fbpx

नवीन वर्षाचे आगमन: १ जानेवारी 

नवीन वर्षाचे आगमन

सिंहावलोकन १ जानेवारी 

जुने वर्ष सरेल..नवीन वर्ष येईल! साल, वर्ष, महिना बदलत राहील. काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, आणि थांबूही नये. कारण साचलेल्या पाण्यापेक्षा प्रवाही पाणीच कायम नितळ,स्वच्छ राहते आणि निसर्ग नियमाप्रमाणे सागरात विलीन होते.

वर्षाचा पहिला आणि शेवटचा दिवस ह्यातला काळ म्हणजे आपणच आपल्याभोवती पृथ्वी सारखी स्वप्रदक्षिणाच आहे. वर्षभरात आलेले सुखदुःखाचे प्रसंग, आपण काय कमावलं, काय गमावलं याचा हिशोब आपण मनातल्या मनात नक्की मांडतो. काहींसाठी गेलेलं वर्ष खूप काही घेऊन गेलेलं असतं तर काहींसाठी खूप काही देऊन गेलेलं असतं! कधीकधी आलेलं दुःख जन्मभरासाठी बरंच काही हिरावून नेतं तर कधी अनपेक्षितरित्या आलेलं सुख पुढे  जगण्याची उर्मी देऊन जातं. आणि तुम्ही सुखाच्या उत्तुंग शिखरावर असा की दुःखाच्या भवसागरात असा, तुम्हाला दिलेले श्र्वासांचे आकडे पूर्ण करूनच तुम्हाला इकडून मुक्ती मिळणार आहे त्यामुळे सुख असो वा दुःख – दोन्ही प्रसंगी आपण खचून जात किंवा गर्वाने फुलून जात नाही आहोत ना ह्याच मात्र सिंहावलोकन करायला हवं! कारण रावाचा रंक आणि रंकाचा राव होण्यात वेळ लागत नाही. 

माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर, पहिल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असलेल्या प्रवासात आपणही काळाबरोबर चालणे हेच श्रेयस्कर आहे! वाटेत येणाऱ्या अडीअडचणीच्या प्रसंगी ठेच लागल्यावर थोडा वेळ थांबणे, अडकणे स्वाभाविक आहे पण तरी कधी थोडे झुकते घेऊन तर कधी ताठ कण्याने स्वतःलाच सावरून, कधी स्वतःलाच माफ करत आयुष्यात थोडासा यू टर्न घेऊन तर कधी स्वतःलाच स्वतःच्या कंफर्ट झोन बाहेर काढत भरधाव वेगात आयुष्यात पुढे जात राहणेच योग्य आहे कारण यामुळेच त्या वाहणाऱ्या नितळ पाण्यासारखे आपणही मनाने अधिकाधिक प्रगल्भ होत जाऊन.

हे ही वाचा: मकर संक्रांत १४ जानेवारी

नवीन वर्षाचे संकल्प

आपण सगळेच जण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला महत्त्वाचे वाटणारे आणि  शरीराचे आरोग्य चांगले राहावे म्हणून झोप-आहार – विहारातील शिस्त, व्यायाम हे संकल्प आपण करतच असतो. त्यातले   काही संकल्प पूर्ण होतात, तर काही हवेत विरून जातात.

पण याबरोबरच मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठीही काही संकल्प नक्की करूया!  जे संकल्प पूर्ण होत नाहीत त्याबद्दल आपण मनातल्या मनात खूप हळहळतो पण जे पूर्ण होतात त्याबद्दल स्वतःला शाबासकी मात्र देत नाही. आपल्या प्रत्येकाच्याच वर्तुळात आपल्यावर टीका करणारे, आपल्या चुका काढणारे, आणि त्या चुका नंतर विनाकारण लक्षात ठेवणारे अनेक लोक असतात आणि त्यांचे हे काम ते चोख बजावत असतात. आपण मात्र कासावीस होत वाट बघत राहतो, आपल्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत,मनात कोणतेही किल्मिष न ठेवत तोंड भरून आपले कौतुक करणाऱ्या चार शब्दांची! आणि नेमके तेच न मिळाल्याने आपण हिरमुसून बसतो.

म्हणूनच या वर्षी जे संकल्प कराल त्यात स्वतःच्या सगळ्या अचीवमेंट बद्दल स्वतःबद्दल, स्वप्नपूर्ती बद्दल, स्वतःच्या मन:शक्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त करूया! आपल्याला न आवडणाऱ्या, न येणाऱ्या, न झेपणाऱ्या अनेक गोष्टी आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक कुवती बाहेर करत असतो. त्यासाठी आपणच आपले आभार का मानू नये! Thank you आणि Sorry हे शब्द अगणित वेळा आपण जगाला उद्देशून बोलत असतो पण या शब्दांचे हकदार आपण स्वतःच आहोत, आपला अंतरात्मा आहे हे आपल्याला लक्षात का येत नाही! तुमच्यात असलेला तुमचा मूठभर जीव तुमची पहाडा एवढी कामे करत असतो, कधी शांत डोळे मिटून त्याच्या बद्दल कृतज्ञता आपण कधीच व्यक्त करत नाही. . सतत हळहळून किंवा जगाबद्दल रोष व्यक्त करून नकारात्मकता वाढवण्यापेक्षा हे चांगलेच, नाही का?

व्यक्त होऊया

येणाऱ्या या नवीन वर्षात इतर संकल्पाबरोबरच हा एक संकल्प करूया. स्वतःची सकारात्मकता आणि इच्छा शक्ती वाढवण्याचा संकल्प करू या! स्वतःच स्वतःशी  नक्की व्यक्त होऊया.

कारण असे केले तर समोर कोणतेही संकट उभे ठाकले तरी त्यातून तावून सुलाखून पुन्हा जोमाने त्या पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करायला आपण सज्ज असू. बरोबर ना! चला तर मग, इंग्रजी असो वा मराठी. कोणत्याही नव वर्षाची सुरुवात ह्याच संकल्पाने करूया!

हॅपी न्यू इयर! नव वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!