fbpx

राष्ट्रीय कन्या दिवस 24 जानेवारी

रूप बहिणीचे माया देई

वात्सल्य मूर्त आई होई

माहेरा सोडून येई

सासरी सर्वस्व देई

कधी सीता कधी होई कुंती

सावित्रीची दिव्य शक्ति

शकुंतला तूच होसी

मीरा ही प्रीत दिवाणी

युगेयुगे भावनांचे धागे

जपावया मन तुझे जागे

बंधनें ही रेशमाची

सांभाळी स्‍त्रीच मानिनी

कवी श्री शांताराम नांदगावकर यांच्या या ओळी! स्त्री जन्माची कहाणी  या काही मोजक्या शब्दात मांडणाऱ्या कवितेतच एकंदरीत स्त्री जन्माचे सार आले आहे. शहरी असो वा ग्रामीण, शिक्षित असो किंवा उच्च शिक्षित, गृहिणी असो वा नोकरदार, जात – धर्म – पंथ कोणताही असो, स्त्री जन्माच्या कथा आणि व्यथा प्रत्येक काळात, प्रत्येक युगात सारख्याच असतात.

शैक्षणिक प्रगती, आधूनिकीकरण, आणि यामुळे आलेली सामाजिक – सांस्कृतिक प्रगल्भता या सर्वाचा परिणाम म्हणून मागच्या काही दशकात स्त्रियांचे सामाजिक जीवन आधीच्या पिढीपेक्षा विचारांनी सुधारित अशा मनोवृत्तीचे आहे असे ठामपणे आज सांगता येऊ शकते.

फक्त साक्षरच नाही तर उच्च शिक्षित होणे, स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे, स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील राहणे हे आज सर्वच स्तरातील स्त्रियांना महत्त्वाचे वाटते आणि त्यास प्रोत्साहनपर सामाजिक वातावरणही आहे.

हा बदल अर्थातच एका दिवसात, एका महिन्यात झाला नाही तर अनेक पिढ्यांचे , अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे आयुष्य हा बदल घडवून आणण्यास खर्ची पडले आहे.

स्त्री जीवनाचे आजचे चित्र

आजचे हे स्त्री जीवनाचे चित्र समाधानकारक असले तरी परिपूर्ण मात्र नाही. आजही फक्त खेडोपाड्यातच नाही, तर शहरी भागातही अगदी बाल्यावस्थेत आल्यापासूनच मुलींवर शारीरिक – मानसिक अत्याचार होत असल्याच्या दुर्दैवी घटना आपण रोज वाचतो , ऐकतो! जिथे एकीकडे प्रत्येक क्षेत्रात नाव लौकीक, मान मरातब कमावणाऱ्या मुली आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत तिथेच दुसरीकडे अनेक अनंत अत्याचारांना बळी पडून लहान मुली , तरुणींची आयुष्य सुरू व्हायच्या आधीच कोमेजून जातानाच्या बातम्यांनी मन विषण्ण होते.

पण अर्थात ज्या प्रमाणे शंभर वर्षांपूर्वीचे स्त्री जीवन आणि आत्ताचे स्त्री जीवन यात तफावत आहे त्याच प्रमाणे आत्ताचे स्त्री जीवन आणि भविष्यात जन्माला येणाऱ्या लेकिबाळीचे आयुष्य यातही सुधारणात्मक, विधायक बदल असेल हे निश्चित ! 

 हा बदल घडवून आणायचा असेल , सद्य वर्तमान परिस्थितीत मुलींवर जे अत्याचार , अन्याय , भेदभाव होत आहेत ते मुळापासून नाहीसे करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काळानुरूप योग्य ते कायद्यात बदल करणे, वेगवेगळ्या योजना आखून त्या कार्यान्वित करणे आवश्यक आहे. यासाठीच,  दरवर्षी 24 जानेवारी रोजी भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो.

महिला व बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकारने २००८ साली कॉंग्रेसच्या शासनकाळात हा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. आपल्या राजकीय कारकिर्दीत 24 जानेवारी रोजीच माननीय इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसल्या होत्या. भारताची पहिली स्त्री पंतप्रधान असे गर्वाने त्यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे ‘ महिला शक्ती ‘ म्हणून त्यांचे स्मरण करताना हा दिवस ‘राष्ट्रीय बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो .  

योजना आणि उपक्रम

समाजातील सर्व स्तरातील, जाती धर्मातील मुलींना समान संधी व जास्तीत जास्त सुविधा व आधार मिळावा हा मुख्य हेतू बालिका दिन साजरा करण्यामागे आहे.  या निमित्ताने अनेक  शाळा ,महाविद्यालय आणि इतर सामाजिक संस्थांद्वारे वेगवेगळे उपक्रम – कार्यक्रम  आयोजित केले जातात यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’  सारखे स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणारे अनेक संदेश दिले जातात. मुलीचे हक्क, आरोग्य, पोषण, शिक्षण , लग्न अशा अनेक गोष्टींची माहिती आणि सजगता या कार्यक्रमात दिली जाते.

याच दिवशी ‘धनलक्ष्मी’, ‘सबला’ योजना राबविण्यात आल्या आहेत.  या सर्वांचा मुख्य उद्देश मुलींना, विशेषत: किशोरवयीन मुलींना सक्षम करणे हा आहे, जेणेकरून त्या उज्ज्वल भविष्यात एक चांगला समाज घडवण्यासाठी योगदान देऊ शकतील.

मुली कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, हुंडाबळी यांसारख्या गोष्टींबाबत जागरुकता व्हाव्यात तसेच समाजातील सर्व महिला,बालिका , तरुणींना समान वागणूक मिळावी, एक चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी आजच्या दिवशी  लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हे सर्व उपक्रम राबविले जातात.

फक्त शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांद्वारेच नाही तर  भारत सरकारद्वारे देखील स्त्री जीवनाचा दर्जा सुधारावा, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी अनेक प्रयत्न सातत्याने सुरू असतात.  

मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी , मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, त्यांना उच्च शिक्षण मिळावे ,  तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या योजना सरकारद्वारे  तयार केल्या आहेत.

शैक्षणिक, सामाजिक संस्था, राज्य तसेच केंद्र सरकार तर  समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करून तिला योग्य प्रकारे  वागणूक मिळावी यासाठी अशा अनेक योजनाद्वारे कार्यरत राहतीलच परंतु हा बालिका दिवस, महिला दिवस यापुरतीच हा सन्मान आणि चांगली वागणूक मर्यादित न ठेवता येणाऱ्या प्रत्येक दिवशी जर तुम्ही – आम्ही संपूर्ण समाजानेच  आसपासच्या, कुटुंबातल्या प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला तर नक्कीच हा समाज एक सुशिक्षितच नव्हे तर भक्कमरित्या

 सुसंस्कृत समाज म्हणून  संपूर्ण विश्वात गणला जाईल.

म्हणूनच, आपणही सर्वांनी या सामाजिक , राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेऊया आणि 

वैयक्तिक पातळीवर का होईना, आजच्या  ‘ राष्ट्रीय कन्या दिवस ‘ या राष्ट्रीय उपक्रमात आपल्या आसपासच्या बालिकांना सन्मानाने वागण्याचा वसा घेऊया!