fbpx

Indian Coast Guard Day: भारतीय तटरक्षक दिन : 1 फेब्रुवारी

Indian Coast Guard

Indian Coast Guard Day: एक सुशिक्षित भारतीय नागरिक म्हणून आपल्या भारत देशासंबंधीत काही महत्त्वपूर्ण दिवसांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. १ फेब्रुवारी १९७७ रोजी सागरी भारतीय सुरक्षा सेवेसाठी भारतीय तटरक्षक दलाची (Indian Coast Guard) स्थापना करण्यात आली होती.  त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन (Indian Coast Guard Day) साजरा केला जातो.  तटरक्षक दलाचे कार्य, कामाचा आवाका विस्तृत आणि दीर्घ आहे. पण वाचकांना या दिवसाची प्राथमिक माहिती व्हावी याउद्देशाने थोडक्यात लिहिलेला हा लेख!

आज १ फेब्रुवारी. आजचा दिवस आपल्या देशात ‘तटरक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय सागरी तटरक्षक दलाचे बोधवाक्य हे ‘वयम् रक्षमः’असे आहे. याचाच अर्थ “आम्ही संरक्षण करतो” असा आहे. 

हे ही वाचा: भारतीय वायुसेना दिन – 8 ऑक्टोबर

Indian Coast Guard : सागरी क्षेत्रात कार्य करणारी संघटना

जगात प्रत्येक देशाच्या सुरक्षा यंत्रणेला अनन्यसाधारण महत्त्व असते. आपल्या देशातील भूदल, नौदल आणि वायुदल या प्रमुख संरक्षणदलांप्रमाणेच अनेक यंत्रणा सुरक्षेसाठी कार्यरत असतात. ‘तटरक्षक दल’ (Indian Coast Guard) ही यंत्रणा त्यापैकीच एक नौदलाप्रमाणे सागरी क्षेत्रात कार्य करणारी संघटना आहे. ही संघटना समुद्री  गुन्हे आणि दहशतवाद यापासून भारतीय किनारपट्टय़ांचं संरक्षण करते. याव्यतिरिक्त समुद्रात संकटात सापडलेल्या नौका किंवा जहाजांना मदत करण्याचं महत्त्वपूर्ण कामही हे दल करत असतं.

सागरी तटरक्षक दल प्रामुख्याने भारताच्या समुद्री किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करते. या तटरक्षक दलाचे मुख्य कार्य म्हणजे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा बेकायदेशीर  बाब आढळल्यास त्यावर कारवाई करणे.

भारतात नवी दिल्ली येथे सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय आहे. या व्यतिरिक्त प्रादेशिक विभागांची  मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, आणि गांधीनगर येथे आहेत. ही  मुख्यालये भारताच्या भारताच्या सागरी किनाऱ्यावर अकरा जिल्हा तटरक्षक दल व सहा तटरक्षक स्थानकांद्वारे काम करतात. भारताचा सागरी किनारा सुमारे 7,517 किमी. इतका आहे. या संपूर्ण किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी या तटरक्षक दलावर आहे. संवेदनक्षम स्थळे तसेच सागरी वादळे किंवा त्सुनामी लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्या संकटग्रस्तांना मदत करण्याची  जबाबदारी तटरक्षक दलावर आहे.

Indian Coast Guard: महत्त्वपूर्ण कार्ये

याशिवाय तटरक्षक दलाची इतर महत्त्वपूर्ण कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 

  • समुद्रात विमान दुर्घटना झाल्यास तत्काळ आवश्यक ती  मदत करणे. 
  • किनाऱ्यावरील जहाजातून तेलगळती होत असल्यास जलचरांना वाचविणे
  • बेकायदेशीर आयात-निर्यातीवर देखरेख ठेवून सीमाशुल्क आकारणे. 
  • सागरी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष वेधून आरोपी आढळल्यास  गुन्हा दाखल करणे.
  •  दुर्घटनाग्रस्त जहाजांना मदत करणे. संशयास्पद जहाजे आढळल्यास कारवाई करणे.

नुकतीच म्हणजे जानेवारी 2022 मध्ये भारतीय तटरक्षकद्वारे नाविक (जनरल ड्यूटी), नाविक (डोमेस्टिक ब्रांच) आणि यांत्रिक (मेकेनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स) इत्यादी 350 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित माहिती 

भारतीय तटरक्षक दलाची विस्तृत माहितीअधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.