fbpx

Padmashri Durga Khote: पद्मश्री दुर्गा खोटे – Royal व्यक्तिमत्वाची आई

Padmashri Durga Khote: २२ सप्टेंबर… प्रसिद्ध कलाकार पद्मश्री दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख.

पद्मश्री दुर्गा खोटे (Padmashri Durga Khote) मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रेष्ठ अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्यांच्या काळातील आघाडीच्या महिला कलाकारांपैकी एक म्हणून सुरुवात केली होती. त्या काळी नाटक, चित्रपट वैगरे व्यवसायांत काम करणाऱ्यांना समाजात फारशी प्रतिष्ठा नव्हती. ‘चांगल्या घरातली माणसं सिनेमात काम करीत नाहीत’ असं मानणारा तो काळ होता. त्या मान्यतेला छेद देत त्यांनी पतीच्या निधनानंतर आपल्या मुलांना आधार देण्यासाठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. त्यासाठी त्यांना टिकेचाही सामना करावा लागला परंतु त्याची पर्वा न करता त्या काम करीत राहिल्या आणि आपल्या ५० वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या.

बालपण आणि शिक्षण

दुर्गा खोटे (Durga Khote) यांचा मुंबईत जन्म ‘लाड’ या संपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. ते मूळचे गोव्याचे होते आणि घरी कोकणी भाषा बोलत होते. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग लाड आणि आईचे नाव मंजुळाबाई होते. त्यांचे वडील पांडुरंग लाड हे व्यवसायाने बॅरिस्टर होते. दुर्गाबाईंचे लहानपण कांदेवाडी या गावामध्ये गेले. कांदेवाडी येथे त्यांचा वाडा होता. त्या वाड्यातच त्यांचे बालपण गेले. त्या एका मोठ्या एकत्र कुटुंबात वाढल्या. त्यांचे पाळण्यातील नाव होते विठा. लहानपणी त्यांना कौतुकाने बेबी या नावाने संबोधत असत. नंतर त्यांना सर्व जण बानू म्हणू लागले. १९२३ साली (विश्वनाथ) खोटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला व लग्नानंतर त्यांचे नाव दुर्गा खोटे असे झाले.

दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण कॅथिड्रल हायस्कूलमध्ये झाले. त्यांना शालेय वयापासून अभिनयात रस होता. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मात्र त्याचवेळी विवाह झाल्याने त्या ते शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्याच वेळी बनारस हिंदू विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनियर विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुलगे होते, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्या पतीचे निधन झाले. वयाच्या २६ व्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांना सासरच्या लोकांवर अवलंबून राहायचे नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा: शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

कारकिर्दीची सुरवात

त्यांना पहिली संधी मिळाली निर्माते जे.बी.एच.वाडिया यांच्या मूकपटात. त्यांची बहीण शालिनी वाडीयांची मैत्रिण होती. वाडियांनी दुर्गाबाईंना त्यांच्या मूकपट फरेबी जाल (1931) मध्ये काम करण्यासाठी तयार केले. हा चित्रपट चालला नाही आणि दुर्गाबाईंनाही खूप टीका सहन करावी लागली. एका सुसंकृत घरातल्या स्त्रीने सिनेमात काम करणे त्या काळच्या लोकांना अजिबात रुचले नाही.

पुढे बोलपटांची सुरवात झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची प्रभात फिल्म कंपनी बोलपट निर्मितीच्या दृष्टीने पावले टाकत होती. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ (मराठी) व ‘अयोध्या का राजा’ (हिंदी) या द्विभाषिक चित्रपटाची तयारी सुरू केली होती. त्या वेळी चित्रपटासाठी नायिका म्हणून प्रभात कंपनीने दुर्गा खोटे यांची निवड केली. 

1932 मध्ये हा चित्रपट प्रकाशित झाला आणि त्याच्या हिंदी आणि मराठी या दोन्ही आवृत्यांनी घवघवीत यश मिळवले.’ दुर्गाबाईंनी प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यश मिळवले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. ‘अयोध्या का राजा’ या चित्रपटांतील गाणी त्यांनी स्वत: गायली होती. त्यांनी गायिलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजि सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली. पुढच्या ‘मायामच्छिंद्र’ या चित्रपटात त्यांनी एका योद्धा स्त्रीची भूमिका केली होती. हे दोनही चित्रपट खूप गाजले. या चित्रपटांमुळे दुर्गाबाईंना प्रसिद्धी मिळाली. पुढे त्यांनी सैरंध्री (1933), अमर ज्योती (1936), महात्मा विदुर (1943) आणि वीर कुणाल (1945) या चित्रपटांमध्ये काम केले. पण 1960 साली आलेल्या ‘मुघल-ए-आझम’ने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसविले. ‘मुघल-ए-आझम मध्ये त्यांनी केलेली जोधाबाईची भूमिका अजरामर ठरली.

उल्लेखनीय भूमिका

हिंदी चित्रपटसृष्टीतील आईच्या भूमिकेतील पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये त्यांचाचा समावेश होतो, त्यांपैकी के. आसिफच्या मुघल-ए-आझम (1960) मधील जोधाबाई; विजय भट्टच्या क्लासिक भरत मिलाप (1942) मध्ये कैकेयी म्हणून; चरनों की दासी (1941) मधील तिने केलेल्या आईच्या संस्मरणीय भूमिका होत्या. तिच्या इतर भूमिकांपैकी मिर्झा गालिब (1954), बावर्ची (1972), बॉबी (1973), बिदाई (1974),आणि कर्ज (1980) या सर्वात उल्लेखनीय होत्या. जर्मन दिग्दर्शक पॉल झील (Paul Zils) यांच्याअवर इंडिया (१९५०) व इस्माईल मर्चंट यांच्या हाऊसहोल्डर या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. गीता, विदुर, जशास तसे, मोरूची मावशी, सीता स्वयंवर, मायाबाजार यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.

