fbpx

Tulsi Vivah: तुळशी विवाह – पूजा विधी, आरती आणि मंगलाष्टके

Tulsi Vivah: तुळशी विवाह कार्तिकी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा मंगल उत्सव आहे. तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून करतात. मुख्यतः द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. विवाहाची वेळ ही गोधूळी (गाई रानातून चरुन घरी येण्याची वेळ) म्हणजेच सायंकाळची असते. चला तर तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य त्यासाठी करावी लागणारी संपुर्ण तयारी यासह पुजेचा संपुर्ण विधी तोही मंत्रांसह आपण जाणून घेऊया.

Tulsi Vivah तयारी:

तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करुन घ्यावे. वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढावी. ‘राधा-दामोदर प्रसन्न’ असे लिहावे. वृंदावनांतील तुळशींत चिंचा, आवळे ठेवावे. ऊस खोचून ठेवावा. ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे. वृंदावनाभोवती मांडव घालावा. आंब्याचे डहाळे, टाळे, फुलांच्या माळा लावाव्या. वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी.

पूजा साहित्य

नारळ, विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, खोबऱ्याच्या वाट्या, हळद-कुंकू, पंचा, खण, नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, निरनिराळी फळे, लाह्या, बत्तासे, पुजेसाठी कलश, आरतीसाठी निरांजन, धुप- अगरबत्ती, कापूर, अक्षता.

पूजा विधी

पुजेला प्रारंभ करण्यापूर्वी आई-वडिल,गुरू, देव, वरिष्ठ सर्वाना नमस्कार करावा. त्यानंतर स्वतःच्या कपाळी कुंकुवाचा टिळा लावून पुजेला बसावे.

श्रीमन् महागणपतये नमः असा मंत्र म्हणून पुजेला सुरुवात करावी.

“तुलसीसहित श्रीगोपालकृष्ण प्रीत्यर्थं विवाहोत्सांगध्यानावहनादि षोडशोपचार पूजनं करिष्ये “

असे म्हणून कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी.

आचमन

सर्वप्रथम आचमन करावे. हातात पळीने तीन वेळेस पाणी प्यावे, त्यावेळी खाली दिलेल्या नावांचा उच्चार करावा.

ॐ केशवाय नमः ।
ॐ नारायणाय नमः ।
ॐ माधवाय नमः ।

वरील मंत्र झाल्यावर हातात पाणी घेऊन खाली सोडावे.

ॐ गोविंदाय नमः ।

त्यानंतर हात जोडून या देवतांचे नामस्मरण करुन नमस्कार करावा.

ॐ विष्णवे नमः ।ॐ मधुसूदनाय नमः ।ॐ वामनाय नमः ।ॐ श्रीधराय नमः ।ॐ त्रिविक्रमाय नमः ।ॐ ह्रषीकेशाय नमः ।ॐ पद्मनाभाय नमः ।ॐ संकर्षणाय नमः ।ॐ वासुदेवाय नमः ।ॐ दामोदराय नमः ।ॐ प्रद्मुम्नाय नमः ।ॐ अनुरुद्धाय नमः। ॐ पुरुषोत्तमाय नमः ।ॐ अधोक्षजाय नमः ।ॐ नरसिंहाय नमः ।ॐ अच्युताय नमः ।ॐ जनार्दनाय नमः ।ॐ उपेंद्राय नमः ।ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नम:

प्रार्थना

देवतावंदन व प्रार्थना करावी. (हात जोडून पुढील प्रार्थना करावी )

श्रीमन्महागणपतये नमः। इष्टदैवताभ्यो नमः। श्री गुरूभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः।ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः।सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। मातृ-पितृभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। श्री तुलस्यै नमो नमः। प्रारब्धकार्य निर्विघ्नमस्तु।

त्यानंतर प्रार्थना म्हणावी.

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ||

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् ।
येषां हृदिस्थो भगवान्मङ्गलायतनं हरिः ।।

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ।।

संकल्प करताना या मंत्राचा उच्चार करावा. (हातात पाणी घ्यावे त्यात गंध, फुल, अक्षत, 1 सुपारी अन् रुपयाचे नाणे ठेवावे.)

तिथिर्विष्णुस्तथा वारों नक्षत्रं विष्णूरेवच।योगश्च करणं चैव सर्व विष्णूमय जगत। आद्य एवंगुणविशेष्टायां शुभपुण्यातिथौ।

त्यानंतर संकल्प करावा.

संकल्प

मम आत्मन:सकलशास्र पुराणोक्तफलप्राप्तर्थ श्री तुलसीदेवीप्रीत्यर्थम अस्माकं सर्वेषा सकलकुटुंबाना क्षेमस्थैर्य, अभय,आयु, आरोग्य, एैश्वर्य, अभिवृद्धर्थ समस्तमंगलावाप्त्यर्थच तुलसीकृपा प्रसादार्थ श्री (नाव व गोत्र म्हणावे) अद्य शुभयोगे, शुभकरणे, शुभवासरे, कार्तिक तिथौ —-प्रतिवार्षिक विहितम यथाज्ञानेन यथामिलितोपचारद्रव्यै श्री विष्णुमहागणपतीचतुलसीपुजनम करिष्ये।

(हातातील पाणी ताम्हणात सोडावे )

गणपती पूजन

ताम्हणात एक सुपारी ठेवून त्यावर गणपतीचे पूजन करावे .

