Kharteshwar Nagpanchami: खारटेश्वर मंदिरातला नागपंचमी सण

Kharteshwar Nagpanchami: श्रावणातल्या कहाण्याचे वाचन, नागपंचमीच्या नैवेद्याचे पुरणाचे दिंडे, मंगळागौरीचे पूजन, शुक्रवारची जिवतीची आरती , गणपती, गौरी, आषाढी कार्तिकी एकादशी आणि एकूणच असा धार्मिक उत्सवाने खच्चून भरलेला चातुर्मास अतिशय उर्जादायी वाटतो. त्यातीलच नागपंचमी निमित्त हा आजचा लेख!

माझे आजोळ

जळगाव जिल्ह्यात अमळनेर हे माझे आजोळ. शांत, निवांत असे हे तालुक्याचे ठिकाण. संत सखाराम महाराज ह्यांची कर्मभूमी! या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातल्या बोरी नदीच्या काठी खारटेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे.  माझे आजोबा, म्हणजे आईचे वडील कै. पंडितराव पातूरकर हे एक करारी, अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व! माझं लग्न ठरलं तेव्हा माझं लग्नानंतरचं आडनाव आणि माझ्या आजोबांच्या खुद्द नावातील साधर्म्य साधणारा हा नावाचा योगायोग मला फार आवडला.

व्यवसायाने भांड्यांचे दुकानदार असले तरी कायम त्यांनी व्यवहारी वृत्तीने नाही तर भावनिक वृत्तीनेच व्यवसाय केला. त्यामुळे पैशापेक्षा माणसे अधिक कमावली. ते एक मनस्वी शिवभक्त होते. जन्मभर त्यांनी मनोभावे शंकराची उपासना, पूजा अर्चा, श्रावणी सोमवार व्रत, उपवास केले.

हे ही वाचा: जागतिक विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी

Kharteshwar Nagpanchami: मंदिरातला नागपंचमी सण

1962 साली अमळनेरच्या खारटेश्वर मंदिरात कृतज्ञता प्रीत्यर्थ त्यांनी हा तांब्याचा विशालकाय नाग अर्पण केला. तेव्हा पासून दर नागपंचमी सणाला हा नाग घरी आणून मंदिरातील गुरुजींकडून या नागाची यथासांग पंचोपचारे पूजा (Kharteshwar Nagpanchami) करण्यात येते. आता आजोबा जाऊन पंचवीस वर्षे झाली. पण ही परंपरा आणि त्यांचा पूजेचा वसा गावी माझे मामा मामी अजूनही सातत्याने जपत आहेत. आधीच्या पिढीचा भक्तिभाव, श्रद्धा, उपासना आपल्या परीने यथाशक्ती यथामती त्यांच्या पश्चातही पुढे अविरत सुरू ठेवणे हीच आपली खरी संस्कृती आहे, परंपरा आहे.

तर, यंदाच्या अमळनेरच्या या पूजेचे हे साठावे वर्ष म्हणजेच षष्ट्यब्दीपूर्ती गौरव वर्ष आहे. या निमित्ताने तुम्हा सर्वांना या पूजेचे दर्शन घडावे यासाठी हा लेख आणि फोटो प्रपंच.

– प्रा. प्रज्ञा पंडित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *