Re Manaa | रे मना… डॉ. सुचित्रा नाईक यांचे ‘मनाला’ भिडणारे पुस्तक!

Re Manaa | रे मना : आयुष्य सर्वच स्तरावर गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक झाले आहे. ताण तणाव पदोपदी आणि क्षणोक्षणी आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बाब सर्वच वयोगटात लागू होत आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक सर्वानाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
आधुनिक जगातल्या समस्यांवरचा प्रभावी उपाय म्हणजे समुपदेशन
आधुनिक जगात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या युगात व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी जी गोष्ट आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते ते म्हणजे ‘समुपदेशन’ होय.
‘समुपदेशन’ हा मार्गदर्शन प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग समजला जातो. ही एक अर्वाचीन संकल्पना आहे ज्याला ‘सहमंत्रणा’ असे देखील म्हटले जाते. समुपदेशनादरम्यान व्यावसायिक , वैयक्तिक अशा कोणत्याही स्तरावरील समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. आजच्या काळात समाजात ‘ समुपदेशकांचा सल्ला घ्या ‘ हे अगदी सहजपणे सुचवले जाते आणि तितक्याच सहजपणे ते अमलात देखील आणले जाते.
नवा साहित्य प्रवाह
समुपदेशकांची प्रत्यक्ष भेट घेण्याआधी किंवा समुपदेशनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या विषयावरील पुस्तके वाचण्याकडे वाचकांचा कल असल्याचे दिसून येते. त्यामुळे कथा, कादंबरी, ललित लेख, प्रवास वर्णन यासारख्या प्रचलित पर्यायांमध्येच ‘समुपदेशन’ हा एक नवा साहित्य प्रवाह रुजू होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते.
याच विषयावर आधारित असलेले ‘शारदा प्रकाशन’ तर्फे प्रकाशित लेखिका आणि जोशी बेडेकर महाविद्यालय प्राचार्या डॉ. सुचित्रा आशिष नाईक लिखित ‘रे मना’ हे पुस्तक नुकतेच वाचकांच्या भेटीला रुजू झाले आहे. लेखक प्रवीण टोकेकर यांची ‘मन की बात’ या लक्षवेधी शीर्षकासह परिपूर्ण प्रस्तावना ‘रे मना’ या पुस्तकाला लाभली आहे.
मुखपृष्ठकार सतीश खोत यांनी तरल रंगात रेखाटलेले पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय मनोवेधक आहे.
डॉ. नाईक यांचे समुपदेशन कार्य
लेखिका सुचित्रा नाईक स्वतः ठाण्याच्या प्रख्यात जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात प्राचार्या हा पदभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. आधुनिकीकरण जसे इतर क्षेत्रात झाले तसे ते शैक्षणिक क्षेत्रात देखील झपाट्याने झाले. या दरम्यान विद्यार्थी, त्यांचे स्वभाव, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षाही बदलत गेल्या. हे सर्व बदल वेळोवेळी समजून घेऊन, त्यानुसार शैक्षणिक आणि अध्यापन प्रणालीत योग्य ते बदल घडवत, मुख्य म्हणजे स्वतःलाही त्या बदलांमध्ये सामावून घेत समुपदेशनाचे कार्य लेखिका डॉ. नाईक मॅडम अव्याहतपणे करत आहेत.
आपला पदभार सांभाळत शैक्षणिक, व्यावसायिक जबाबदारी सांभाळत सातत्याने सुरू असलेल्या समुपदेशन कार्यातील त्यांच्या अमूल्य आणि प्रदीर्घ अनुभवांचा ठेवा समाजातील सर्व घटकांना आणि अर्थातच येणाऱ्या नवीन पिढीला झाला तर अनेकांच्या मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शनपर ठरणार आहे.
आणि म्हणूनच, लेखिका डॉ. नाईक यांनी आपल्या या सर्व प्रगल्भ अनुभवांमधील एक शिदोरी ‘ रे मना ‘ या लेख संग्रहाद्वारे वाचकांसाठी प्रकाशित केली आहे.
