fbpx

Marathi Aarti Sangrah | मराठी आरती संग्रह

Marathi Aarti Sangrah

ठळक मुद्दे

आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात या पुस्तकातल्या आरत्या आता डिजिटल स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. नेहमी म्हणण्यात येणाऱ्या काही आरत्यांच्या या संग्रहात समावेश केला गेला आहे.

Marathi Aarti Sangrah : मराठी आरती संग्रह

सुखकर्ता दुःखहर्ता (#Sukhakarta Dukhaharta)

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।। 

शेंदुर लाल चढ़ायो (Shendur Lal Chadhayo)

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ १॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥

भावभगत से कोई शरणागत आवे।
संतत संपत सबही भरपूर पावे।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥

नाना परिमळ (Nana Parimal)

नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । 
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । 
अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति । 
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । 
त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती ।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । 
सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । 
किर्ति तयांची राहे जोवर शशितरणी ।
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । 
गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥३॥ जय देव..

ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा (Ovalu Aarti Shri Ganapati Omkara)

ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा l
औट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.ll
बिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा l
योगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ ll
पीतवर्ण आकारमात्रा  ब्रह्मसृजकारा l
उकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ ll
लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा l
अनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll

श्री दुर्गादेवीची आरती (Durge Durgat Bhari)

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। धृ० ।।

त्रिभुवन भुवनी पहाता तुज ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।। 

श्री शंकराची आरती / लवथवती विक्राळा (Lavthavti Vikrala)

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मल वाहे झुळझुळां ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।१।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शीत कंठ निळां
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।२।।

देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।
त्यामाजी अवचित हलाहल जें उठिलें ।
ते त्वां असुरपणे प्रशान केलें ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ||
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।३।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदास अंतरीं ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।४।।

श्री महालक्ष्मीची आरती (Mahalakshmichi Aarti)

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनि-माता
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरे जठरी जन्मविला धाता
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री निजबीजा निगमागम सारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं
वारी मायापटल प्रणमत परिवारी
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

जय देवी विष्णुकांते (Jaidevi Vishnukante)

जय देवी विष्णुकांते । महालक्ष्मी ग माते ।
आरती ओंवाळीन तुज विज्ञानसरिते ॥ जय. ॥ धृ. ॥

मर्दिला कोल्हासुर । ख्याती केली की थोर ॥
श्रीलक्ष्मी नाम तुझें ।दैत्य कांपती फार ॥ जय. ॥ १ ॥

धन्य तेथीचे नर । सकळही मुक्त होती ॥
तुजला पहातां सत्वर ॥ जय. ॥ २ ॥

रहिवास कोल्हापूरी । पंचगंगेच्या तीरी ॥
सुविशाळ सिंहासन ।विराजसी तयावरी ॥ जय. ॥ ३ ॥

मागणें हेंचि माये ।आतां दाखवी पाये ॥
उशीर नको लावू ।दास तुझा वाट पाहे ॥ जय. ॥ ४ ॥

रेणुकादेवीची आरती – जय जय जगदंबे (Jai Jai Jagadambe)

जय जय जगदंबे  |  श्री अंबे  |  
रेणुके कल्पकदंबे  जय जय जगदंबे ||  धृ ||

अनुपम स्वरुपाची |  तुझी घाटी |
अन्य नसे या सृष्टी |  तुझ सम रूप दुसरे | परमेष्टी ॥
करिती झाला कष्टी | शशी रसरसला | वदनपुटी |
दिव्य सुलोचन दृष्टी | सुवर्ण रत्नांच्या ॥
शिरी मुकुटी | लोपती रविशशी कोटी |
गजमुखी तुज स्तविले | हे रंभे
मंगल सकलारंभे ॥ जय जय ॥  १ ॥

कुमकुम शिरी शोभे | मळवटी |
कस्तुरी तिलक ललाटी | नासिक अति सरळ | हनुवटी  ||
रुचीरामृत रस ओठी | समान जणू लवल्या | धनुकोटी |
आकर्ण लोचन भ्रुकुटी | शिरी निट भांगवळी | उफराटी ॥
कर्नाटकाची घाटी | भुजंग नीळरंगा | परी शोभे
वेणी पाठी वरी लोंबे  ॥ जय जय ॥ २ ॥

कंकणे कनकाच्या | मनगटी |
दिव्य मुंद्या दश बोटी | बाजूबंद जडे | बाहुबटी ॥
चर्चुनी केशर उटी | सुवर्ण रत्नांचे हार कंठी |
बहु मोत्यांची दाटी |  अंगी नवचोळी | जरीकाठी ॥
पीत पितांबर तगटी | पैजण पदकमळी | अति शोभे |  
भ्रमर धावती लोभे || जय जय ॥३ ॥

साक्षात तू क्षितिजा | तळवटी |
तुज स्वये जगजेठी  | ओवाळीन आरती | दीपताटी  ॥
घेउनी कर समपुष्टी | करुणामृत हुदयी | संकष्टी |
धावती भक्तांसाठी विष्णू सदा | बहु कष्टी ॥
देशील जरी नीजभेटी | तरी मग काय उणे | या लाभे |
धाव पाव अविलंबे  ॥जय जय  ॥ ४ ॥

ओवाळू आरती कालीका अंबा (Ovalu Aarti Kalika Amba)

ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा।
मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।

अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी ।
अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।

भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा ।
सारासार निवडू जाता न दिसे थारा ।।2।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।

 काळातील कळानिधी पर्वती ठाण । अंबे पर्वती ठाण ।
भक्त शिवाजीसी दिधले पूर्ण वरदान ।।3।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।

चिच्छत्ते, चिन्मात्रे, चित्त, चैतन्य बाळे । अंबे चैतन्य बाळे ।
विठ्ठल सुतात्माजी दावी पुर्ण सोहाळे ।। 4 ।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।

एकवीरादेवी आरती (Aarti Ekvira)

आरती एकवीरा | देवी देई मज वरा ।
शरण मी तूजलागी| देई दर्शन पामरा | आरती एकवीरा || धृ.|| 

कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं||
कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही|| १ || आरती एकवीरा | 

चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ||
भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती || २ || आरती एकवीरा | 

दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ || आरती एकवीरा | 

हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ||
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता || ४ || आरती एकवीरा | 

तव पुजनीं जे रमती | मनोभावें स्मरोनी चित्तीं ||
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ || आरती एकवीरा | 

शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ||आरती एकवीरा | 

आरती गौरीची (Aarti Gaurichi)

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

जय देवी हरितालिके (Jai Devi Hartalike)

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।

हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।

रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।

तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें। शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।

लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।

काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण।।।5।।

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके ।

श्रीनवरात्र आरती (Udo Bola Udo Amba)

अश्विन शुद्ध शुक्लपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । 
प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवूनी हो । 
ब्रह्माविष्णू रुद्र आ‌ईचे करीती पूजन् हो ॥१॥

उदो बोला उदो अंबाबा‌ई मा‌ऊलीचा हो । 
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । 
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । 
उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । 
मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । 
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । 
उपासका पहासी प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो । 
भक्तांच्या मा‌ऊली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो । 
आर्धपाद्य पुजनें तुजला भवानी स्तविती हो
रात्रीचे समयी करिती जागरण हरी कथा हो । 
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥५॥

षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो । 
घेवुनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो । 
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥६॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । 
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जा‌ईजु‌ई शेवंती पूजा रेखीयली बरवी हो । 
भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो ॥७॥

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । 
संह्याद्री पर्वती उभी पाहिली जगत्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो । 
स्तनपान दे‌ऊनी सुखी केले अंत:करणी हो ॥८॥

नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो । 
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो । 
आचार्य ब्राह्मणा तृप्त त्वा केले कृपे करुनी हो ॥९॥

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । 
सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेउनी हो ॥
शुंभनिशूंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । 
विप्ररामदासा आश्रय दिधला चरणी हो ॥१०॥

श्रीदत्ताची आरती (Trigunatmak Traimurti)

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणा |
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा |
नेती नेती शब्द नये अनुमाना |
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||१||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |
आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ||धृ||

सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त |
अभ्याग्याशी कैंची कळेल हि मात |
पराही परतली तेथें कैचा हेत |
जन्ममरणाचा पुरलासे अंत ||२||
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

दत्त येउनिया उभा ठाकला |
सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला |
प्रसन्ना होऊनी आशीर्वाद दिधला |
जन्ममरणाचा फेरा चुकविला ||३||
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान |
हरपलें मन झालें उन्मन |
मीतुं पणाची झाली बोळवण |
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ||४||
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता

श्रीगुरू दत्तराज मूर्ती (Shriguru Dattaraj Murti)

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥

ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा
कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा
धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामधे अयुधे बहुत वरूनी,
तेणे भक्तांचे क्लेश हरूनी, त्यासी करूनी नमन

अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती
 ……… ओवाळीतो प्रेमे आरती॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी 
भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची
 वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची
काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो
माहुरी निद्रेला वरीतो  तरतरीत छाती, भरजरित
नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती
……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्यकंदा
तारी हा दास रुदनकंदा सोडवी विषय मोहछंदा
आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरु ब्रम्हनंदा
चुकवी चौरयांशीचा फेरा घालीती षडरिपू मज घेरा
गांजीती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी, तव
पूजन करीत असे सुजन तयांचे या दासावरती
  ……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥३॥

श्रीविठोबाची आरती (Yuge Atthavis)

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्या शोभा |
पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जागा ||१||
जय देव जय देव पांडुरंग
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||धृ||

तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटी |
कसे पितांबर कस्तुरी लल्लाटी |
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ||
जय देव जय देव पांडुरंग ||२ ||

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां |
राई रखुमाबाई राणीया सकळा |
ओवाळिती राजा विठोबा सावळा |
जय देव जय देव पांडुरंग ||३||

ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती |
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णावा किती ||
जय देव जय देव पांडुरंग ||४||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती
केशवासी नामदेव भावें ओवाळिती
जय देव जय देव पांडुरंग ||५||

येई हो विठ्ठले (Yei O Viththale)

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ४ ॥

श्री हनुमंताची आरती (Satrane Uddane)

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |
कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी |
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ||

दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द |
थरथरला धरणीधर मनिला खेद |
कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद |
रामी रामदास शक्तीचा शोध ||2||
जय देव जय देव जय श्रीहनुमंता ||

श्रीरामचंद्रांची आरती (Utkat Sadhuni Shila)

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।

ऐक बा रामराया (Aik Ba Ramaraya)

ऐक बा रामराया, तुझ्या मी वंदितो पाया 
आवरी आपुली ही, विश्वमोहिनी माया
ऐक बा रामराया ।।धृ।।

मी मूढ हीनदीन, सर्व सक्रिया हिन
तू क्षमाशील देवा शुद्धचरित निजधीन
ऐक बा रामराया ।।१।।

घडो सदा साधू संग, नसो विषय प्रसंग
सप्रेम भक्ती द्यावी, सत्व वैराग्य अभंग
ऐक बा रामराया ।।२।।

वाटते नेते भावे तुझे साधू गुणगावे 
मन हे आवरेना सांग काय म्या करावे 
ऐक बा रामराया ।।३।।

करिता संसार काम, मुखी असो तुझे नाम 
दया घना भक्त मोरयाचा पूरविसी काम
ऐक बा रामराया ।।४।।

कृष्णाची आरती – ओवाळू आरती मदनगोपाळा (Ovalu Aarti Madan Gopala)

ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ ध्रु० ॥

चरणकमल ज्याचे अति सुकुम ।
ध्वजवज्रांकुश चरणी ब्रीदाचा तोडर ॥ ओवाळू० ॥ १ ॥

नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ ओवाळू० ॥ २ ॥

मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी ।
वेधले मानस हारपली द्रुष्टी । ओवाळू० ॥ ३ ॥

जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान ।
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ॥ ओवाळू० ॥ ४ ॥

एका जनार्दनी देखियेले रूप ।
रूप पाहो जाता झाले अवघे तद्रूप ॥ ओवाळू आरती० ॥ ५ ॥

दशावताराची आरती (Aarti Saprem Jai Jai)

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥

श्री शनि देवाची आरती (Jai Jai Shri Shani Deva)

जय जय श्री शनि देवा। पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओंवाळीतों । मनोभावें करुनी सेवा ॥ ध्रु० ॥

सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥ १ ॥
जय जय श्री शनि देवा…

नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी । होय रंकाचा राजा ॥ २ ॥
जय जय श्री शनि देवा…

विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियेलें त्यासी ॥ ३ ॥
जय जय श्री शनि देवा…

शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ।
साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ॥ ४ ॥
जय जय श्री शनि देवा…

प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ।
नेऊनी शूळापाशीं । पुन्हा सन्मान केला ॥ ५ ॥
जय जय श्री शनि देवा…

ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ॥
कृपा करीं दीनावरीं । महाराजा समर्था ॥ ६ ॥
जय जय श्री शनि देवा…

दोन्ही कर जोडोनीयां । रुक्मा लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मार्गे । उदयकाळ सौख्य दावीं ॥ ७ ॥
जय जय श्री शनि देवा…

साईबाबांची आरती (Aarti Saibaba)

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।

जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।

जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।

तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।

कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।

आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।

माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।

इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।

आरती श्रीगजानन महाराजांची (Jai Jai Satchit Swaroopa)

जय जय सत्-चित् स्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवरी जड-मूढ ताराया॥धृ॥

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी।
ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी।
लीलामात्रे धरिले मानव देहासी॥१॥

होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा।
करूनी “गणि गण गणात बोते”या भजना।
धाता हरिहर गुरूवर तूचिं सुखसदना।
जिकडे पहावें तिकडे तूं दिससी नयना॥२॥

