fbpx

Famous YouTuber Shubhangi Keer: शुभांगी कीर – यशस्वी यू ट्यूबर

Shubhangi Keer: खुप वर्षांपूर्वी झी टिव्हीवर संजीव कपूर यांनी ‘खाना खजाना’ या रेसिपी शो ला सुरुवात केली. तो पर्यंत पाककलेबद्दल, निरनिराळ्या पाककृतीं बद्दल माहीती हवी असल्यास पुस्तकांचाच आधार होता. पाककलेवर आधारित असंख्य पुस्तकेच तेव्हा बाजारात उपलब्ध होती. परंतु प्रत्यक्षात तो पदार्थ बनवून दाखवत तो शिकवणे हे मात्र भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच घडत होते. त्या रेसिपी शो मधले सुसज्ज, नीटनेटके, सुबक स्वयंपाक घर आणि भांडी बघूनच आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते. पाककृतीचे प्रात्त्येक्षिक, सुंदर चित्रण, आणि महत्त्वाचे म्हणजे संजीव कपूर यांची सविस्तर विश्लेषण करून सांगण्याची, समजवण्याची पध्दत प्रेक्षकांना खुपच आवडली.

या गोष्टीला आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. इंटरनेट, युट्यूब, शेकडो खासगी वाहिन्यांच्या युगात आता रेसिपी शोजचे पेव फुटले आहे. टेलिव्हिजनवरील काही वाहिन्या 24 तास फक्त पाककलेविषयक माहीती देण्यासाठी कार्यरत आहेत. अनेक यू ट्यूब चॅनल्स आणि फेसबुक-इंस्टाग्राम पेजेस आज फक्त पाककृतींवर आधारित आहेत. या प्रचंड प्रमाणात सुरु असलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये युट्यूबवरील एक लोकप्रिय चॅनल म्हणजे मुंबई येथे वास्तव्य असलेल्या मुळच्या कोकणातल्या शुभांगी कीर (Shubhangi Keer) यांचे रेसिपीज आणि vlogging चे चॅनल.

Shubhangi Keer: सुगरण शुभांगीताई

शुभांगी कीर (Shubhangi Keer) मुळातच सुगरण. त्यात जेवण बनवण्याची, सजवण्याची आणि खाऊ घालण्याचीही त्यांना फार आवड. त्यांच्या याच आवडीमुळे त्यांनी बनविलेल्या पदार्थांची खूप तारीफ होई. नात्यातले, शेजार पाजारचे त्यांच्या हातचं खायला, त्यांच्याकडून रेसिपीज घ्यायला येऊ लागले. आणि पुढे यु ट्युब सारखा मंच जेव्हा त्यांना मिळाला, त्यांनी त्या संधीचे सोने केले. आपली कला आणि त्याला मिळालेली अनुभवाची जोड या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत त्यांनी स्वतःचे यु ट्यूब चॅनल सुरू केले अत्यंत प्रेमळ भाषेत, गोड आवाजात, कोणताही पदार्थ शिकवताना कसलाही आव न आणता अगदी कळकळीने त्या रेसिपीज देऊ लागल्या आणि काही महिन्यातच यू टयुब वर प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या रेसिपीज जगभरातून पाहिल्या जाऊ लागल्या. आज शुभांगीताईंचे जगभरात fan following आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत, scripted नसलेला candid संवाद, जबाबदारीने अगदी बारीकसारीक सुचना देण्याची शुभांगी ताईंचा स्वभाव यामुळे सर्वच प्रेक्षकांना त्या अगदी आपल्याच घरातल्या वाटतात.

पूर्णवेळ गृहिणी असलेल्या शुभांगीताईंचा (Shubhangi Keer) सोशल मीडियाशी कोणताही संपर्क नव्हता. पण गेल्या पाच वर्षात त्या याच माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांशी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या घरच्या स्वयंपाकघराच्या माध्यमातून सगळ्या जगाशी जोडले जाऊ असं त्यांना कधी वाटलंही नव्हतं.

हे ही वाचा: तृप्ती मोकाशी कोलाबकर: ड्रीम प्लॅनेटचे ‘स्वप्न’ साकारणारी यशस्वी उद्योजिका

Shubhangi Keer: कशी झाली सुरुवात?

मूळच्या रत्नागिरीच्या शुभांगी कीर आणि आताच्या शिरवाडकर. लग्नाआधी आणि लग्नानंतर मुंबईत आल्यावरही स्वयंपाकाची सारी जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्या सांगतात की, “माझी आई खुपच सुगरण होती. तिच्या हाताखाली काम करता करता मी सर्व शिकले.”

