आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिवस – ५ ऑगस्ट
घर, ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही जायचे असेल तिथे पोचायला किती वेळ लागेल याचा प्रत्यक्षातील अंतरापेक्षा रस्त्यात ट्रॅफिक किती आणि कुठे कुठे असेल यावर आपण अंदाज बांधतो. आजकाल तुम्ही शहरात असा किंवा ग्रामीण भागात, वाढत्या लोकसंख्यमुळे वाढती वाहन संख्या आणि वाढत्या वाहनांमुळे गरजेची सुव्यवस्थित वाहतूक यंत्रणा आत्यंतिक गरजेची आहे. आणि म्हणूनच हे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट दिवस म्हणून ओळखला जातो.
पहिला ट्रॅफिक सिग्नल
जगातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल ५ ऑगस्ट १९१४ रोजी क्लीव्हलँड, ओहायो येथे स्थापित करण्यात आले. यानंतर, अमेरिकन ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवली, ज्याने अमेरिकेची अनेक शहरे व्यापली. त्यावेळी ट्रॅफिक लाइट्स फक्त 2 रंगाचे होते – लाल आणि हिरवा. या दिव्यांचे रंग बदलण्याआधी, एक बझर वाजत असे, जेणेकरून लोकांना दिवेच्या रंगांमध्ये होणाऱ्या बदलाची माहिती व्हावी.
प्रथम मॅन्युअली ऑपरेट केलेले ट्रॅफिक लाईट वापरले गेले. हे गॅस-बर्निंग सिग्नल १० डिसेंबर १८६८ रोजी लंडनमधील ब्रिटिश संसदेच्या घराच्या बाहेर रेल्वे अभियंता जेपी नाइट यांनी स्थापित केले होते. परंतु दुर्दैवाने, एका महिन्याच्या आत, हे सिग्नल स्फोट झाले, त्यामुळे या प्रणालीत बदल केले गेले.
3-रंगाचा ट्रॅफिक लाइट
ब्रिटनमधील पहिला 3-रंगाचा ट्रॅफिक लाइट १९२५ मध्ये लंडनमध्ये लावण्यात आला. त्यांचे व्यवस्थापन पोलिसांकडून केले जात होते. ब्रिटनमधील पहिला स्वयंचलित ट्रॅफिक लाईट १९२७ मध्ये वोल्व्हरहॅम्प्टनमध्ये स्थापित करण्यात आला.
आपले आयुष्य सुकर करण्यासाठी, सोपे करण्यासाठी सध्या मोबाईल फोन, इलेक्ट्रिसिटी, अत्याधुनिक तांत्रिक सोयीसुविधा या सर्वांची रेलचेल आहे. पण ज्या बुद्धिमान व्यक्तीकडून त्यांच्या कल्पनेतून या संकल्पना आकारास येऊन आज यशस्वीपणे आपल्या उपयोगी येत आहेत त्यांचे स्मरण करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची माहिती आपल्याला आणि आपल्याकडून पुढच्या पिढीला करून देणे हे आपले कर्तव्य आहे, नाही का! त्यासाठीच हा रहदारी प्रकाश प्रणालीवरील हा लेखन प्रपंच!