fbpx

Savitribai Phule: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

Savitribai Phule

Savitribai Phule: काही व्यक्ती, काही प्रभृती ज्यांना आपण प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही, बघितले नाही तरीही, त्यांच्या बद्दल आपल्या मनात अत्यंत आदर असतो. कारण त्यांच्या कार्यरुपी पुण्याईच्या बळावर आपण आज आपल्याला हवे असणारे, सन्माननीय आयुष्य जगत असतो. ज्या माय मराठी भूमीत आपला जन्म झाला त्या आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक संत महंत, कर्तबगार – कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म झाला आहे ज्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. या महान व्यक्तींपैकी होत्या एक सावित्रीबाई ज्योतिबा फुले.

पाठयपुस्तकातील धड्यातून ओळख

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची खरी ओळख झाली ती पाठयपुस्तकातील त्यांच्यावर असलेला धडा शिकताना. इयत्ता सहावी मध्ये असताना, मराठी विषयात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या कर्तृत्ववान दाम्पत्याची, त्यांच्या कार्याची माहिती सांगणारा एक धडा होता. त्याआधीही काही गोष्टींच्या पुस्तकातून त्यांच्या विषयी, त्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाविषयी माहिती वाचली होती पण वर्गात तो धडा शिकताना त्यांच्याविषयी आदरभाव मनात दाटून आला होता जो आज अजूनही वृद्धिंगत होत आहे.आपले वैयक्तिक आयुष्य सुखासीन नसताना, आपण स्वतःच खडतर पायवाटेवरून चालत असताना, स्वतः पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणारे हे महान दाम्पत्य वंदनीय आहे हे तेव्हाच कोणी न शिकवता, न सांगता तेव्हाच्या बालबुद्धीला उमजले.

समाजसुधारक, कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका, विद्याग्रहण करणारी पहिली महिला आणि तत्कालीन समाजातील महिलांच्या मुक्तिदाता अशा सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता व्यतीत केले. समाजाचा प्रखर विरोध असताना त्यांनी हार न मानता आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला जाऊन यश मिळवले.

Savitribai Phule: बालपण आणि शिक्षण

सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या लक्ष्मी आणि खंडोजी नेवासे पाटील यांच्या धाकट्या कन्या होत्या. हे दोघेही माळी समाजातील होते. सावित्रीबाईंना तीन भावंडे होती. सावित्रीबाईंचे लग्न त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्याशी वयाच्या ९ किंवा १० व्या वर्षी झाले. ज्योतिबा फुले तेव्हा फक्त १३ वर्षांचे होते.

लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाई आणि त्यांची चुलत बहीण सगुणाबाई शिरसागर यांना घरी आणि त्यांच्या शेतात काम करून शिक्षण दिले. ज्योतिरावांकडे तिचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी त्यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्यावर होती. त्यानंतर त्यांनी दोन शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केले. पहिला अभ्यासक्रम अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होता आणि दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये होता. तो काळ सामाजिक, शैक्षणिक दृष्टीकोनातुन स्त्री शिक्षणासाठी पोषक काळ नव्हता. म्हणूनच सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिबांच्या परिवाराकडून देखील विरोध केला गेला. जुन्या चालिरीतींचा पगडा असल्याने आणि समाजाच्या भितीने त्या दोघांना कुटुंबापासून विभक्त व्हावे लागले. पण तरी त्या नंतरही ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले. इतक्या विरोधानंतर न खचता देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.

शिक्षणाचा उपयोग महिलांना शिक्षीत करण्याकरता

शिक्षण पुर्ण केल्यानंतर या अध्यायाला तिथेच त्यांनी पूर्ण विराम दिला नाही. तर, या शिक्षणाचा उपयोग समाजातील इतर महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा पवित्र विचार सावित्रीबाईंनी केला. हे अमलात आणणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची अनुमती नव्हती आणि नेमक्या याच रूढी, गैरसमज, परंपरा, अंधश्रद्धेला मुळापासून उपटून काढण्यासाठी सावित्रीबाईंनी खुप संघर्ष केला आणि सावित्रीबाईंनी पती ज्योतिबांची त्यांना कायम साथ लाभली. सावित्रीबाईंनी सगुणाबाई क्षीरसागर यांच्यासोबत पुण्यातील महारवाड्यात मुलींना शिकवायला सुरुवात केली. भिडे वाडा हे तात्यासाहेब भिडे यांचे घर होते, जे या तिघांच्या कार्याची प्रेरणा होते. भिडे वाडा येथील अभ्यासक्रमात गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यास या पारंपारिक पाश्चात्य अभ्यासक्रमाचा समावेश होता.

पहिली मुलींची शाळा

सावित्रीबाईंनी 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा म्हणजे भारतातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. येथे एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या. कालांतराने या शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती हे विशेष नमुद करण्याजोगे!

समाज कंटकांचा त्रास

हा सामाजिक कार्याचा त्यांचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला. रस्त्याने जाताना सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे. शाळेत जाताना त्या अतिरिक्त साडी बरोबर घेऊन जात. त्यांना समाज कंटकांनी खूप त्रास दिला पण तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्री शिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली. समाज प्रबोधन आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.

१८५१ च्या अखेरीस सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले पुण्यात मुलींसाठी तीन वेगवेगळ्या शाळा चालवत होते. एकत्रितपणे, तिन्ही शाळांमध्ये अंदाजे एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला. यानंतर फक्त शैक्षणिकच नाही तर, सामाजिक सुधारणा उपक्रमात देखील त्या हिरीरीने कार्यरत राहिल्या. विधवांची सामाजिक परिस्थीती सुधारावी, त्यांना मानाने जगता यावे म्हणुन, बालकांच्या हत्या थांबाव्यात म्हणुन त्यांनी आश्रमाची उभारणी केली.

हे ही वाचा: शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

लेखिका सावित्रीबाई

सावित्रीबाई अतिशय संवेदनशील मनाच्या होत्या. त्यांचे हे संवेदनशील, हळवे मन त्यांच्या कवितेतून त्या व्यक्त करत गेल्या. “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर” यात त्यांच्या काव्यरचना आज देखील अजरामर आहेत.

निधन

ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा खचून न जाता, समाजासाठी त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला पुण्यात “प्लेगची” साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा त्या करीत राहिल्या. त्यातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

स्त्री शिक्षणाचे श्रेय सावित्रीबाईंनाच

आज सर्वच क्षेत्रात महिला, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्या ही चार पावले पुढे जाऊन आपली शक्ती – बुद्धी या सर्वांचा कस लावून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आणि आजच्या या प्रत्येक स्त्रीकर्तृत्वाचे श्रेय फक्त सावित्रीबाई यांनाच जाते.

आताच्या काळातली आपण सर्वच माणसे, अगदी स्वाभाविकपणे स्व मग्न आयुष्य जगत आहोत. मी, माझे, मला, आम्ही, आमचे, आम्हाला या व्यतिरिक्त फार क्वचितच इतर कोणत्या शब्दाने आपल्या दैनंदिन आयुष्यात संवाद घडत असतो. मग या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण काळाच्या चार पाच दशके मागे जाऊन तेव्हाच्या मनुष्य स्वभावाच्या या पैलूंचा अभ्यास करतो तेव्हा आ वासून थक्क होऊन विचार करत राहण्या पलीकडे फारसे काही हातात उरत नाही.

सावित्रीबाई म्हणायच्या, वेळ विनाकारण व्यर्थ घालवु नका जा आणि शिक्षण प्राप्त करा! हे त्या काळी जेव्हा कोणतीही अद्ययावत तंत्रज्ञान, साधने, दळणवळण यंत्रणा उपलब्ध नव्हती तेव्हा त्यांनी केलेले हे सुज्ञ विधान! आज मोबाईलच्या, कॉम्प्युटरच्या माध्यमातून शिक्षणाची कितीतरी कवाडे आपल्यासाठी घरबसल्या खुली आहेत. घरगुती कामात वेळ वाचावा म्हणून कितीतरी यंत्र आपल्या घरात सज्ज आहेत. तरी देखील, वेळ नाही या नावाखाली कित्येक महिलावर्ग आपली बुद्धी, आपल्यातली उपजत कला, शिक्षणाची संधी हिमती अभावी दवडत आहेत. ही हिंमत कुठल्याही गोळ्या, औषधांनी खचितच येणार नाही. एकदा तरी कृतज्ञ होऊन आपल्याला शिक्षण घेता यावे यासाठी पदरावर शेण, चिखल झेलत, अनंत अडचणी सहन केलेल्या सावित्रीबाईंचे स्मरण केले तरी दहा हत्तीचे बळ मिळेल एवढे आशीर्वाद बाईंचे आपल्यावर आहे.

समाजाप्रती सावित्रीबाईंचे हे कार्य अतुल्य आहे आणि ते आपल्या कायम स्मरणात राहील.