fbpx

Diwali Faral: घरी बनवायचा की तयार आणायचा?

Diwali Faral: गौरी गणपती, नवरात्र सरले की वेध लागतात दिवाळीचे! अनेकांना अनेक गोष्टींसाठी दिवाळी आवडते. काहींना शाळा, कॉलेजना भरभक्कम सुट्टी असते म्हणून आवडते तर काहींना सगे सोयरे भेटतील म्हणून. परदेशस्थ बांधवांना मायदेशी यायचे निमित्त म्हणून, तर अर्थात सगळ्यांना मनसोक्त फराळाचा आस्वाद घेता येईल म्हणून!

Diwali Faral: दिवाळीचा ‘फराळ’ खास

हो, बरोबर… आता सगळे पदार्थ वर्षभर मिळतात, पण तरी होळीला पुरणपोळी, पाडव्याला श्रीखंड, गणपतीत मोदक तसेच दिवाळीला ‘फराळ’ (Diwali Faral) हा हवाच! एरवीही खात असलो तरी दिवाळीत हे पदार्थ खाण्याची लज्जत न्यारीच असते.

मागच्या काही दशकांमध्ये नावारूपाला आलेले अनेक गृह उद्योग आहेत, त्यातीलच एक म्हणजे दिवाळीचा फराळ (Diwali Faral) तयार करणे.

तयार फराळ

घरगुती पद्धतीने फराळ बनवून विकणे हा कित्येक गरजु महिलांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. घर चालवण्यासाठी, चार पैसे जमवण्यासाठी, संसाराला हातभार लावावा म्हणून किंवा स्वयंपाकाची आवड असल्यामुळे एक पॅशन म्हणून दिवाळी सुरु व्हायच्या कित्येक दिवस आधी दिवसरात्र खपून फराळ तयार करतात. रोजगाराच्या आशेने अनेक महिला आपले पाककौशल्य पणाला लावतात, फराळ बनवतात व विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करतात. वेगवेगळ्या क्षेत्रात अहोरात्र काम करत असणाऱ्या इतर अनेक महिलांसाठी हा ‘रेडीमेड’ दिवाळी फराळ (Diwali Faral) म्हणजे वरदानच ठरत आहे. नोकरीच्या ठिकाणी द्यावे लागणार दिवसाचे अनेक तास आणि दिवसेंदिवस वाढतच असणारी वाहतूक कोंडी यामुळे जाण्यायेण्यात वाया जाणारा वेळ यामुळे इच्छा असूनही घरी जाऊन कंबर कसून फराळाच्या तयारीला लागणे कित्येकांना शक्य होत नाही.

परवाच कुठेतरी वाचले, की दिवाळी सुरू व्हायच्या आधीच निगुतीने फराळ बनवणाऱ्या महिलांबाबत इतरांना प्रचंड आदर वाटतो. पण फराळ न बनवणाऱ्या बायकांचे त्याहून हजारपट जास्त कौतुक वाटते. कारण फराळ म्हणून ताटात रेडिमेड पदार्थ ठेवण्यासाठी सॉलीड गट्स आणि तूफान आत्मविश्वास लागतो. कारण समोर ताटात विकतचे फराळाचे पदार्थ ठेवल्यावर बाहेरचे सोडाच, पण सगळ्यात आधी त्यांना घरातल्याच अनेक प्रश्नांच्या सरबत्तीना, मुरडलेल्या नकांना आणि विस्फारलेल्या नजरांना सामोरे जावे लागते.

हे ही वाचा: रव्याची खुसखुशीत शंकरपाळी

वेळ नाही, सपोर्ट नाही

दिवाळीला फराळ (Diwali Faral) तर हवाच पण बनवायला वेळ नाही, सपोर्ट नाही मग अशावेळी तयार फराळ मदतीला धावून येतो. दिवाळी म्हटली की घरातील महिलांना अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. नोकरी व्यवसाय सांभाळून घराची साफसफाई, खरेदी, फराळ अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असते. हे सगळं एकत्र करताना कुणाचा सपोर्ट नसेल तर परिस्थिती अजून गंभीर होते. फराळाचे पदार्थ म्हटले की ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवेत यासाठीही महिलांचा प्रयत्न सुरू असतो. तयार फराळ घेताना तो आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कमी जास्त प्रमाणात घेता येऊ शकतो. त्यात हवी तशी विविधता आणता येऊ शकते. पारंपरिक आणि नवीन यांचा मेळ साधला जाऊ शकतो त्यामुळे फराळ विकत घेणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्यातही काही पदार्थ घरी बनवून आणि काही बाहेरून आणून मेळ साधता येऊ शकतो. काळाची गरज आणि प्रत्येकीच्या आयुष्यातील प्राधान्य क्रम म्हणजेच ‘प्रायोरिटीज’ वेगवेगळ्या असतात (आणि तो असाव्यातच!) त्यामुळे बाजारात सहज उपलब्ध असणारा ‘तयार फराळ’ हा अशा अनेक कुटुंबांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.

काळाची गरज

घरची गृहिणी अनेक आघड्यांवर लढत असताना फराळ बनविणे outsourced केले तर त्यात अयोग्य काय? त्यामुळे दर दिवाळीला, या फराळाच्या मागणीचा आलेख चढत्या क्रमाने जातांना दिसला तर ते ही अपेक्षितच आहे. या पार्श्वभूमीवर, ज्यांना नसेल आवडत बाहेरचा फराळ त्यांनी घरच्याच फराळाचा आग्रह धरणे, “बाहेरच्या फराळाला घरची चव नाही” अशी जाहीर प्रतिक्रिया नोंदवणे ही नक्कीच स्वागतार्ह बाब नाही. अनेक मालिकांमध्येही असे संवाद अनेकदा म्हंटले गेले आहेत.

घरच्या गृहिणी चविष्ट फराळ बनवत असतानाही भर दिवाळीत हॉटेल, रेस्टॉरंट, अगदी पाणीपुरी, वडापावच्या गाड्या गर्दीने ओसंडून वाहत असतात. जसे हे सगळे हॉटेल व्यावसायिक पैसे कमवतायत तशाच याही गृह उद्योग चालवणाऱ्या गृहिणीही फराळ विकून पैसेच कमवतायत की! बरं, हा व्यवसाय करणार्‍या 99% महिला मराठी आहेत. परप्रांतीय या फराळ बनवणाऱ्या कामात अजून तरी सक्रिय झालेले नाहीत. मग, असे असताना, ज्यात आपला मराठी माणसांचा हातखंडा आहे असा करंजी, अनारसे, चकली, चिवडा, विविध प्रकारचे लाडू, मिठाया असा ‘ नो जंक ‘ अस्सल घरगुती दिवाळी मेवा खाऊन खिलवून आपली महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतींची परंपरा पुढे नेणाऱ्या मराठी बंधू भगिनींना पाठिंबा देणे, प्रोत्साहन देणे हे कर्तव्यच आहे.

Good Food, Good Mood: गुड फूड, गुड मुड

इंग्रजीत एक म्हण आहे, ‘ Good Food, Good Mood’! म्हणजेच चांगले अन्न, चांगले पदार्थ खा आणि आपले मनःस्वास्थ्य जपा, आनंदी रहा.
हे सर्वार्थाने अगदी कालातीत असणारे वाक्य आहे. त्यामुळे ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत काळानुरूप जमेल तशी, रुचेल तशी आपली खाद्य परंपरा आनंदाने जपावी आणि पुढच्या पिढीकडेही सुपूर्द करावी हेच श्रेयस्कर, नाही का!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *