fbpx

Karmaveer Bhaurao Patil: शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

Karmaveer Bhaurao Patil:

Karmaveer Bhaurao Patil: आजन्म शैक्षणिक आणि अध्ययन व्रत घेतलेले आणि देव दगडात नाही तर माणसात शोधावा असे ज्ञानामृत पाजणारे “शिक्षणमहर्षी” म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील” (Karmaveer Bhaurao Patil) यांची २२ सप्टेंबर ही जयंती. या निमित्ताने हा त्यांच्याविषयी शब्दांजलीपर लेख!

Karmaveer Bhaurao Patil: शिक्षण प्रसारासाठी सतत प्रयत्नशील

शतकभरापूर्वीच त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखून समाजातील प्रत्येक स्तरात शिक्षण प्रसार व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील आणि कार्यरत असलेले शिक्षणसम्राट म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील आणि आईचे नाव गंगाबाई असे होते भाऊरावांचे बालपण कुंभोज, तासगाव, दहिवडी विटा यासारख्या गावी गेले. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या सतत बदल्या होत असत.

भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी, विटा या गावी झाले. विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खासगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजीचे शिक्षण झाले. विटा येथील शाळेतून पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये करण्यासाठी येथे दाखल झाले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती व राजाराम हायस्कूलमध्ये ते शिक्षण घेऊ लागले. तेथे भाऊरावांना छत्रपती शाहू महाराज यांचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर ठसला. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.

त्यानंतर त्यांनी ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून त्यांनी काम केले. आपल्या कामानिमित्ताने त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करण्याची संधी त्यांना मिळाली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा त्यांचा खाक्या होता.

दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. समाजप्रबोधनासाठीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये भाऊरावांनी सहभाग घेतला.

लोकशाही प्रधान राष्ट्राचा प्रथम महत्त्वाचा घटक म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता होय. हाच घटक विकसनशील आणि प्रगतीशल देश घडवतो हे कर्मवीरांना ज्ञात होते. आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या हयातीत शिक्षणाची कास सोडली नाही. अज्ञान आणि अंधश्रध्दा यामुळे समाजाची अधोगती होत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक विकासाचा विडा उचलला.

हे ही वाचा: पद्मश्री दुर्गा खोटे : ‘शाही’ व्यक्तिमत्वाची आई

दुधगाव विद्याप्रसारक मंडळाची स्थापना

सन १९१० मध्ये त्यांनी दुधगाव येथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने ‘ दुधगाव विद्याप्रसारक मंडळ ‘ या नावाची संस्था स्थापन केली. तिच्यामार्फत ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम‘ हे वसतिगृह चालू केले . या वसतिगृहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे सर्व जातिजमातींचे विद्यार्थी एकत्र राहत असत. पुढे दुधगावच्या धर्तीवर नेर्ले (१९२१) व काले या गावीही कर्मवीरांनी वसतिगृहे सुरू केली.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना

५ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांनी सातारा जिल्ह्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. कष्ट, स्वावलंबन आणि समानता या तीन प्रमुख तत्वांवर त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला होता. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे, जाचक आणि अयोग्य रूढी – परंपरा दूर करणे, वेगवेगळ्या जाती धर्म पंथ समुदाय यामधील विद्यार्थ्यांमध्ये निकोप मैत्री भावना निर्माण करणे, मुलांना स्वावलंबन शिकवणे, अशा उद्दिष्टांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या वसती गृहामध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत. ते सर्वजण स्वतःच्या हाताने सर्वांसाठी स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत. अशी दैनंदिनी आखून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला.

  • वर्तमान उपलब्ध माहितीनुसार संस्थेच्या तब्बल 739 शाखा असून त्यामध्ये सुमारे 16 हजार 172 कर्मचारी कार्यरत आहेत.
  • रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार संस्थेच्या 438 शाळा (त्यापैकी 26 मुलींच्या शाळा), 17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालय, 80 वसतीगृह (त्यापैकी 29 मुलींचे वसतीगृह) तसंच 8 आश्रमशाळा आहेत.
  • यामध्ये सध्या सुमारे 4 लाख 50 हजार विद्यार्थी रयत शिक्षण संस्थांच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.

१६ जुलै, १९३५ रोजी कर्मवीरांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथेच ‘ सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज ‘ सुरू केले.

1959 मध्ये त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रपतींकडून “पद्मभूषण’ हा किताब मिळाला. पुणे विद्यापीठाने “डी.लिट.’ ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

एकवेळ जन्मदात्या वडिलांचे नाव बदलीन पण वसतीगृहाला दिलेलं “ छत्रपती शिवाजी महाराजांचे ” नाव बदलणार नाही असे ठामपणे सांगणारे “कर्मवीर भाऊराव पाटील” यांच्या कार्याचे आवाका अफाट आहे. परंतु आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करून थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी आणि आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील भारताच्या नवीन पिढीला त्यांची माहिती करून देण्यासाठी हा लेख प्रपंच.

प्रज्ञा पंडित
ठाणे