fbpx

National Technology Day: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे

National Technology Day

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे

National Technology Day: तंत्रज्ञान हा आजच्या काळाचा अविभाज्य घटक आहे. स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर दिवसेंदिवस जगभरात तंत्रज्ञानाची क्रांती होत आहे. त्यामुळेच असे म्हणता येईल की तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेचे द्योतक आहे. आपल्या नैसर्गिक क्षमतांच्या कित्येक पट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, अवकाशीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे  नवनवीन  टप्पे गाठले आहेत.

याचेच उदाहरण म्हणजे भारताने तंत्रज्ञानाच्या मदतीने अणुऊर्जा क्रांती घडवली कामी आणली तसेच  विशाल अवकाशात उंच उड्डाणे देखील घेतली. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर देशाच्या सामर्थ्यात अणुशक्तीची भर घालणारा दिवस म्हणून आजचा हा ११ मे हा दिन “राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस” म्हणून देशभर साजरा केला जातो.

हे ही वाचा: मराठी भाषा दिन – 27 फेब्रुवारी

National Technology Day: महत्व

भारत देशासाठी ११ मे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा दिवस देशाच्या इतिहासात सन १९९८ सालची पोखरण अणुचाचणी आणि अंतराळातील भारताची मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. ११ मे १९९८ मध्ये भारताच्या राजस्थानमधील पोखरण येथे भारताने तीन अणुचाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या अणुचाचणीचे सांकेतिक नाव “ऑपरेशन शक्ती” असे होते. या अणुचाचणीमुळे भारत देश जगभरात अणुशक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयाला आले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदम्बरम तसेच अनिल काकोडकर हे या चाचण्यांचे शिल्पकार होते. याच काळात अण्वस्त्रांच्या यशस्वी चाचण्या होत असतांना देशाने आणखी एक यश संपादन केले. बंगलोरच्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने विकसित केलेले पहिले स्वदेशी विमान “हंस -३” या देशी बनावटीच्या लहान विमानाने अवकाशामध्ये झेप घेतली. 

याचबरोबर ११ मे १९९८ ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिफेन्स ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) या महत्त्वपूर्ण संस्थेकडून “त्रिशूल” या क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली गेली. भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेनेची शक्ती वाढवुन मदत करणारे व लहान पल्यावरील लक्ष टिपणारे हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन अवकाशात मारा करणारे आहे. भारतीय तंत्रज्ञानाने अशा प्रकारे प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे. 

देशाचे महान वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्यामुळे जगातील  पाश्चात्त्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले होते. या यशस्वी प्रयोगानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले. या प्रगतीचे प्रतीक म्हणून  सन १९९९ पासून ११ मे हा दिवस दरवर्षी “राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस” (National Technology Day) म्हणून साजरा केला जातो.

National Technology Day: वैज्ञानिक दृष्टिकोन

आज २१ व्या शतकात  प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश अग्रेसर ठरत आहे. आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक, शैक्षणिक अशा प्रत्येक स्तरावर देशाची   यशस्वी वाटचाल होत आहे. तंत्रज्ञान ही आजच्या काळाची गरज आहे.आणि म्हणूनच नवीन पिढीत  लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे गरजेचे आहे. त्यातूनच बालवैज्ञानिक तयार होतील व पुढे देशाच्या विकासात हातभार लावतील. कारण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, ‘प्रत्येक घरातील मुलगा हा अगोदर शास्त्रज्ञ असतो. त्यामुळे त्यांना विज्ञानाच्या कुतूहलापासून दूर करू नका.’  याच विचाराचे अनुसरण केले तर विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळून समाजाची प्रगती साधली जाईल आणि जगातील विकसित तंत्रज्ञानात भारत देश सदैव अग्रेसर राहील.