fbpx

Confidence as Important as Breathing: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

एक सार्वजनिक निरीक्षण आहे ते असे की, कोणीही समोरच्याविषयी बोलताना कितीही बोलू शकतो पण स्वतः बद्दल बोलताना मात्र शब्द आठवावे लागतात. खरंच आहे की नाही हे! स्वतःबद्दल चांगले बोलताना, कोणी आपले कौतुक केले तर ते स्वीकारताना आपल्यात असावा लागतो तो आत्मविश्वास!

Confidence as Important as Breathing: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!

आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा! सध्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी स्वतःबद्दल असलेले काही न्यूनगंड दूर व्हावे म्हणून अनेक शिबिरे, क्रॅश कोर्स सुरू असलेले पाहायला मिळतात. मागच्या काही वर्षात तर या कोर्सेसची संख्या दुपटी पेक्षा जास्त वाढलेली पाहायला मिळते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेत असलेल्या या विषयावरच्या शिबिरांमध्ये देखील स्वेच्छेने सहभाग घेणाऱ्या मुलामुलींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिबिरे पूर्ण झाल्यावर त्यातील अभ्यासक्रमात घेतल्या गेलेल्या अनेक प्रात्यक्षिकांचा उपयोग ही मुले रोजच्या दैनंदिन जीवनात अतिशय सकारात्मकतेने करून घेताना दिसतात.

मानसिक आजारांचा विळखा

डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, पॅनिक अटॅक हे आजकाल वरचेवर ऐकू येणारे शब्द झाले आहेत. या मानसिक आजारांना वयाचे बंधन नाही ही खरतर चिंतेची बाब आहे. अगदी शाळकरी वयातील मुलांच्या तोंडून देखील हे शब्द ऐकू येतात. या आधीही आपल्या आधीच्या पिढीतही अशा समस्या होत्या परंतु तुलनेने कमी स्पर्धात्मक वातावरण आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अनेक वयाचे, अनेक स्वभाव वैशिष्ट्याचे विविध लोक घरात असल्यामुळे मनावरचा ताण, घरगुती संवादातल्या विषयातील वैविध्यामुळे कमी होण्यास मदत होत असे.

सध्या या दोन्ही गोष्टींची अनुपलब्धता म्हणजेच जळी स्थळी स्पर्धात्मक युग आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे येणारा एकाकीपणा! यामुळे घरून बाहेर जात असताना घरातील ताण आणि बाहेरून घरी येत असताना बाहेरील ताण हा कायम राहतो. दिवस नवीन उजाडला तरी कालच्याच काळजी, चिंता आणि मनावरचे मळभ, दडपण घेऊनच उजाडतो. परिणाम स्वरुपी मनावरची मरगळ दूर होत नाही आणि शारीरिक व्याधी जडतात.

सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या, संघर्षाच्या युगात आपण ही आसपासची परिस्थिती बदलू शकत नाही हे गंभीर वास्तव आपण सर्वांनीच मान्य करायला हवे. पण त्याच बरोबर, त्या अनुषंगाने येणाऱ्या, आत्मविश्वासाच्या वाटेवर समोर येणाऱ्या समस्या दूर करायला उपलब्ध असणारे उपाय देखील तत्परतेने आत्मसात करायला हवे.

हे ही वाचा: मूनलाइटिंग – समर्थन, विरोध आणि कारणे

काय आहेत उपाय?

  1. दीर्घ श्वसन – श्वासावर लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वसन, प्राणायाम यासारख्या कृतीनी शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
  2. संवाद – योग्य वेळी, योग्य व्यक्तीशी योग्य तो संवाद साधण, मनातील भावना व्यक्त करणे – मग त्या भावना कोणत्याही असोत – राग,प्रेम,माया, ममता काहीही असोत! भावनांचा कोंडमारा हे आत्मविश्वास डळमळीत होण्याचे प्रमुख कारण आहे.
  3. शारीरिक निगा – शारीरिक स्वच्छते इतकेच अनन्य साधारण महत्व व्यायाम, योगासने यांना आहे. ज्या शरीराच्या बळावर आपण आयुष्य जगत आहोत ते ठणठणीत असेल तर आत्मविश्वास आपोआप वाढतो. यासाठीच ऋतू प्रमाणे योग्य तो आहार, पुरेशी विश्रांती, व्यायाम ही त्रिसुत्री काटेकोरपणे सांभाळली गेली पाहिजे.
  4. कला – प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरी कृपेने एकतरी कला बहाल केलेली असते. मग ती पाककला असो, चित्रकला असो, लेखन असो….! आपल्यातील कलेचे अवलोकन करून ती अखंड जोपासत राहणे आणि स्व- आनंद निर्मिती करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.
  5. सकारात्मक विचार – ज्या व्यक्तीला सकारात्मक विचार करण्याची सवय असते तो इतरांपेक्षा जास्तच आनंदी असतो. परिणामी त्याचा आत्मविश्वासही इतरांपेक्षा अधिक असतो. अशा उत्साही मनाच्या व्यक्तीला नेहमीच यशप्राप्ती होत असते.

म्हणूनच स्वतःकडे असलेल्या कलेकडे लक्ष देऊन त्यासाठी वेळ काढला तर मनावरचा तणाव हलका होण्यास मदत होते आणि त्यात मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वासाला देखील खतपाणी मिळते.

आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करवते. जसे एखाद्या रोपट्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे जगण्यासाठी सुध्दा पदोपदी आत्मविश्वास असणे गरजेचे असते. परंतु आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर एखादी गोष्ट करण्यासाठी जरुरी असणारा आत्मविश्वास ढळला तर त्याचाही न्यूनगंड येऊ न देणे हेही तितकेच महत्त्वाचे बरं का! आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतानाच, आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला एखादी गोष्ट येत नसेल तर ती शिकून घ्या. तिचा योग्य तो अभ्यास करा. उगाच स्वतःला किंवा त्या व्यक्तीला गुन्हेगार समजून शब्दांनी किंवा नजरेने तुच्छतेचे वार करू नका.

स्वतःला आपण जसे आहोत तसे ताठ मानेने स्वीकारायला शिका. काळ हे सर्वावर प्रभावी औषध आहे. त्यावर विश्वास ठेवून स्वतःचा स्वतःवर चा विश्वास कमी झाला तरी स्वतःचा आदर कमी न होऊन देणे आणि कृतार्थपणे समोर असलेले आयुष्य जगणे हीच आत्मविश्वासाचा समतोल राखण्याची गुरुकिल्ली आहे.

– प्रज्ञा पंडित, ठाणे