fbpx

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर

जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रवास करायला आवडत नाही असा माणूस विरळाच. प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जाणे असो किंवा शाळेची कुटुंबाची एखादी सहल असो, अशा अनेक निमित्ताने आपले लहान-मोठे प्रवास सुरू झालेले असतात. त्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी नोकरीनिमित्त परगावी, परदेशी जाणे राहणे हेही ओघाने येते. थोडक्यात काय तर आयुष्यात एकदाही प्रवास केला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.

कामानिमित्त केलेला प्रवास असो वा खास कारण काढून एखादे स्थळ ठिकाण पाहण्यासाठी केलेली भ्रमंती असो.  अनेक विविध नव्या-जुन्या, चांगल्या-वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन आपण घरी परतत असतो.

हवा बदल

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मनुष्याची अत्यावश्यक गरज म्हणजे हवा. स्थळदर्शन, निसर्गदर्शन याबरोबरच प्रवासाचे जे काही अनेक फायदे असतात त्यात एक महत्त्वाचा फायदा म्हणजे हवाबदल. प्रत्येक भागाची हवा तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे वेगवेगळी असते.  कोरडी, दमट, उष्ण, थंड अशा अनेक प्रकारच्या हवेचे येथील राहणीमानावर, तेथील लोकांच्या आरोग्यावर विशिष्ट असे परिणाम , फायदे – तोटे होत असतात. त्यामुळे प्रवासाला निमित्त होणाऱ्या वास्तव्यादरम्यान तेथील हवेचे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत राहतात. अर्थात ते कधी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक देखील!  म्हणूनच प्रवास हा अनेक विविध अनुभवांची शिदोरी असतो असे म्हटले आहे. 

दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पर्यटन या विषयावर लिहिण्याचा हा लेखन प्रपंच! 

हे ही वाचा: गुगलचा वाढदिवस – २७ संप्टेंबर

जागतिक पर्यटन दिनाची सुरुवात कशी झाली?

युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन तर्फे 1980 साली या जागतिक पर्यटन दिनाची सुरुवात झाली.याचे कारण म्हणजे UNWTO कायदा 1970 मध्ये संमत झाला. 

जगभरातील पर्यटनाला चालना देणे या उद्देशासाठी हा दिन साजरा केला जातो. जगभर सामाजिक, सांस्कृतिक , राजकीय , आर्थिक संस्कृतीचे आणि मूल्यांचे आदान-प्रदान व्हावे त्याची जोपासना व्हावी यासाठी या पर्यटन दिनाचे विशेष महत्त्व आहे. 

जागतिक पर्यटन दिन दरवर्षी निरनिराळ्या थीम ने साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनाची  1980 साली पहिली थीम ‘ सांस्कृतिक वारसा आणि शांतता आणि परस्पर समंजसपणा टिकवणे’  ही होती. तर सध्या 2021 मध्ये सर्वसमावेशक वाढ ही पर्यटन दिनाची थीम आहे.

देशाच्या विकासाच्या दृष्टीने देखील पर्यटनाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. धार्मिक , ऐतिहासिक,  नैसर्गिक अशा अनेक दर्शनीय, प्रार्थनीय तसेच प्रेक्षणीय स्थळांचे वैभव लाभलेला असा आपला हा भारत देश अगदी समृद्ध आहे. पुढील पिढीसाठी हा अमूल्य ठेवा आपल्यालाच जतन करायला हवा. 

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसायावर उतरती कळा आली आहे. पण तरी देखील योग्य ती काळजी घेऊन सर्व आवश्यक उपाय योजनांची अंमलबजावणी करून पर्यटन क्षेत्र कंबर कसून पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे. लवकरच पर्यटन पूर्ववत होईल अशी सदिच्छा आणि शुभेच्छा आपण व्यक्त करू या जागतिक पर्यटन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.