fbpx

National Tourism Day: राष्ट्रीय पर्यटन दिवस

National Tourism Day

राष्ट्रीय पर्यटन दिवस : 25 जानेवारी

National Tourism Day: दरवर्षी भारतात  हा 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day) साजरा केला जातो.   

भारतीय वार्षिक सकल उत्पन्नात म्हणजेच जीडीपी मध्ये वाढ होण्यासाठी पर्यटन क्षेत्र महत्त्वाचे मानले जाते.  पर्यटन व्यवसायाद्वारे येणारा परदेशी पैसा हा भारतीय अर्थसत्तेला भक्कम बनवतो आणि देशाच्या प्रगती अधिक बळकटी देत असतो आणि जागतिक बाजारपेठेत आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यास मदत करतो. पर्यटनाद्वारे रोजगाराच्या  संधी निर्माण होतात, स्थानिक उद्योगधंदे, व्यवसाय वृद्धी होते, सुबत्ता निर्माण होते आणि एकंदरीतच देशाचे आर्थिक चलनवलन स्थिरावते.

भारताची विविधता

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात सांस्कृतिक, धार्मिक, वन्यजीव, कृषी पर्यटन या सर्वासाठी परदेशी पर्यटक नेहमीच पर्यटनासाठी उत्सुक असतात. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि महाराष्ट्रापासून ते ओरिसा, पश्चिम बंगाल पर्यंत प्रत्येक दिशेला अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करत असतात. प्रत्येक जातीधर्माचे प्रार्थना स्थळ असो वा ऐतिहासिक ,पौराणिक स्थळे, गड, किल्ले, डोंगर – दऱ्या, समुद्र किनारे, वनराई, घनदाट जंगले असो, प्रत्येकाच्या रूचीनुरुप असे पर्याय आज पर्यटनास उपलब्ध आहेत.

भारतीय संस्कृती आणि सभ्यता दर्शविणारी ही रमणीय ठिकाणे केवळ परदेशी पाहुण्यांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे साडेसात लाख परदेशी लोक भारतातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येतात आणि म्हणूनच भारत सरकार पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम , योजना राबवत असते. शहर असो वा ग्रामीण भाग, देशांतर्गत प्रत्येक कानाकोपऱ्यात अद्ययावत पायाभूत सुविधा असाव्यात यासाठी स्थानिक प्रशासन देखील कार्यरत असते. अनेक अलिशान रेल्वेंनी देखील भारतीय पर्यटनात आणि पाहुणचारामध्ये अधिक भर घातली आहे.

आर्थिक – सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण

पर्यटन क्षेत्र –  कोणत्याही देशाच्या आर्थिक – सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे असे क्षेत्र! मागील काही महिने संपूर्ण जग कोरोनाकाळाचा सामना करत आहे. लॉक डाऊन काळात अनेक उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले. अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पर्यटन क्षेत्र त्यातीलच एक! संपूर्ण जगातील पर्यटन एकाच वेळी संपूर्णपणे बंद झाले आणि याचा आर्थिक परिणाम प्रत्येक देशाला आणि तेथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकांना, नोकरदारांना सहन करावा लागला.  जसजसा कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागला तसतसा हा व्यवसाय पुन्हा एकदा कात टाकत नव्या उत्साहाने जम धरू लागला. अशा पार्श्वभूमीवर पर्यटन दिवसाची दखल घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

National Tourism Day: भारतीय पर्यटनाच्या संधी

पर्यटन हा एक अत्यंत श्रम-केंद्रित उद्योग आहे. येणार्‍या पर्यटकांना अपेक्षित असलेल्या विविध सेवा पुरवणे हे कुशलतेचे काम आहे. जागतिक स्तरावर, पर्यटनावर खर्च हा अनेक देशांच्या GDP पेक्षा ही कितीपरी पटीने अधिक आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या ताज्या अंदाजानुसार, भारतातील एकूण रोजगारांपैकी सुमारे 6 टक्के रोजगार या उद्योगातून निर्माण होण्याची अपेक्षा आहे. 2005 मध्ये भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) ने भारतातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘अतुल्य भारत’ नावाची मोहीम सुरू केली. अधिक चांगल्या वाढीसाठी, विभागाने विविध ठिकाणे ‘आध्यात्मिक पर्यटन’, ‘स्पा पर्यटन’, ‘इकोटुरिझम’ आणि ‘साहसी पर्यटन’ अशा विविध विभागांमध्ये विभागली आहेत.

भारतीय आरोग्य सेवा क्षेत्र विकसित होत असताना, ‘मेडिकल टुरिझम’ नावाची एक नवीन संज्ञा तयार करण्यात आली आहे, जी जगभरातील कानाकोपऱ्यातून वैद्यकीय आणि आरामदायी उपचारांसाठी भारतात येण्याची संधी आहे. भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रावरील संशोधन अहवालानुसार, वैद्यकीय पर्यटन बाजाराचे मूल्य $310 दशलक्षपेक्षा जास्त आहे आणि दरवर्षी 100,000 परदेशी रुग्ण येतात. भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या रूपात असलेल्या महत्त्वाच्या संधींमुळे वैद्यकीय पर्यटक भारताला त्यांचे अनुकूल ठिकाण म्हणून निवडतात. येथील आरोग्य विमा बाजार आणि राष्ट्रीय वैद्यकीय प्रणाली चांगल्या प्रकारे विकसित आहेत, जे पश्चिम आणि मध्य पूर्वेतील अभ्यागतांसाठी सोयीस्कर आहेत. त्यांना हॉस्पिटलचा खर्चही परवडणारा वाटतो.