fbpx

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022

World Suicide Prevention Day

आजचे जीवन हे कमालीचे स्पर्धात्मक झाले आहे. माणसाला दिवस भरात अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे आयुष्य काही ना काही कारणांमुळे तणावपूर्ण होत असते आणि कित्येकदा हा तणाव सहन न झाल्याने माणसे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. या घटनांना आळा बसावा आणि आत्महत्या रोखण्याबाबत तसेच मानसिक आरोग्याबद्दल (Mental Health) जगभरात जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day) साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटना (IASP) ह्या संस्थेद्वारे हा दिवस आयोजित केला जातो आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याला मान्यता दिली आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022 ची थीम

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022 सालची थीम Creating hope through action म्हणजेच “कृतीतून आशा निर्माण करणे ” अशी आहे. हि त्रैवार्षिक थीम 2021 ते 2023 या कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनांसाठी लागू आहे. आत्महत्येला कायमच पर्याय असतो याची आठवण करून देणे हा या थीमचा उद्देश आहे. या दिवशी तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट किंवा व्हिडीओ टाकून किंवा एखाद्या मोहिमेत सामील होऊन जागरूकता निर्माण करू शकता. तसेच या दिवसाच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्याकडे थोडंसं लक्ष देऊ शकता. कदाचित तुमच्याबरोबर साधलेला एखादा संवाद कुणासाठी तरी उपयुक्त ठरू शकतो.

 

हे ही वाचा:  आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर

 

चिंताजनक आकडेवारी

संपूर्ण जगात दरवर्षी सुमारे ८ लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजे दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोच्या (NCRB) ताज्या आकडेवारीनुसार, २०२१मध्ये भारतात एकूण १ लाख ६४ हजार ०३३ मृत्यु आत्महत्येमुळे झाले. दररोज ४५० आत्महत्या घडल्या म्हणजे सुमारे साडे ३ मिनिटाला एका व्यक्तीने आपलं जीवन संपवलं. २०२० पेक्षा हा आकडा ७.२ टक्क्यांनी वाढला आहे.

या काळात महाराष्ट्रात, देशात सर्वाधिक २२ हजार २०७ आत्महत्या घडल्या तर त्या खालोखाल तामिळनाडूमध्ये १८ हजार ९२५ लोक आत्महत्येने मरण पावले. ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022: महत्त्व

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन (IASP) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) सारख्या संस्था जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचा प्रचार करतात.

आत्महत्येची अनेक कारणं असू शकतात. कौटुंबिक समस्या, आजारपण, नशेचं व्यसन, अपयश, नातेसंबंध गुंतागुंत, दारिद्र्य, बेकारी, दिवाळखोरी, प्रेमभंग, सामाजिक इभ्रत इत्यादी समस्यांतून आलेलं आत्यंतिक नैराश्य, हतबल झाल्याची आणि आपली काही किंमत नसल्याची तसंच एकाकीपणाची भावना अनावर झालेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग अवलंबते.

आत्महत्या करणे हा समस्या संपवण्याचा एकमेव मार्ग नाही हे त्यांना समजावणे खूप गरजेचे असते. पण आजही आपण आत्महत्या या विषयावर अजूनही उघडपणे आणि मोकळेपणाने बोलत नाही. असं बोललो तर किंवा कुणा नैराश्यग्रस्त व्यक्तीला आपण तिच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत का असं विचारलं तर आपण त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतो किंवा तसे विचार मनात घालतो असा एक समज आहे. खरं तर एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आत्महत्येबाबत आपण असं उघड विचारलं तर त्या व्यक्तीशी संवाद साधता येतो. आपल्या चिंतेची, भीतीची कुणीतरी दखल घेत आहे याची जाणीव त्या व्यक्तीला होते. आपल्याला समजून घेणारं कुणी तरी आहे असं वाटतं.

डब्ल्यूएचओच्या तज्ञांच्या मते, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचा हेतू आत्महत्या या गंभीर सामाजिक समस्येबाबतचे समज, निषिद्धता, त्याची कारणं आणि आत्महत्येला प्रतिबंध इत्यादीबाबत जागरूकता निर्माण करणे असा आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, समाजातील सदस्य, शिक्षक, धार्मिक नेते, आरोग्यसेवा व्यावसायिक, राजकीय अधिकारी आणि सरकार अशा प्रत्येकानेच सहभाग घेऊन त्यांच्या प्रदेशात आत्महत्या रोखण्यासाठी कार्य केले पाहिजे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2022: इतिहास

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day) 2003 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटनेने स्थापन केला. दरवर्षी 10 सप्टेंबर हा दिवस आत्महत्या प्रतिबंध तसेच मानसिक आरोग्य या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो आणि अनेक समाज सेवक, संस्था आणि सरकारच्या मदतीने जनतेमध्ये जागरूकता वाढवतो.

आज ह्या दिवसाच्या निमित्ताने चला थोडा वेळ काढूया. आपल्या कुटुंबाशी, मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी संवाद साधूया. मानसिक आरोग्य, ताण आणि आत्महत्या या विषयांवर मोकळेपणाने बोलूया.