काही वर्षांपूर्वी त्या आजारी पडल्या. या आजारपणामुळे त्यांना काहीच करता येणं शक्य नव्हतं. तरीसुद्धा त्या जमेल तसं काम करत होत्या. शुभांगीताईंची मुलगी प्रियांका स्वयंपाक करण्याइतपत मोठी झाल्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. रोजच्या साध्या रेसिपी त्यांनी तिला सांगितल्या. प्रियांकाने आईच्या रेसिपीचे चित्रीकरण करण्याचे ठरवले. कोणतेही महाग मोबाइल फोन किंवा कॅमेरा न वापरता अ‍ॅण्ड्रॉईड फोनमधून त्यांचा मुलगा ओमकार आणि मुलगी प्रियंका यांनी त्यांचे व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली. हे व्हिडीओज आपल्याकडे राहावेत आणि सोयीनुसार कधीही पुन्हा पुन्हा पाहता यावेत या एकमेव कारणासाठी प्रियांकानेच हे व्हिडीओज यूट्यूबवर अपलोड केले. आणि आश्चर्य म्हणजे ते व्हिडीओ अगदी काही वेळात जगभरातील प्रेक्षकांनी पाहिले. त्या म्हणतात की, “प्रेक्षकांच्या प्रतिसादाने मला खुपच आत्मविश्वास आणि बळ मिळाले. आजारपण विसरून मी नियमित रेसिपीजचे व्हिडिओज बनवू लागले. रेसिपीज शेअर करता करता मी प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग झाले आणि ते माझ्या आयुष्याचा भाग बनले. माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि कामाच्या व्यस्ततेमुळे मी आजारपणही विसरले.”

४.५० लाखांहून अधिक सबस्क्राइबर

आज शुभांगीताईंच्या Shubhangi Keer चॅनलचे ४.५० लाखांहून अधिक सबस्क्राइबर आहेत. आतापर्यंत त्यांचे दीड हजाराहून अधिक व्हिडीओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. यात पाककृतीच नाही तर त्यांचे vlogs, पुजा विषयक माहिती, कहाण्या, औषधांसंदर्भातील माहिती या सर्वाचा अंतर्भाव आहे.

घरगुती पाककृती आणि त्याही मराठीतून सोप्या पद्धतीने यूट्यूबवर करून दाखवणाऱ्या शुभांगीताईंचेच नाव आज सर्वश्रुत आहे.

एखादी वस्तू घरात नसली तर काय वापरावं हा सल्लासुद्धा त्या देतात. शिवाय आलेल्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतात. विशेष म्हणजे, याची दखल यू ट्यूबनेही घेतली आहे.

प्रेक्षकांशी नाते

शुभांगी यांचं यू ट्यूबवरील प्रेक्षकांशी खुपच आत्मीयतेचे नाते जुळले आहे. प्रेक्षकांच्या सूचना, विनंत्या, अभिप्राय जाणुन घेण्यासाठी त्या कायमच तत्परता दाखवतात.

वयाची 4 दशके जगाशी, सोशल मिडिया, कॅमेरे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क आलेला नसताना, याबाबतचे कोणतेही ज्ञान वा तंत्रज्ञान अवगत नसताना या महाराष्ट्र कन्येला संपूर्ण जगभरातून मिळणारे हे घवघवीत नेत्रदीपक यश नक्कीच इतरांना ही प्रोत्साहन देणारे आहे.

सकारात्मक विचार, चिकाटी, अखंड अविरत प्रयत्न या सर्वांच्या बळावर एखादी मध्यमवर्गीय घरातील महिला किती धडाडीने स्वतः च्या पायावर उभी राहू शकते हेच शुभांगी कीर यांनी दाखवून दिले आहे.

शुभांगी ताई, तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला आमचा सलाम!

वंदे महाराष्ट्र शुभांगी कीर रेसिपी स्पर्धा

वाचकहो, तुम्हाला शुभांगीताईंनी बनवलेली कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली, आणि त्या रेसिपी संबंधी एखादी आठवण तुमच्या ईमेल आयडी सह मोजक्या शब्दात लेखा खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहा. पहिल्या ५० वाचकांना ऑनलाइन सन्मानपत्र देण्यात येईल. ओमकार यांना वाचनाची खूप आवड आहे हे तर तुम्ही मागच्या एका vlog मध्ये पाहिलेच असेल, म्हणूनच निवडक लकी पाच वाचकांना पुस्तक भेटही पाठवण्यात येईल.

तुम्हा सर्वांना वंदे महाराष्ट्र तर्फे आणि संपूर्ण शुभांगी कीर परिवारातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभम भवतु!

प्रा. प्रज्ञा पंडित
लेखिका | कवयित्री | निवेदिका | समीक्षक
9320441116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *