fbpx

Marathi Bhasha Din: मराठी भाषा दिन – 27 फेब्रुवारी

Marathi Bhasha Din

Marathi Bhasha Din:

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

– कुसुमाग्रज 

Marathi Bhasha Din: कधी साजरा केला जातो?

दरवर्षी  27 फेब्रुवारी हा दिवस  मराठी राजभाषा दिन (Marathi Bhasha Din) म्हणून ओळखला जातो. मराठी साहित्य सृष्टी चार दशकांपेक्षा अधिक काळ गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार म्हणून ओळखले जाणारे विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस. 

ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक 

साहित्यकार वि .स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक होते. कुसुमाग्रजांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.  कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. 

कुसुमाग्रजांचे साहित्य

कुसुमाग्रजांनी अनेक कसदार  कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे  लेखन केले. ‘विशाखा’ हा कवितासंग्रह आणि ‘नटसम्राट’ हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत.  मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या स्मृती महाराष्ट्र राज्यात राज्यसरकारकडून  प्रित्यर्थ आजचा हा दिवस मराठी दिवस (Marathi Bhasha Din) म्हणून साजरा केला जातो.  या दिवसाचे औचित्य साधून राज्यभर मराठी भाषा समुद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो.

मराठी भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. इसवी सन 1278 मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत ज्ञानेश्वर म्हणतात,

‘माझी मराठीची बोलू कौतुके,
परी अमृताहे पैजा जिंके’

अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले.

हे ही वाचा: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे

मराठी भाषेचे बदलते स्वरूप

जागतिकीकरणाच्या सध्याच्या युगात  शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात इंग्रजी आणि हिंदी भाषेचा प्रभाव वाढत आहे. काळाप्रमाणे मराठी भाषाही स्थळानुसारही बदलत गेली. मराठी बोलीभाषा आणि मराठी  प्रमाणभाषा असेही याचे भाग दिसून येतात.  तरीही मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे.

अर्थव्यवहाराचे जागतिकीकरण होत असताना जगातील विविध भाषिक लोक व्यापार आणि इतर व्यवहारांसाठी मराठी भाषिकांच्या संपर्कात येती आहेत. त्यामुळे या सर्व भाषांतील शब्द नियमित व्यवहारातल्या बोली भाषेत सर्रास वापरले जात आहेत. त्यामुळे इंग्रजी आणि इतर भाषांतले अनेक शब्द आणि वाक्य हळू हळू आपल्या भाषेत येत आहेत, रूढ होत आहेत आणि मिसळूनही जात आहेत. असे असले तरी आपली भाषा अजून जिवंत आहे आणि समृद्ध होत आहे.

अशा परिस्थितीत मराठी  भाषा ही  बोली भाषेत, लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे  आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी आवर्जून  प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि म्ह्णूनच  हा दिवस साजरा करून मराठी भाषेप्रती आपली कृतज्ञता आपण जरूर  व्यक्त करूया.