हे ही वाचा : डॉ. सुचित्रा नाईक यांच्या ‘रे मना ‘ या पुस्तकाचे प्रकाशन
आयुष्य जगण्याचा मंत्र
पुस्तकाचे शीर्षकच लक्षवेधी आहे. ‘ रे मना ‘ – (तंत्र आणि मंत्र). समुपदेशनाद्वारे अधिक सक्षम बनता येते आणि सक्षमतेने आयुष्य जगणे हाच जगण्याचा मंत्र आहे हे लेखिका येथे सांगू इच्छित असल्याचे निदर्शनास येते. पुस्तकाच्या अंतरंगात लेखिकेला समुपदेशन कार्यात भेटलेल्या व्यक्ती आणि वल्ली यांचे अनुभव वाचायला मिळतात. त्याच बरोबर वाचनीय अशा झेनकथा आहेत. काही वाचकांना प्रश्न पडेल झेन कथा म्हणजे काय? तर झेन कथा म्हणजे जपानी संस्कृतीतील बोधपर तरल कथा! पुस्तकातील झेन कथा वाचता वाचता बरेचदा आपल्याही मनातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात. कोणतीही समस्या अस्तित्वात येण्यामागे त्याची काही कारणमीमांसा असते, मर्म असते. पुस्तकातील कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा या सर्वाचा उलगडा कसा होऊ शकतो हे समजत जाते.
समुपदेशनाचे अनुभव
पुस्तकाच्या सुरुवातीच्या लेखात वाचकांना एक शब्द नक्की भावेल तो म्हणजे ‘शुभार्थी’! ज्या व्यक्तीचे समुपदेशन करावयाचे आहे त्या व्यक्तीला संबोधून लेखिकेने ‘शुभार्थी’ ही संज्ञा वापरली आहे.
पुस्तकात समुपदेशनाचे अनुभव अंतर्भूत करताना लेखिका म्हणतात, ‘हे अनुभव आणि त्यावर केलेले समुपदेशन हे सर्वकालिक उपाय असल्याचा दावा हे पुस्तक करत नसले , तरी ते शास्त्रीय विद्याशाखांचा, विचार प्रणालीचा आणि सांस्कृतिक संचितांच्या भक्कम आधाराद्वारे त्या त्या वेळी, त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ठ्य अनुसार, त्याच्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती अनुसार केलेले समुपदेशन आहे.
लेखांविषयी थोडेसे…
‘ जगण्याच्या उंबरठ्यावर ‘ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात रोहित आणि स्नेहा नामक दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या समस्येची दोन प्रातिनिधिक उदाहरणे वाचायला मिळतात. समुपदेशनात या केसेस कशा हाताळल्या जातात ते वाचायला मिळते. वाचतानाच आपल्याही आजूबाजूला असलेले असे अनेक रोहित, स्नेहा आपल्या नजरेसमोर येतात.
त्या पुढच्याच ‘ बॅकस्टेज ‘ या लेखात दीपाली या महाविद्यालयीन तरुणीची आयुष्याच्या प्रवासात अनवधानाने झालेली ससेहोलपट समुपदेशकांच्या नजरेतून वाचायला मिळते.
पुस्तकातील ‘ वळणावरचा प्रवास ‘, ‘ माता न तू वैरिणी’ ‘ फिरता रंगमंच ‘ असे यापुढचे सर्वच लेख वाचकाला मनोमन कधी स्तब्ध करणारे, कधी विचार करायला लावणारे, कधी आत्म मग्न करणारे आहेत.
शाळा कॉलेज मध्ये असताना आपल्याला ‘ गाईड ‘ नामक पुस्तक नेहमी हवे असते. ज्यात धड्यातील सर्वच प्रश्नांची यथासांग उत्तरे असतात.
आयुष्याचे ‘ गाईड ‘
‘ रे मना ‘ हे पुस्तक माझ्या मते आपल्या आयुष्यासाठी असणारे ‘ गाईड ‘ आहे. ज्यात कधी आपल्या, कधी आपल्या मुलांच्या, कधी भावंडांच्या तर कधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या वागण्याची उत्तरे मिळतील, त्यांच्या समस्या कळतील.
तर, डॉ. प्रा.संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशन तर्फे प्रकाशित, लेखिका प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक लिखित ‘ रे मना ‘ या पुस्तकाची पहिली आवृत्ती सर्व ऑनलाइन पुस्तक विक्री मंचावर सुरू आहे. शारदा प्रकाशनच्या अधिकृत वेबसाईट (https://sharadaprakashan.com) वरही हे पुस्तक उपलब्ध आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
थोडक्यात मी ही तुम्हाला पुस्तक ओळख करून दिली आहे, ही वाचल्यावर ‘ पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा ‘ हे वेगळं आवाहन न करताच मला खात्री आहे की आपण वाचक उत्सुकतेने हे पुस्तक नक्की विकत घ्याल आणि तुमच्या संग्रही निरंतर ठेवाल! लेखिका महोदयांना,प्रकाशकांना तुमची प्रतिक्रिया , अभिप्राय नक्की कळवा.
पुस्तक उपलब्ध न झाल्यास तसेच अधिकची मागणी नोंदवण्यासाठी जरूर संपर्क करा.
प्रा.प्रज्ञा पंडित
तेजस्वी महाराष्ट्र ग्रंथ वितरण संस्था, ठाणे
9320441116