fbpx

राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस 7 नोव्हेंबर

दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस म्हणून ओळखला जातो.

कॅन्सर – बस नाम ही काफी है!

हो…..  हादरून जायला, गळुन जायला फक्त हा एक शब्दच पुरेसा आहे. एखाद्या आजाराची कुणकुण लागली की मग आपल्याला मिळालेलं निरोगी, सुदृढ आयुष्य आपण किती बेदरकारपणे वाया घालवत जगतोय; निरर्थक गोष्टींची खंत बाळगुन किती कुढत जगतोय या सगळ्याची जाणीव क्षणार्धात होते. अगदी व्हायरल तापाने जरी आजारी पडलो तरी पुढचे कित्येक दिवस जो भेटेल त्याला आपल्याला कसा तापच आला मग किती त्रास झाला वगैरे ऐकवत राहतो. मग अशा वेळी, असा कॅन्सर सारखा गंभीर आजार मनाने पेलण्यासाठी किती मनोधैर्य आणि किती कणखरपणा लागेल याचा अंदाज येतो.

काही वर्षांपुर्वी एका असाईंनमेंट  साठी मुंबईतील एका नामांकित हॉस्पीटल मध्ये काही दिवस जाणे झाले. तेव्हा तिथे चेकअपला, ट्रिटमेंटला येणाऱ्या बर्‍याच कॅन्सर पेशंट बरोबर ओळख झाली. ‘शरीरात कोणत्याही भागात होणारी पेशींची uncontrollable वाढ’ ही साधी व्याख्या आहे या आजाराची! 

पण प्रत्येकाचा कॅन्सर वेगळा… त्याचे त्रास वेगळे! स्वभावानुसार काहीजण त्यांच्या आजाराबद्दल खुप भडभडून बोलणारे तर काही खुपच डिप्रेशन मध्ये गेलेले!  कधी कॅन्टीन मध्ये, कधी वेटींग रुम मध्ये, कधी हॉस्पीटलच्या आवारात वावरणाऱ्या पेशंट्सबरोबर बोलुन त्यांच्या आजारपणाविषयी,  खुप गोष्टी जवळुन कळल्या.

पेशंटची मनस्थिती

आजार झाला आहे हे कळल्यापासुन एकतर हे पेशंट मनाने उन्मळून गेलेले होते. प्रचंड शारीरिक त्रास, दडपण, भीती, उदासी, हे माझ्या बरोबरच का व्हावं – मी कोणाचं काय वाईट केलं आहे हा सततचा विचार, खर्चाची काळजी इतकंच नव्हे तर आपण गेल्यावर आपल्या मागच्यांचं काय होणार इथपर्यंत सगळ्या विचारांच्या ओझ्याखाली दबलेले ते पेशंट दरवेळी, कधी आशावाद ठेवून तर कधी निराशेत बुडुन हॉस्पिटल मध्ये येतात. त्या कामाच्या वेळी मी ओन्कॉलोजी विभाग  प्रत्यक्ष पाहीला. इतर सामान्य माणसा सारखीच  केमोथेरपी, रेडीएशन्स,  ही सगळी ट्रिटमेंटची नावंही मला नवीन होती. पण या दरम्यान तिथे ह्या ट्रीटमेंटचा संपूर्ण विभाग बघितला. हॉस्पीटलच्या लौकिकाला साजेसं अगदी पाॅश, सुसज्ज, स्वच्छ, व्यवस्थित असे संपूर्ण oncology department आहे हे कितीही खरं असलं तरीपण तिथे मानसिक दृष्ट्या कमालीचं नकारात्मक  वातावरण!  एखाद्या वास्तुत तिथल्याच सुखद दुःखद भावनांचे व्हायब्रेशन मिसळून जातात आणि मग तेच वातावरण तयार होतं तिथे. अशा वातावरणात स्वतःचं डोकं, मन शांत ठेवून काम करणाऱ्या डाॅक्टर्स आणि इतर स्टाफला हॅट्स ऑफ!! इन्फेक्शन होऊ नयेत, इतर आवाज, इतर आजाराच्या पेशंट्स  व नातेवाईकांना या पेशंट्सचा आणि यांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून सुरक्षा, सुरक्षितता, काळजी, एकाग्रता या सर्व बाबींचा विचार करून हे oncology department एकदम वरच्या मजल्यावर सेपरेटली ठेवलं आहे. तिथे जाणवला तो प्रचंड तणाव आणि कमालीची शांतता! तिथे जाणवली प्रत्येक आजारी मनातली तळमळ-एक नॉर्मल आयुष्य जगण्याची, बरी होण्याची! 

