fbpx

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलै

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस किंवा जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day) दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जातो. व्याघ्र संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

२९ जुलै हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे कारण  २०१० साली याच दिवशी अनेक देशांनी रशिया येथे झालेल्या सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेमध्ये करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक पातळीवर वाघांची कमी होणारी संख्या याबाबत जागरूकता वाढविणे आणि वाघांचे संरक्षण करणे, २०२२ च्या अखेरी पर्यंत  वाघांची संख्या वाढवणे अशा योजनांचा समावेश असलेला हा करार होता.  सकारात्मक बाब अशी आहे की पर्यावरणीय विभागाच्या   प्रयत्नांमुळे, भारताने व्याघ्रांची संख्या यशस्वीरित्या दुप्पट केली आहे.

प्रोजेक्ट टायगर (Tiger Reserve)

याबाबत भारत सरकारतर्फे व्याघ्रप्रकल्प (Tiger Reserve) अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रकल्प चालवण्यात येत आहेत. यात मुख्यत्वे भारतीय वाघांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतू आहे.

वाघांच्या संरक्षणाअतंर्गत त्यांचे वास्तव्य असलेल्या अरण्यांचे  संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे या बाबी अंतर्भूत आहेत. वन्य वाघांची कमी होणारी संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या सुमारे ३५०० पर्यंत वन्य वाघ आहेत असा अंदाज आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते.  परंतु शिकारीमुळे १९७०च्या सुरुवातीला केवळ १७०० वाघ उरले. याचे गांभीर्य ओळखून  भारत सरकार कडून १९७२मध्ये वन्य जीव संरक्षण कायदा करण्यात आला. त्यानुसार वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातींवरील शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्रप्रकल्पांच्या स्थापनेस चालना मिळाली. व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढण्यास अनमोल मदत झाली. 

हे ही वाचा: आंतरराष्ट्रीय श्वान दिन

भारतातील व्याघ्र प्रकल्प

भारतातील व्याघ्र प्रकल्प पुढील ठिकाणी आहेत: 

  • अण्णामलाई (तमिळनाडू),  इंद्रावती (छत्तीसगड), उदांती सीतानदी (ओरिसा),कलक्क्ड मुंडनतुराई (तमिळनाडू)
  • काझीरंगा (आसाम), कान्हा (मध्य प्रदेश), जिम कार्बेट (उत्तराखंड),ताडोबा (महाराष्ट्र), दंपा (मिझोराम), दांडेली (कर्नाटक), दुधवा (उत्तर प्रदेश), नमदपा (अरुणाचल प्रदेश), नागरहोळे (केरळ), नागार्जुनसागर (आंध्र प्रदेश)
  • नामेरी (आसाम), पन्‍ना (मध्य प्रदेश), परमपिकुलम (तमिळनाडू), पालामऊ (झारखंड), पेंच (मध्य प्रदेश) (महाराष्ट्र), पेरियार (तमिळनाडू), बक्सा (पश्चिम बंगाल)
  • बंदीपूर (तमिळनाडू), बांधवगड (मध्य प्रदेश)
  • भद्रा (कर्नाटक),मदुमलाई (तमिळनाडू),मानस (आसाम)
  • मेळघाट (महाराष्ट्र), रणथंबोर (राजस्थान), वाल्मिकी (बिहार), संजय डुबरी (बिहार), सतकोसिया (ओरिसा), सह्याद्री (महाराष्ट्र), सातपुडा (मध्य प्रदेश), सारिस्का (राजस्थान), सिमलिपाल (ओरिसा), सुंदरबन (पश्चिम बंगाल).

भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या ३८ वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यातही आपला देश अग्रेसर आहे.

स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या वाढण्यासाठी, त्यांना आवश्य असे   चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये आपले महाराष्ट्र राज्य हे देशात पाचव्या क्रमांकावर आहे हे आवर्जून नमूद करण्यासारखे सकारात्मक चित्र आहे.

वाघ आपल्या देशाची शान आहे. वाघ आपल्या देशासाठी शौर्याचे प्रतिक आहे. आणि म्हणूनच व्याघ्र संवर्धन आणि व्याघ्र जतन याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *