fbpx

बालदिन – 14 नोव्हेंबर

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीतील बाल्य जीवनाबद्दलचा हा आढावा – 

आपण वर्षभरात रोजच कोणता ना कोणता खास दिवस साजरा करत असतो.  हे प्रत्येक  दिनविशेष आयुष्याशी निगडित प्रत्येक वैयक्तिक, सामाजिक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे केले जातात. 

कोरोनाचा प्रभाव

दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी नेहमी ठिकठिकाणी लहान मुलांसाठी अनेक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे यात काहीसा खंड पडला आहे. ऑनलाइन माध्यमातून अनेक कार्यक्रम आतापर्यंत होत आले असले तरी बालदिन विषयक कार्यक्रम यंदाही कमी प्रमाणात आयोजित होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना काळात आजच्या लहानग्यांचे व्यतीत होत असलेले बालपण हे न भूतो न भविष्यती असे आहे. शाळा, मैदानी खेळ, लहान मोठे सहल प्रवास, एकत्र भेटीगाठी या सर्व बाबी लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक निकोप वाढीसाठी आवश्यक गोष्टी! पण त्यापासून त्यांना या काळात आपल्याला दूर ठेवावे लागले आहे.

परंतु, मागील काही काळापासून कमी होत असणारा कोरोना चा प्रभाव , सध्या मात्र आयुष्य पूर्ववत करत आहे. त्यातही गणेशोत्सव, नवरात्र, नुकतीच पार पडलेली दिवाळी या मंगलमय दिवसात घरात चार भिंतीत बंद आयुष्य जगत असलेल्या मुलांना जरा मोकळा श्वास घ्यायला मिळत आहे ही देखील एक सुखावह बाब आहे. विकतचे दिवे- किल्ले – फराळ आणण्याची मानसिकता समाजात दिसत असली तरी त्यातूनही आनंद लुटण्याची वृत्ती या कोरोना काळा नंतर बघायला मिळाली. 

असे म्हणतात की दर दहा वर्षांनी पिढी बदलते. साहजिकच प्रत्येक पिढी चे बालपण आणि बालपणाचे निगडित आठवणी , गमतीजमती , सोयीसुविधा वेगळ्या असणारच ! किंबहुना त्यात जमीन-अस्मानाचा फरक असणे हे स्वाभाविक! आजचा हा बालदिन लहान मुलांसाठी असला तरी एक सुजाण पालक सुजाण आणि सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक बाल मनाचा, जीवनाचा आदर करणे, सन्मान करणे हे  आपले कर्तव्य आहे. 

हे ही वाचा: जागतिक वडापाव दिन

आजच्या काळातला बाल दिन

सध्याच्या वैज्ञानिक आणि विकसनशील जगात दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी नवनवीन सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. या सर्वांचा वापर आज लहान वयस्कर सर्व जण अगदी सहजगत्या करत आहेत. आयुष्य सुकर होण्यासाठी  त्याचा उपयोग देखील होत आहे. आज सर्वच लहान मुले मोबाईल, लॅपटॉप अगदी सराईतपणे वापरताना आपण बघतो.आज शाळा, अभ्यास, आँनलाईन शिबिरे या सर्वांसाठी या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा ह्या लहान मुलांना होत आहे हे निश्चित.

आपणही ही गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारावी हेच श्रेयस्कर! ‘ आमच्यावेळी असे नव्हते, आम्हाला हे येतच नव्हते, आम्हाला मोबाईल म्हणजे काय हे ही नव्हते माहित ‘ अशा टीकात्मक टिप्पण्या करून आम्ही तुमच्यापेक्षा साधे आणि निरागस होतो हे अप्रत्यक्षपणे त्यांना सांगण्याचा मोह आवरणे हे योग्य! 

उलटपक्षी, विकसित तंत्रज्ञानामुळे आज मोबाईल, लॅपटॉप आणि गूगल मीट, झूम यासारख्या माध्यमातून शहरी असो किंवा ग्रामीण – प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा आलेला नाही हे आपण आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे. लहान मुलांनीही या बदलत्या जीवनशैलीला वेळ न दवडता आत्मसात करून आपापल्या कुवतीप्रमाणे शिकण्याचा आणि अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 

विशेष बालदिन

म्हणूनच यंदाचा हा   बालदिन ” विशेष बालदिन “आहे. आजूबाजूच्या ही प्रत्येक चिमुरड्याचे मनापासून कौतुक करण्याचा,  अभिनंदन करण्याचा हा दिवस आहे. या पिढीतील लहान मुलांचे हरवलेले बालपण त्यांना लवकरच परत मिळो,  भरपूर खेळण्याचे, बागडण्याचे त्यांचे हे दिवस परत त्यांना लाभो हीच या बालदिनाच्या निमित्ताने,. सर्व लहान बाळगोपालाना शुभेच्छा आणि सदिच्छा!