या अनुभवात एक पुस्तकी वाक्य प्रत्यक्षात जाणवलं की आपलं आयुष्य खरंच खुप महाग असतं, आपणच स्वस्तात मिळाल्यासारखं वापरतो.

***********

पुढे काही दिवसांनी, परत एक असाईनमेंट घेतली. तेव्हा काम होतं एका कॅन्सर केअर एन जी ओ मध्ये! पेशंट्सशी बोलणे, काउंन्सिलिंग करणे, त्यांना आर्थिक पाठबळ मिळवुन देणे हे सगळं मनापासून केले. हे करत असताना परत एकदा या आजाराविषयी अजुन नवीन माहीती मिळाली. कॅन्सरची कारणे, उपाय, वेगवेगळे स्टेजेस, पेशंट्सना होणारे त्रास, साईड इफेक्ट आणि असं खूप काही!  बरे झालेल्या पेशंट्सचे इंटरव्ह्यूज, लहान-मोठ्या प्रत्येक वयाच्या पेशंटची मनस्थिती, ट्रिटमेंट मुळे होणारे शारीरिक बदल आणि त्यामुळे परत एकदा मानसिक ताण… हे सगळं परत एकदा समोर आले.

************

मोलाचा सल्ला

या विषयावर माझा अनुभव लिहुन शेअर करावासा वाटला म्हणून लिहीला पण या अनुभवातून मला कळलेल्या काही गोष्टी मला आवर्जून सांगायच्या आहेत.

एक म्हणजे ‘मला काय होणार आहे’ ‘जे होईल ते पाहीलं जाईल’ ‘काही होत नाही मला’ अशा कुठल्याशा logic, philosophy वर निर्धास्त जगणंही अयोग्य आणि अति काळजी करत कुढत जगणंही वाईट! तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगते की something is wrong!  कोणी मुर्ख म्हणो, डरपोक म्हणो.. उठुन डाॅक्टर कडे जाऊन व्यवस्थित वेळोवेळी चेकअप करावे.

नंबर दोन – 

गूगल करुन कोणत्याही आजाराविषयी माहीती गोळा करून स्वतःच स्वतःचे डाॅक्टर बनु नये.

नंबर तीन – 

मानसिक आधार द्यायला पैसे, वेळ याची काहीच गरज लागत नाही. तुमच्या संपर्कात कोणी पेशंट असतील तर जसा जमेल तसा त्यांचा आधार बना. हा मुद्दा फक्त कॅन्सर पेशंट साठीच लागु नाही..तर अगदी क्षुल्लक आजारात, प्रसंगी मानसिक ताणतणावात असणाऱ्या जवळच्या व्यक्तींचाही आधार बनायला काहीच हरकत नसावी. 

*********

आजच्या जगात, लवकर निदान झाल्यास कॅन्सर हा 100% बरा होऊ शकणारा आजार आहे. हे वारंवार सिद्ध झाले आहे आणि कॅन्सरवर मात केलेल्या अनेक सेलिब्रिटीज मुळे प्रसिद्धही झाले आहे. डाॅक्टर्सवर विश्वास ठेवून, मनोबल कायम ठेवुन हा प्रवास यशस्वी करणं हाच याचा कानमंत्र आहे असं आपण म्हणु शकतो!

बरा झाल्यावर तो परत होतो का? हा आनुवंशिक आहे का? त्याला झालाय मग मला पण होईल का? हे असे विचार मनात न आणणेच श्रेयस्कर ठरेल.  आणि हा आजार झालाच तर घाबरूनही जाऊ नये. आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक स्वास्थ्य, इच्छाशक्ती मजबूत केल्यास कुठल्याही आजाराशी आपण सहज लढू शकतो.

शेवटी, उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही त्यामुळे आजचा दिवस छान मजेत जगत, कोणालाही न दुखवत जगावं म्हणजे कधी खंत करायची वेळ येणार नाही.