fbpx

Moonlighting: मूनलाइटिंग – समर्थन, विरोध आणि कारणे

Moonlighting

Moonlighting: IT जायंट विप्रोने मूनलाइटिंगसाठी 300 कर्मचार्‍यांना काढून टाकल्याची बातमी आली आणि “मूनलाइटिंग” (Moonlighting) या संकल्पनेला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाली. नियमित कामकाजाच्या वेळेनंतर दुसरे काम करणे याला ‘मूनलाइटिंग’ असे म्हणतात. सामान्यतः संध्याकाळी किंवा रात्री म्हणजेच चंद्रप्रकाश असताना केलेले काम अशी या संकल्पनेमागची भावना आहे. मूनलाइटिंग (Moonlighting) म्हणजे मुख्य उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून नियमित नोकरी करायची आणि अधिक उत्पन्नासाठी पहिल्या नोकरीतून उरलेल्या वेळात सहसा संध्याकाळी/रात्री दुसरी नोकरी करायची.

Moonlighting: जुनी संकल्पना

मुळात मूनलाइटिंग (Moonlighting) ही नवीन संकल्पना नाही. त्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहिली आहेत. आमचे शिक्षक शाळेच्या वेळेनंतर कोचिंग क्लास चालवायचे. खाजगी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर घरून किंवा दवाखान्यातून खाजगी प्रॅक्टिस करताना आपण पाहिले आहेत. नियमित नोकरी करून विकेंडला हॉबी क्लासेस किंवा ट्रेकिंग क्लब चालवणारे “मूनलाइटिंग” (Moonlighting) संकल्पनेत मोडतात. “मूनलाइटिंग” या वाक्प्रचाराचा अर्थ गुप्त काम करणे, विशेषतः रात्रीच्या वेळी काम करणे होय.

हे ही वाचा : सँडविच जनरेशन आणि Smart समतोल

Moonlighting: मूनलाइटिंग का वाढले?

कोविड-19 महामारी दरम्यान, कर्मचाऱ्यांना घरून काम करायची मुभा मिळाली . ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) करताना कामांचे तास बदलले. कर्मचार्‍यांना आवश्यक ते स्वातंत्र्य आणि एकांत मिळाले आणि त्यातून इतर व्यवसायांच्या प्रकल्पांवर एकाच वेळी काम करण्याची वृत्ती बळावली. कर्मचाऱ्यांना जोड व्यवसाय किंवा प्रकल्प स्थापन करण्याची संधी मिळाली.

कोविड मुळे अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती खालावली. अनेक कंपन्या टिकून राहण्यासाठी कर्मचारी कपात, वेतन कपात करू लागल्या. कर्मचाऱ्यांचे ऑफिस अवर्स वाढले. वार्षिक अप्रेजल आणि प्रोमोशन्स रखडली आणि त्यातून दुसरी नोकरी, नवीन प्रोजेक्ट्स शोधण्याची गरज भासू लागली आणि त्यामुळेही मूनलाइटिंग (Moonlighting) वाढू लागले.

मूनलाइटिंगवर भारतीय उद्योग विभागलेला

मूनलाइटिंगवर भूमिका घेण्याच्या बाबतीत भारतीय आयटी उद्योग विभागलेला दिसतो. बहुतेक आयटी सेवा कंपन्या ‘मुनलायटिंग’ला फसवणूक मानतात. व्यावसायिक कारणास्तव, बहुतेक पारंपारिक व्यवसाय त्यांच्या कर्मचार्‍यांना तृतीय पक्षांसाठी काम करण्यास मनाई करतात.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि विप्रो सारख्या टेक दिग्गजांनी मूनलाइटिंग (Moonlighting) नैतिक समस्या आणि कंपनीच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, नवीन वयोगटाला असे वाटते की नैतिकता कालांतराने विकसित झाली पाहिजे. तर दुसरीकडे, टेक महिंद्रा, त्याचे समर्थन करत आहे आणि कर्मचार्‍यांसाठी खुले धोरण आणण्याची योजना आखत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी स्वीगी नेही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘मुनलाईटिंग’ची मुभा दिली आहे.

Moonlighting: विरोधाची कारणे

वेगवेगळ्या कंपन्यांची या समस्येवर वेगवेगळी मते आहेत. या कंपन्यांनी कर्मचार्‍यांना मूनलाइटिंगसाठी दर्शविलेले काही जोखीम घटक खालीलप्रमाणे आहेत:

  1. हितसंबंधांचा संघर्ष:
    प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍याने किंवा खाजगी किंवा संवेदनशील माहिती उघड केल्यामुळे हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षांवर चिंता केंद्रस्थानी आहे.
  2. कर्मचार्‍यांच्या नोकरीच्या कामगिरीबद्दल शंका:
    एकाच वेळी दोन कामे केल्याने दोन्हीही कामांवर त्याचे परिणाम होऊ शकतात. कंपन्या चिंतित आहेत की जर एखाद्या व्यक्तीने स्वत:साठी जास्त काम केले तर त्याचा मुख्य कामाच्या उत्पादनावर किंवा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
  3. कमी लक्ष आणि थकवा:
    जे कर्मचारी दुप्पट काम करतात त्यांना शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता, आळशीपणा आणि इतर आरोग्य-संबंधित समस्या उद्भवतात. या समस्यांमुळे व्यवसायाच्या वाढीवर परिणाम होतो.
  4. कंपनीच्या संसाधनांचा गैरवापर:
    कंपनीच्या संसाधनांचा वापर, जसे की लॅपटॉप, प्रिंटर आणि सॉफ्टवेअर, साइड बिझनेससाठी देखील होण्याची शक्यता पहाता कंपन्या मूनलाइटिंगला विरोध असणे स्वाभाविक आहे.
  5. अनुपस्थिती:
    कर्मचारी एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने बर्याचदा साइड गिग्ससाठी प्राथमिक नोकरीतून रजा घेतात आणि ते कंपनीसाठी नुकसानदायी आहे.

Moonlighting कायदेशीर की बेकायदेशीर?

भारतातील कायदा मूनलाइटिंगवर अजून तरी पूर्णपणे बंदी घालत नाही. 1948 च्या फॅक्ट्री ऍक्ट च्या कलम 60 अंतर्गत कारखान्यांमध्ये प्रौढ कामगारांच्या दुहेरी रोजगारास मनाई आहे. तथापि, ज्या संस्था कारखाने चालवत नाहीत त्यांना या दुहेरी रोजगार विरोधी नियमांपासून सूट आहे.

हे ही वाचा: सँडविच जनरेशन आणि Smart समतोल

बदललेले मूनलाइटिंग

मूनलाइटिंग (Moonlighting) प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे आणि कदाचित पुढेही राहील. पण त्याची बेसलाइन शिफ्ट झाली आहे. पूर्वी, लोक त्यांच्या आवडी निवडी किंवा साईड प्रोजेक्ट्समध्ये कार्यालयीन वेळेनंतर, मुख्यतः शनिवार व रविवार आणि सुट्ट्यांमध्ये गुंतायचे. परंतु नवीन युगातील मूनलाइटिंग मात्र तसे नाही. महामारी मुळे आलेल्या हायब्रीड आणि वर्क फ्रॉम होम कल्चर मुळे वर्किंग अवर्स आणि डेज अशा संकल्पना बोथट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे साईड प्रोजेक्ट्स च्या वेळेत मुख्य काम आणि मुख्य कामाच्या वेळात साईड प्रोजेक्ट्स होऊ लागली आहेत. त्याचे सरळ परिणाम मुख्य कामांवर दिसू लागले आहेत.

मूनलाइटिंग योग्य की अयोग्य हा वाद सध्या तरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातून धडा घेत सरकारने नवीन कामगार कायद्यांचा एक भाग म्हणून मूनलाइटिंगवर धोरण तयार केले पाहिजे. कंपन्यांनीही रोजगार करार (employment agreement) तयार करताना त्यात हितसंबंधातील संघर्षाचे कलम तसेच मूनलाइटिंगला प्रतिबंधित करणारे विशेष कलम समाविष्ट केले पाहिजे. कायदेशीर चौकट मूनलाइटिंगवर थोड्या अधिक प्रमाणात आळा घालेल पूर्णतः थांबवणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांना नैतिकतेचे धडे देऊन, कारवाई करून थोडा फार फरक आणता येईल पण भविष्यात या कल्पनेसहित जगण्याची त्यांना तयारी ठेवावी लागेल आणि त्याप्रमाणे त्यांच्या नियमांमध्ये बदलही करावे लागणार आहेत.

Moonlighting: सकारात्मक दृष्टिकोन

बदलत्या काळानुसार या बदलाकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक ठरेल. मूनलाइटिंग (Moonlighting) हा एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्ही स्वत:चे कौशल्य वाढवू शकता, नवीन गोष्टी शिकू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अनावश्यक नसल्याची खात्री करू शकता. ज्यांना अधिक पैसे कमवायचे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या गरजा मूनलाइटिंगमुळे पूर्ण होतात . जोपर्यंत कोणताही संघर्ष होत नाही, जर कर्मचारी गोपनीयतेचे रक्षण करत आहे, रोजगारादरम्यान स्पर्धकांसाठी काम करत नाहीये आणि कार्यप्रदर्शनास बाधा येत नाही तोपर्यंत, एक कर्मचारी व्यवसायाच्या वेळेच्या पलीकडे काय करतो याची चिंता कंपनीला नसावी.

महामारीनंतर डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे एकाच वेळी अनेक कामे करणे सोपे झाले आहे, लोक त्यांच्या आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचा मानसिक ताण आणि कंटाळा कमी करण्यासाठी, त्यांच्या वेळेचा इष्टतम वापर करण्यासाठी आणि त्यांचे सामाजिक जीवन सुधारण्यासाठी मूनलाइटिंग (Moonlighting) हा सर्वोत्तम पर्याय मानत आहेत. येणारा काळ हा मूनलाइटिंगचा असेल हे निश्चित.