Mohammed Shami | मोहम्मद शमी : तीनदा केला होता आत्महत्येचा विचार, आज देशाचा स्टार खेळाडू

Mohammed Shami

ठळक मुद्दे

Mohammed Shami | विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे तो आज देशाचा सर्वात मोठा स्टार खेळाडू बनला आहे. भारताच्या सेमी फायनल मधील विजयाच्या रात्रीपासून शमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. परिस्थिती अशी आहे की त्याने विराट कोहलीच्या 50 व्या शतकाच्या महान कामगिरीनंतरही सोशल मीडियावर शमीचाच बोलबाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शमीने टीम इंडियाला 7 विकेट्स मिळवून दिलेला विजय क्रिकेट जगताच्या नेहमीच लक्षात राहील. या संस्मरणीय कामगिरीमुळे शमीने अनेक जुने विक्रम मोडीत काढत आपले नाव कोरले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की आज देशाच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या या खेळाडूने एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. जर तुम्हाला हे माहित नसेल तर हा लेख नक्की वाचा.

भारताच्या आशेचे दुसरे नाव

‘मोहम्मद शमी’ हे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या आशेचे दुसरे नाव बनले आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे पण यावेळी मोहम्मद शमीने टीम इंडियाच्या गोलंदाजीची जबाबदारी एकट्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि टीम इंडियाला फायनलकडे नेत आहे. विकेट घेतल्यानंतर शमी हसतो, जमिनीवर पडतो, पण भारताला कधीही निराश करत नाही.

इंस्टाग्राम लाइव्हवर रोहित शर्मासोबत बातचीत

2020 मध्ये, जेव्हा संपूर्ण जगावर कोरोनाचा प्रादुर्भाव होता आणि सर्व प्रकारचे क्रीडा उपक्रम बंद होते, अशा वेळी मोहम्मद शमी इंस्टाग्राम लाइव्हवर रोहित शर्मासोबत जोडला गेला होता. हजारो भारतीय क्रिकेटरसिकही या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सामील झाले. या लाइव्ह चॅटमध्ये शमीने त्याची दुःखद कहाणी सांगितली होती. शमी जे काही बोलला त्यानंतर अनेक दिवस त्यावर चर्चा सुरू होत्या. यंदाच्या विश्वचषकातील त्याच्या तुफान कामगिरीनंतर त्याची ती मुलाखत पुन्हा एकदा व्हयरल होत आहे.

आयुष्यातला कठीण काळ

नेहमी चेहऱ्यावर मंद हास्य असलेल्या मोहम्मद शमीचे आयुष्य एखाद्या ट्रॅजीकचित्रपटापेक्षा कमी नव्हते. शमीच्या आयुष्याबद्दल कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल, ज्याने तीनदा स्वतःला संपविण्याची इच्छा मनात आणली होती. प्रत्येक खेळाडू वाईट टप्प्यातून जात असतो पण या गोलंदाजाच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याची क्रिकेट कारकीर्द किंवा वैयक्तिक आयुष्य दोन्हीही फार वाईट चालले होते.

अलीकडे, 2018 मध्ये, मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर घरगुती हिंसाचार, मारहाण, मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले होते. प्रकरण न्यायालयात पोहोचले. या वादांमध्येही शमीने आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर ठेवले होते.

इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान शेअर केल्या भावना

अनेकदा मीडियापासून दूर राहणाऱ्या शमीने २०२० मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान त्याच्या मनातील भावना जगासोबत शेअर केल्या होत्या. तो म्हणाला, “2015 च्या विश्वचषकात मला दुखापत झाली. यानंतर मला संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.

त्याने रोहितला सांगितले की, रिहॅबसाठी किती वेळ लागतो हे तुला माहीत आहे. त्याच वेळी मी कौटुंबिक समस्यांमधून जात होतो. दरम्यान, आयपीएलच्या १०-१२ दिवसांपूर्वी माझा अपघात झाला. माझ्या वैयक्तिक बाबींवर माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली होती.

तीन वेळा आत्महत्येचा विचार केला

मोहम्मद शमीने रोहितला सांगितले की, मला वाटते की जर मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नसता तर मी क्रिकेट सोडले असते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला. मी इतका उद्ध्वस्त झालो होतो की माझे कुटुंब खूप काळजीत पडले होते. माझे घर 24 व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना भीती होती की मी अपार्टमेंटमधून उडी मारून आत्महत्या करेन, त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी माझ्यावर लक्ष ठेवले.

माझे कुटुंब ही माझी ताकद

मोहम्मद शमी शमी म्हणाला की, माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. माझे कुटुंब ही माझी ताकद आहे. तो माझ्या सर्व समस्यांवर उपाय आहे. तो मला सांगायचा की तू फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या खेळात पूर्णपणे हरवून जा.

शमी म्हणाला, जेव्हा मी सराव करायचो तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. माझा भाऊ, माझे कुटुंबीय मला सांगायचे की तू फक्त खेळावर लक्ष दे. माझ्या अनेक चांगल्या मित्रांनी मला कठीण काळात साथ दिली. ते तिथे नसते तर कदाचित मी काहीतरी चूक केली असती.

विश्वचषकात शमीचा शानदार प्रवास

एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त विकेट्स घेणारे संपूर्ण जगात फक्त सात गोलंदाज आहेत. मोहम्मद शमीने नाव या यादीत झळकले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातला सातवा तर भारतातला पहिला गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने केवळ 17 सामने खेळला आहे आणि 51 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मोहम्मद शमीची खास गोष्ट म्हणजे तो आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान 50 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर होता. त्याने 19 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या पण शमीने मात्र केवळ 17 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सात विकेट

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात विकेट घेणाऱ्या शमीला आज भारत सलाम करत आहे. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात शानदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीची सर्वत्र चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याच्या या कामगिरी नंतर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमीने 9.5 षटकांत केवळ 57 धावा देत सात विकेट्स घेतल्या. सुरवातीचे दोन गडी शमीने बाद केले परंतु त्यानंतर धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत होता. त्या परिस्थितीत एका षटकात दोन गडी बाद करीत शमीने पुन्हा एकदा भारताला सुस्थितीत आणले. त्यांनंतर न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही. पुढे आणखी तीन गडी बाद करीत शमीने त्यांचा डाव संपविला आणि एकूण सात गडी बाद करीत सामनावीराचा पुरस्कार पटकाविला.

त्याचवेळी, अंतिम सामन्यापूर्वी शमीने या स्पर्धेत आतापर्यंत 23 विकेट घेतल्या आहेत.