Union Budget Of India: भारतीय अर्थसंकल्प – 1 फेब्रुवारी

Union Budget Of India: देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला की त्या नंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया – पडसाद उमटायला सुरुवात होते. सामान्य जनतेत तसेच वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, पार्लमेंट, शेयर बाजार आणि मागच्या काही वर्षात समाज माध्यमातून चर्चा – उपचर्चा, मत मतांतरे मांडली जाऊ लागतात. यंदाचा अर्थसंकल्प चांगला की वाईट, फायदेशीर आहे की नुकसानदायक आहे यावर अनेक विचार प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून मांडतो. थोड्या फार प्रमाणात दरवर्षी हेच चित्र आपल्याला दिसून येते.
सर्वसाधाणपणे हे तर आपल्याला माहीत असते की बजेट (Union Budget Of India) सादर झाल्यानंतर काही गोष्टींचे दर वाढणार, काहीचे कमी होणार, आयकरात दिल्या जाणाऱ्या सवलतीत बदल होणार, मागील वर्षी अमलात आणल्या गेलेल्या योजनांमध्ये गरज असल्यास आवश्यक बदल करून विविध सामाजिक स्तरासाठी नवीन योजना येणार!
Union Budget Of India: इतिहास
परंतु, सामान्य ज्ञान म्हणून म्हणून भारतीय वार्षिक अर्थसंकल्प या विषयाबद्दल प्राथमिक बाबी जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम १७३३ मध्ये बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये वापरण्यात आला. भारताची सत्ता इस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेल्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प मांडला. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८चा अर्थसंकल्प मांडला तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी अर्थसंकल्प सादर केला.
हे ही वाचा: सँडविच जनरेशन आणि Smart समतोल
Union Budget Of India: वार्षिक वित्तीय विवरणपत्रक
भारतीय राज्यघटनेनुसार अर्थसंकल्प (Union Budget Of India) या संकल्पनेला वार्षिक वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) असे संबोधले आहे. घटनेच्या ११२व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर २०२व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो.
दरवर्षी जाहीर होणाऱ्या पुढील माहिती प्रामुख्याने अंतर्भूत असते :
- मागच्या वित्तीय वर्षांचे प्रत्यक्ष आकडे (Actuals)
- वर्तमान वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्प दृष्टीने अंदाज (Budgetary Estimates) आणि संशोधित अंदाज (Revised Estimates)
- आगामी वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates)
Union Budget Of India: प्रकार
भारतीय अर्थसंकल्पाचे पुढील प्रकार आहेत.
- समतोल अर्थसंकल्प जेव्हा सरकारचे उत्पन्न व खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.
- शिलकीचा अर्थसंकल्प– जेव्हा सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकी अर्थसंकल्प म्हणतात.
- तुटीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.
Union Budget Of India: स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत
स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत सादर केलेल्या भारतीय अर्थसंकल्प बाबत काही विशेष अधोरेखित बाबी पुढीलप्रमाणे आहेत :
- 1955-56 पासून, अर्थसंकल्पीय दस्तऐवज इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत छापले जातात. त्याआधी अर्थसंकल्प केवळ इंग्रजी भाषेत छापला जायचा.
- देशाच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोराराजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी 1962-69 दरम्यान अर्थमंत्री असताना 10 अर्थसंकल्प सादर केले होते.
- माननीय इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता.
- 2017 पर्यंत, रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केले जायचे.
- 92 वर्षे स्वतंत्रपणे सादर केल्यानंतर, 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला आणि एकत्र सादर करण्यास सुरुवात झाली.
- 2019 मध्ये, इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरल्या.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 या वर्षी सलग 2 तास आणि 42 मिनिटे इतका दीर्घवेळ अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम केला.
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2021-22 या वर्षी कोविड परिस्थितीमुळे पहिल्यांदाच , पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
नुकत्याच जाहीर झालेल्या बजेट (Union Budget Of India) संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला विविध माध्यमातून आपल्याला वाचायला , ऐकायला मिळतीलच परंतु भारतीय अर्थसंकल्प या विषयाशी निगडित अशा अनेक उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण लक्षवेधी घटना आहेत त्यांची माहिती भारतीय नागरिक म्हणून आपल्याला असायलाच हवी.