्या मकरसंक्रांतीची तयारी महिनाभर आधीपासूनच सगळीकडे सुरू झालेली दिसून आली. सर्व भगिनी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. ऑनलाइन समाज माध्यमात देखील  नवनवीन वस्तू वाण म्हणून देण्यास विक्रीसाठी असलेल्या पाहायला मिळाल्या.  खूपच नावीन्यपूर्ण आणि उपयोगी अशा  वाण वस्तूंची रेलचेल यंदा बघायला मिळत आहे.

तर यात आत्तापर्यंत वाण म्हणून देण्यासाठी फक्त गृहोपयोगी वस्तू किंवा सौंदर्य प्रसाधने यालाच प्राधान्य न देता पुस्तकांचाही यासाठी विचार केल्याचे दिसून आलं. अनेक  बूक स्टॉल वर रेसिपी बूक, घरगुती औषधोपचार माहिती असणारी पुस्तके, टेबल कॅलेंडर, इतर लहान पुस्तकेही  विक्रेत्यांनी ठेवलेली दिसून आली. 

मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे आणि व्यस्त जीवन शैलीमुळे वाचनाची सवय काहीशी मागे पडत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून दिसून येत होते. परंतु लॉक डाऊन मध्ये 24 तास घरात बसून करणार काय? या प्रश्नाची जी काही उत्तरे ज्याने त्याने आपापल्या परीने शोधून काढली त्यात ‘ वाचन ‘ हे उत्तर पहिल्या क्रमांकावर आले असे म्हणायला हरकत नाही.अनेक कारणे होती त्याची! एकतर मोबाईल मध्ये त्याच त्याच कोरोना बातम्या, तीच तीच माहिती याने उबग आलेला होता, ताण प्रचंड वाढत होता आणि दुसरे म्हणजे दिवसभर मोबाईल मध्ये डोके खुपसून बसलेल्या मुलांना वाचनाची सवय लावणे खूपच गरजेचे वाटायला लागले. आणि म्हणूनच अनेकांनी पुस्तकांचा आधार घेतला.

तर हे विशेष नमूद करण्यामागे उद्देश हा की तेव्हा लागलेली ही चांगली सवय अजूनही कायम असलेली दिसून येतेय. आणि म्हणूनच यंदा संक्रांतीचे वाण म्हणून देण्यासाठी पुस्तकांचा ही विचार केला जाणे ही खरंच खूप स्वागतार्ह बाब आहे. 

सौंदर्य प्रसाधने, स्वयंपाकघरातील गरजेच्या वस्तू, स्टील, प्लॅस्टिकचे डबे – चमचे या सगळ्या आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू प्रत्येकाकडेकडे असतातच, आणि  वर्षभर काही ना काही कारणाने प्रत्येकजण त्या घेतच असतो. पण पुस्तकांसारखी एखादी गोष्ट वाण म्हणून द्यावी हा विचार या सर्वांच्या मनात येणं हे खरंच खूप खूप कौतुकास्पद आहे. 

वर्षभरातल्या अनेक सण समारंभ प्रसंगी, देव कार्यात,  पूजेत महालक्ष्मीची पूजा केली जाते, अन्नपूर्णेची पूजा केली जाते, सवाष्ण पुजन केले जाते. पण दसऱ्याला एक पाटी पूजन सोडले तर  देवी सरस्वतीची पूजा अशी वेगळी कधी केली जात नाही.पण तिच्या आशीर्वादाची गरज तर चांगल्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी, कलागुणांसाठी जन्मभर प्रत्येकाला लागतेच. त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकाचे वाण देण्याची ही अभिनव कल्पना जी या वेळी बघायला मिळत आहे, हीच कायम राहो. 

कारण बाकी बाकी वस्तू मधून मिळणारा आनंद,उपयोग अल्पकाळ असेल पण पुस्तके तुम्हाला जन्मभर साथ सोबत करतील, त्यातून मिळालेला आनंद चिरकाल असेल हे नक्की!

त्यामुळे यंदा तिळगुळ खा गोड बोला आणि भरपूर छान वाचा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *