fbpx

International Vada Pav Day: जागतिक वडापाव दिन आणि मी

International VadapavDay

International VadapavDay: २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो.

बटाटवडे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ! बटाटेवडा या ऐवजी बटाटवडा असा शब्द जाणीवपूर्वक वापरला कारण हा खास पुलंचा शब्द आहे. माझे खाद्य जीवन या त्यांच्या लेखात ते लिहितात की ” बटाटवड्याला‌ बटाटेवडा म्हणणं म्हणजे लावणीला लावण्यगीत म्हणण्यासारखं आहे.”

तर… हा बटाटवडा, वडा सांबार, कट वडा, वडा पाव, नुसताच वडा किंवा पोळी बरोबर अशा कोणत्याही जोडीदाराबरोबर तितकाच चविष्ट लागतो.

वडापाव हे फक्त अन्न नाही…

वडापाव हे फक्त अन्न नाही तर ती प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयात राहणारी भावना आहे. बर्गरची ही भारतीय आवृत्ती ताज्या पाव आणि बटाट्याच्या वड्यापासून बनवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत वडा पाव हा दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहे. आपण कुठल्याही वयोगटाचे, प्रांताचे किंवा भाषेचे असाल, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय ह्यापैकी काहीही करीत असाल तरी वडा पाव हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग आहे. त्यामुळे शहरातील जवळपास प्रत्येक हातगाडी, रेस्टोरंट आणि कॅफेच्या मेनू मध्ये वडा पाव हा असतोच.

हे ही वाचा: आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस – 1 ऑक्टोबर

International VadapavDay: आठवणी

काही पदार्थ हे त्यांच्या चवीमुळे नाही तर त्या बरोबर लहानपणी जोडल्या गेलेल्या आठवणींमुळे कडू गोड झालेले असतात असे मला वाटते. बटाटवड्या बरोबर माझ्याही अशाच छान छान आठवणी आहेत. 80-90 च्या दशकातील एका साध्या मध्यमवर्गीय घरातील जसे इतरांचे बालपण असते तसेच माझेही बालपण गेले…म्हणजे हॉटेल, पिक्चर, नाटक, व्हेकेशन आउटींग या गोष्टी आवाक्याबाहेर होत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या गोष्टी आयुष्याची गरज बनलेल्या नव्हत्या. सगळे पदार्थ घरीच करून खाऊ घालायचा आईचा शिरस्ता! पण काहीही नसले तरी समोर धडधाकट आईवडील असल्याचा सुखाचा काळ होता तो!

तर सांगायचं म्हणजे, महिन्यातून एकदा पगाराच्या दिवशी माझे बाबा अगदी आठवणीने, नेमाने जवळच असलेल्या एका ठरलेल्या दुकानातून गरम वडे आणायचे. सकाळची शिफ्ट असली की चार वाजता घरी येताना हातातच वड्यांचा पुडा घेऊन चालत येताना गॅलरीतून दिसायचे. मग ते घरी आल्यावर त्यांच्या बरोबर बसून चहा बरोबर ते खमंग वडे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा! त्या आठवणी अजुनही तशाच ताज्या आहेत. त्यांनी त्यांच्या परीने, त्यांच्या ऐपतिनुसार जे काही लाड केले माझे… त्यातलेच हे एक लाड! आता ते दुकानही नाही, जिथे राहायचो ते घरही नाही आणि वडीलही नाहीत. तरीही त्या रस्त्याने जाताना ही वेडी नजर या सगळ्या नसलेल्या वस्तूंचा/वास्तूंचा अकारण शोध घेतच राहते. आणि म्हणूनच वडापाव हा पदार्थ मला अगदी जिवाभावाचा वाटतो.

तिखट वडा खाताना डोळ्यातून पाणी येतं..तरीही मी खाते..कारण त्या डोळ्यातल्या ओघळणाऱ्या त्या पाण्यात काही अश्रू हे वडिलांच्या आठवणींचे असतात! कितीही समजावले…., वडील जाऊन कितीही काळ लोटलेला असला तरी हे अश्रू ऐकत नाहीत. ते येतातच!

असो! तर आज जागतिक वडापाव दिन आहे म्हणे! “कसले कसले दिवस साजरे करतात आजकाल ” असे म्हणू शकतो आपण…पण का म्हणायचं! ज्या ज्या गोष्टी आपल्याला इतका आनंद देतात… हो जाने दो इक दिन उनके भी नाम! कारण, काही गोष्टी लहान असल्या ना तरी आयुष्य व्यापणाऱ्या असतात!

#जागतिक #वडापाव #दिनविशेष #vadapav

#प्रज्ञा_पंडित