मराठी रंगभूमीवर त्यांनी बेचाळीसचे आंदोलन, कीचकवध, भाऊबंदकी, शोभेचा पंखा, वैजयंती, खडाष्टक, पतंगाची दोरी, कौंतेय, संशयकल्लोळ इ. नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. तसेच वैजयंती, कौंतेय, पतंगाची दोरी, द्रौपदी इ. नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत भाऊबंदकी हे नाटक सर्व भाषांतील नाटकांत सर्वोत्तम ठरले होते. दुर्गाबाईंनी त्यात आनंदीबाईंची प्रभावी भूमिका केली होती. हिंदी आणि मराठीशिवाय दुर्गाबाईंनी बंगाली सिनेमांमध्येही काम केलं. त्यांनी १९३३ साली देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली ‘राजरानी मीरा’ या चित्रपटामध्ये कोलकाता येथे काम केले व त्यानंतर १९३४ साली ‘सीता’, १९३५ साली ‘जीवन नाटक’ या दोन चित्रपटांत नायिकांच्या भूमिका करून त्यांनी केवळ बंगालमध्येच नव्हे, तर साऱ्या भारतभर लोकप्रियता मिळवली.

पुरस्कार

दुर्गाबाईंची चित्रपटातील व नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीत नाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला. १९६१ साली दिल्लीमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९६८ साली त्यांना भारत सरकार तर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार दिला गेला. तसेच १९७० साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पारितोषिक समारंभात सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून ‘धरतीची लेकरं’ या चित्रपटासाठी सन्मानित केले होते. हिंदी चित्रपट ‘बिदाई’साठी १९७४ साली त्यांना फिल्मफेअरने पारितोषिक दिले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील आजीवन योगदानासाठी त्यांना १९८३ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार (1983) देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आईची भूमिका

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुलाखतकार तबस्सुमला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा दुर्गाबाईंना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आई म्हणून टाइपकास्ट का केले गेले, असे विचारले असता, त्यांनी अगदी बिनधास्तपणे उत्तर दिले की त्यांची उंची आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळेच त्यांना आई म्हणून पाहिले गेले आणि विशेषत: पौराणिक चित्रपट आणि ऐतिहासिक नाटकांमध्ये त्याच प्रकारच्या भूमिका मिळाल्या.

‘कर्ज’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली आईची भूमिका त्यांच्या सर्वात उल्लेखनीय भूमिकांपैकी एक होती. दिग्दर्शक सुभाष घई यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “माझ्या ‘कर्ज’ चित्रपटाच्या कथेत आईची भूमिका खूप महत्त्वाची होती. मला ही भूमिका साकारण्यासाठी अशी कोणीतरी हवी होती जी दिसायला राणीसारखी आहे. श्रीमंत असूनही नोकरासारखे काम करणारी ही व्यक्तिरेखा होती करावे लागेल. दासी असूनही तिला एका भारदस्त आणि प्रतिष्ठित राणीसारखे दिसणे आवश्यक होते आणि त्या भूमिकेत दुर्गाताई एकदम योग्य होत्या. दुर्गाजींना स्वतःला कसे वाहून घ्यावे हे माहित होते आणि त्या अत्यंत मेहनती होत्या.”

चित्रपटांव्यतिरिक्त केलेलं काम

बॉलिवुड चित्रपटांव्यतिरिक्त, दुर्गाताई इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) च्या सदस्या देखील होत्या, जिथे तिने बलराज साहनी, पृथ्वीराज कपूर आणि के.ए. अब्बासयांसारख्या दिग्गजांसह काम केले. तिने मॅकबेथच्या राजमुकुट नावाच्या मराठी आवृत्तीत अभिनय केला, ज्यामध्ये तिने लेडी मॅकबेथची भूमिका केली होती.

केवळ चित्रपट आणि नाटकांपुरते मर्यादित राहण्यास न राहता दुर्गाबाईंनी 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन’ या देशातील पहिल्या जाहिरात एजन्सींची स्थापना केली. या कंपनीने ‘वागळे की दुनिया’ या दूरदर्शन मालिकेची निर्मिती केली. शशी कपूर एकदा तिच्याबद्दल म्हणाले होते: “तिची व्यावसायिकता आणि तिला योग्य वाटणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची तिची इच्छा ही तिच्याबद्दलची सर्वात उल्लेखनीय गोष्ट होती. तिने कधीही केवळ पैशासाठी काम केले नाही.”

आत्मचरित्र

दुर्गा खोटे (Durga Khote) यांनी १९८९ साली ‘मी-दुर्गा खोटे’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. त्यांचे चित्रपट आणि आत्मचरित्र आणि आजही यांच्या कलापूर्ण जीवनाची ओळख करून देतात.

दुर्गा खोटे यांचे 22 सप्टेंबर 1991 रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे अलिबाग येथे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने त्यांचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले आहे.