fbpx

भारतीय नौदल दिन ४ डिसेंबर

भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो हे  जाणून घेण्यासाठी हा माहितीपर लेख!

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जगभरातील प्रत्येक देशात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भौगोलिक परिस्थिती नुसार प्रत्येक देशाला समुद्र किनारा लाभला नाही त्यामुळे ज्या देशांना समुद्र किनारा आहे त्या देशात नौदलाचे विशेष महत्त्व असते, यात आपल्या भारत देशाचाही समावेश आहे.

स्थापना

भारतीय नौदलाची स्थापना १६१२ मध्ये झाली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या मरीन या रूपाने सैन्य तयार केले होते. 1892 मध्ये त्याचे रॉयल इंडियन मरीन असे नामकरण करण्यात आले. 1934 मध्ये ‘रॉयल इंडियन मरीन’ चे ‘रॉयल इंडियन नेव्ही’मध्ये एकत्रिकरण करण्यात आले. त्यानंतर यातून रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला. 26 जानेवारी, 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला आणि त्यानंतर नौसेना ‘इंडियन नेव्ही’ म्हणून ओळखली जावू लागली.

नौदल दिन

भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा दिवस दरवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.  १९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धातील विजयानंतर ह्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित झाले. 

पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी  भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून  हल्ले चढवले. त्याच वेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात नष्ट करण्याची योजनाही पाकने आखली. भारतीय नौदलाने हे चातुर्याने लक्षात घेऊन त्याप्रमाणे रणनीती आखली.

‘आयएनएस विक्रांत’ चा भीम पराक्रम

भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर मात्र ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाला आपली कुवत लक्षात आली. विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केला.  पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने  लहान  नौकांच्या मदतीने  पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत  कराची बंदरावरच हल्ला चढवला. कराची बंदरावर पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या यावरच हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाही न केलेल्या पाकिस्तान नौदलाचे धाबे दणाणले.

भारताने कराची येथील पाकिस्तानी नौदलाच्या मुख्यालयावर केलेला  हल्ला अतिशय शक्तिशाली होता.भारताने केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानी जहाजे नेस्तनाभुत झालीत. 3 विद्युत वर्गाच्या क्षेपणास्त्र नौका, 2 अँटी सबमरीन यांच्या समावेशाव्यातिरिक्त  या युद्धात प्रथमच जहाजावर जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक यावेळी पाकिस्तानचे तेल टँकरही उद्ध्वस्त करण्यात आले.  या हल्ल्यामुळे कराचीचे बंदर संपूर्णतः उद्ध्वस्त झाले. भारताच्या या हल्ल्याने पाकिस्तानी लष्कर हवालदिल झाले.  ३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्या नंतरच्या दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. या युद्धात मिळालेल्या दैदिप्यमान यशाचे संस्मरण राहावे आणि युध्दातील भारतीय नौदलाच्या शौर्य गाथा येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि नौदलाच्या त्या पराक्रमाची आठवण सदैव राहावी यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.

जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही महाभूतांवर आपल्या धडाडीने आणि शौर्याने  परकीय आक्रमणांना धैर्याने सामोरी जाणारी ही सैन्य दले देशांच्या सुरक्षिततेसाठी, आपले प्राण पणाला लावत असतात.

 ‘युद्धस्य कथा रम्या’ असे म्हटले जाते. पण जवळून पाहिले तर या शूरवीरांच्या आयुष्य जीवावर बेतणाऱ्या संकटांची आणि विस्मयकारक अनुभवांची कहाणीच भासते.    

आजच्या या विशेष दिनी आपल्या नौदलाचे धैर्य, बहादुरी, देशाबद्दलचे जाज्वल्य प्रेम याचा सगळ्यांना एक भारतीय नागरिक म्हणून अभिमान वाटतो.