लीला अनंत केल्या बंकट सदनास।
पेटविलें त्या अग्नीवांचूनि चिलमेस।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३॥

व्याधि वारुन केले कैका संपन्न।
करविलें भक्तांलागी विठ्ठल-दर्शन।
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन॥४॥

आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची (Jai Dev Jai Jai Avadhoota)

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

तुझे दर्शन होता जाती ही पापे
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते
वैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा
शरणागत तुज होतां भय पडले काळा
तुेझे दास करिती सेवा सोज्वळा, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

मानवरुपी काया दिससी आम्हांस
अक्कलकोटी केला यतिवेषे वास
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास
अज्ञानी जीवास विपरीत भास, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक
अनंत रुपे धरसी करणे मा एक
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

घडता अनंत जन्म सुकृत हे गाठी
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

पंचप्राण हे आतुर झाले (Panchapran He)

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी,
पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी।
लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।
श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी । 
अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति ।
सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी ।
सन्मार्गाने  सदैव न्यावे, घेऊनी मज हाती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा ।
पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा ।
अल्पचि भिक्षा घलुनि स्वामी, न्यावे मज संगती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

जय जय सदगुरू स्वामी समर्था (Jai Jai Sadguru Swami Samartha)

 जय जय सदगुरू स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥

अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥
लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥

यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥
समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥

जाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥
इतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥

जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥

ज्ञानराजा आरती (Aarti Dnyanraja)

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

आरती तुकारामा (Aarti Tukarama)

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||

श्रीसत्यनारायणाची आरती (Shri Satyanarayan Marathi Aarti)

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा |
पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ ||

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण
परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून |
घृतयुत्क शर्करामिश्रींत गोधूमचूर्ण |
प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण || १ ||

शातानंदविप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें |
दरिद्र दवडुनि अंती त्यातें मोक्षपदा नेलें ||
त्यापासूनि हे व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें |
भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें || २ ||

साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियलें |
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें |
त्या पापानें संकटी पडुनी दु:खहि भोगिलें |
स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उध्दरिलें  || ३ ||

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली |
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली |
अंगध्वजराजाची यापरि दु:खस्थिती आली |
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली || ४ ||

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणी |
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं |
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि |
ऐका भक्तां  संकटि पावसि तुं चक्रापाणी || ५ ||

अनन्यभावे पूजुनि हें व्रत जे जन आचरति |
इच्छित पुरविसी त्यातें देउनि संतति संपत्ती |
संहरती भवदुरितें सर्वहि बंधने तुटती |
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती || ६ ||

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा ||
भक्तीपुरस्सर आचरति त्यां पावसि जगदीशा |
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तुं सर्वेशा |
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ||

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा  || ७ ||

धन्य धन्य हो प्रदक्षिणा (Dhanya Dhanya Ho Pradakshina)

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।।

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी।
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।।

मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।।

कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।।

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि।
अनुभव जे जागति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।।

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।

निरोप आरती (Nirop Aarti)

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो
प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥

तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना
रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥

मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे
तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥

जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥

वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी
कृपेची सा‌ऊली देवा दीनावरि करी ॥६॥

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी
आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

घालीन लोटांगण (Ghalin Lotangan)

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥
प्रेमें आलिंगिन आनंदे पूजीन ।
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव 
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव 
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैवा 
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै 
नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं 
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं 
जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

मंत्रपुष्पांजलि (Mantra Pushpanjali)

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासान्।

ते ह नाकं महिमान: सचंत।
यत्र पुर्वे साध्या: संति देवा:।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:।

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं 
माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्।

पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिती।
तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्सावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति॥

हे ही वाचा : श्रीगणपती अथर्वशीर्ष

गणपती

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।

महालक्ष्मी

ॐ महालक्ष्मीच विद्महे, विष्णुपत्नीच धीमहि।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।।

विष्णु

ॐ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि ।
तन्नो विष्णु: प्रचोदयात् ।।

महादेव

ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि ।
तन्नो रुद्र: प्रचोदयात् ।।

कृष्ण

ॐ देवकी नंदनाय विद्महे, वासुदेवाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।

हनुमंत

ॐ अंजनीसुताय विद्महे, वायुपुत्राय धीमहि ।
तन्नो हनुमंत: प्रचोदयात् ।।

पृथ्वी

ॐ पृथ्वदेव्यै विद्महे, सहस्रमत्र्यैच धीमहि ।
तन्नो पृथ्वी प्रचोदयात् ।।

सूर्य

ॐ भास्कराय विद्महे, महद्युतिकराय धीमहि ।
तन्नो आदित्य प्रचोदयात् ।।