fbpx

Re Manaa by Dr. Suchitra Naik: डॉ. सुचित्रा नाईक यांच्या ‘रे मना ‘ या पुस्तकाचे प्रकाशन

Re Manaa by dr suchitra naik

Re Manaa by Dr. Suchitra Naik: ठाणे येथील जोशी – बेडेकर कला – वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांचे ‘ रे मना ‘ या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयातील ‘कात्यायन’ सभागृहात नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ.विजय बेडेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश उमाटे, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, डॉ. संतोष राणे, डॉ. विमुक्ता राजे इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता नाहीशी झाली

“माझे वडील डॉक्टर होते.त्यावेळी अनेक पेशंट बाबांकडे यायचे. आजाराव्यतिरिक्त अनेक गप्पा व्हायच्या. अनेक गोष्टींवर त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. सतत संवाद सुरु असायचा. मी डॉक्टर झाल्यावर सुद्धा अनेक कुटुंबे फॅमिली डॉक्टर म्हणून आमच्याशी जोडलेली होती.पण प्रवाहाच्या चक्रात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नाहीशी झाली. त्यामुळे संवाद थांबला. हा संवाद सुरु करण्याचे सामर्थ्य प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांचे ‘रे मना’ हे पुस्तक यशस्वीपणे करेल,” असा विश्वास विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केला.

जोशी – बेडेकर कला – वाणिज्य महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमीतर्फे ‘कात्यायन’ सभागृहात आयोजित केलेल्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या ‘रे मना ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश उमाटे, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, डॉ. संतोष राणे, डॉ. विमुक्ता राजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

खरे समुपदेशन घरातच

यावेळी बोलताना डॉ. विजय बेडेकर यांनी परस्परातील संवाद फार महत्वाचा असल्याचे सांगून खरे समुपदेशन घरातच होऊ शकते.जीवनातील खरे मार्गदर्शन घरातील सदस्य करीत असतात.विद्यार्थ्यांचे घर आणि शैक्षणिक क्षेत्र यामधील संवाद फार महत्वाचा आहे.संवादातून अनेक गोष्टी बोलल्या जातात. मानसिक आरोग्यासाठी संवाद फार महत्वाचा आहे. आपल्या महाविद्यालयातून हा संवाद उत्तमरित्या साधला जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे पुस्तक

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मानसोपचार तज्ञ डॉ. शैलेश उमाटे म्हणाले ,”प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक असून समुपदेशनाच्या अनेक गोष्टी या पुस्तकात आलेल्या आहेत. तरुणाईचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न डॉ.सुचित्रा नाईक यांनी केला आहे.त्यामध्ये त्या पूर्णपणे यशस्वी झालेल्या आहेत.”

“मानसिक आजार बरे करण्यासाठी नुसती ट्रीटमेंट करून उपयोगाचे नाही तर सुदृढ मन, निरोगी मन कसे निर्माण करता येऊ शकते याची संवादी पाऊलवाट या पुस्तकात आहे. विद्यार्थ्यांच्या भाषेत त्यांना समजून घेणारे हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याबरोबरच पालक आणि शिक्षकांनी वाचण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.”

हे ही वाचा : ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाचे शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रकाशन

‘प्रज्ञा परिसर’ साठी झालेली महाविद्यालयाची निवड अभिमानास्पद

“माझे कुणीतरी ऐकून घेईल, मला योग्य रस्ता दाखवेल, हा विश्वास समुपदेशन करताना अतिशय महत्वाचा असून यामधूनच संवादाची सुरुवात होते.” असे सांगून प्राचार्या लेखिका डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या, “संत साहित्यामध्ये अनेक ठिकाणी मनाचा विचार मांडलेला दिसतो. संत एकनाथांच्या भारुडामध्ये मानवी मनाचा विचार मांडलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांच्या मनातील अनेक आंदोलने समजून घेता आली. त्याला योग्य दिशा देता आली. याचे श्रेय आपल्या महाविद्यालयाला आहे. या प्रवासातच ‘रे मना’ या पुस्तकाची संकल्पना सुचली. सभोवतालच्या भौतिक परिस्थितीचा विचार करताना मानवी मनाचाही आपण अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. प्रज्ञा परिसर साठी आपल्या महाविद्यालयाची निवड झाली हा आपल्या दृष्टीने अभिमानास्पद टप्पा आहे.”

पाहुण्यांची भाषणे आणि सन्मान

यावेळी डॉ. विमुक्ता राजे, प्रा. वेदवती परांजपे, शारदा प्रकाशनचे डॉ. संतोष राणे यांचीही भाषणे झाली. यावेळी स्टाफ अकॅडमीतर्फे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या छाया कोरे, पर्यवेक्षिका प्रा. अंजली पुरंदरे, प्रा.अदिती पाटगांवकर , डॉ. विनोद चांदवानी, चित्रकार सतीश खोत यांचाही पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

प्रा.रुपेश महाडिक यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. राजश्री जाधव यांनी आभार मानले. यावेळी अनेक प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.