ॐ गणानांत्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ॥ ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटीसमप्रभ ॥ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥महागणपतयेनमः ध्यानं समर्पयामि ॥

याप्रमाणेच “महागणपतये नमः” या नाममंत्राने गणेशाला पाद्यं (पाणी), अर्घ्यं, स्नानं, वस्त्रं, गंध, अक्षता, पुष्पं, हरिद्राकुंकमंम् (हळद-कुंकू-गुलाल) , धूप (अगरबत्ती), दीप , नैवेद्यं, दक्षिणा, दुर्वा अर्पण करुन नमस्कार करावा.

गणपती पूजा झाल्यावर ती सुपारी तुळशीजवळ ठेवावी व तिथे गंध, पुष्प वाहावे.

श्री विष्णूंची पूजा

त्यानंतर विष्णूंची पूजा करावी. म्हणजे बालकृष्ण किंवा शाळीग्राम (शाळीग्राम असेल तर त्यावर अक्षता वाहु नये)

ताम्हणात देव मूर्ती किंवा शाळीग्राम घ्यावा व त्याला नमस्कार करून पूजा करावी

ॐ श्रीविष्णवे नमः । आवाहनं करोमि । (विष्णूचे आवाहन करावे )

ॐ श्रीविष्णवे नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामी । (आसनासाठी अक्षता अर्पण करीत आहे)

ॐ श्रीविष्णवे नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि । (पाय धुण्यासाठी हे निर्मळ पाणी देत आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः। हस्तयोः अर्ध्यं समर्पयामि । (हात धुण्यासाठी हे निर्मळ पाणी देत आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः । आचमनीयं समर्पयामि । (पिण्यासाठी हे शुद्ध पाणी देत आहे)

ॐ श्रीविष्णवे नमः । स्नानीयं समर्पयामि । (स्नानासाठी हे सप्तनद्यांचे जल अर्पण करीत आहे)

ॐ श्रीविष्णवे नमः । पंचामृतस्नानं समर्पयामि । नंतर पंचामृताने (पंचामृत नसल्यास सुगंधी वा साध्या पाण्याने) देवास स्नान घालावे.

त्यानंतर अभिषेक करावा, विष्णुसहस्रनाम, पुरूषसुक्त, नामावली, हे शक्य नसल्यास खालील नाममात्राने अभिषेक केला तरी चालतो.

ॐ श्रीविष्णवे नमः । अभिषेकस्नानं समर्पयामि । (अभिषेकरूपी स्नान घालीत आहे)

त्यानंतर देवाला स्वच्छ पुसून तुळशीजवळ ठेवावे व त्यानंतर पुढील पूजा करावी

ॐ श्रीविष्णवे नमः | वस्त्रं समर्पयामि | (वस्त्र अर्पण करीत आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः| यज्ञोपवीतं समर्पयामि | (यज्ञोपवीतं(जानवे) अर्पण करीत आहे)

ॐ श्रीविष्णवे नमः| गंध समर्पयामि | (अंगाला हे सुगंधी गंध लावीत आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः| पूजार्थे ऋतूकालोद्भभवपुष्पाणी समर्पयामि| (पूजेसाठी, सध्याच्या ऋतूत उमलणारी ही सुगंधी फुले वाहात आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः| धुपम आघ्रापयामि| (प्रसन्न गंधासाठी उदबत्ती लावीत आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः| दीपं दर्शयामि| (देवतेमधील तेजांशाला दिव्याच्या तेजाने ओवाळीत आहे.)

ॐ श्रीविष्णवे नमः| नैवेद्यं समर्पयामि| (आमच्याकडील उत्तम नैवेद्यं देवाला अर्पण करीत आहे.)

प्रदक्षिणां करोमि, नमस्कारं करोमि, मंत्रपुष्पं समर्पयामि| प्रदक्षिणा घालून, नमस्कार करून, मंत्रपुष्प अर्पण करीत आहे.

वरिल पूजा झाल्यावर तुळशीची पूजा करावी.

तुळस पुजन

हातात अक्षता घेऊन तुळशीदेवीच ध्यान व आवाहन करावे व खालील मंत्र म्हणून झाल्यावर ते तुळशीला अर्पण करा.

देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।।
श्री तुलस्यै नमः। अर्घ्यं समर्पयामि। (फूलाने गंधयुक्त पाणी शिंपडावे)

श्री तुलस्यै नमः। आचमनीयं समर्पयामि। (तुळशीला स्वच्छ फूलाने पाणी शिंपडावे व नमस्कार करावा)

श्री तुलस्यै नमः। पंचामृतस्नानं समर्पयामि। तुळशीला पंचामृतस्नानं घालावे व नंतर स्वच्छ पाणी टाकावे.

तद्नंतर कलशात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणत ते अभिषेकस्नानं तुळशी घालावे.

महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।
श्री तुलस्यै नमः। वस्रं समर्पयामि। (तुळशीला माळवस्त्रे म्हणजे कापसाचे वस्रं घालावे)
श्री तुलस्यै नमः। कंचुकवस्र समर्पयामि। (तुळशीवर कापडी वस्त्र म्हणजे घालावे)

श्री तुलस्यै नमः। कंठसुत्र समर्पयामि। (तुळशीला मंगलसूत्र घालावे)
श्री तुलस्यै नमः। भुषणं समर्पयामि। (तुळशीला दागिने घालावीत)
श्री तुलस्यै नमः। अक्षतान् समर्पयामी। (तुळशीला अक्षता वाहावे)

खालील मंत्र म्हणून तुळशीला हळद-कुंकू, बांगड्या, काजळ वाहावे.

कुंकूमालक्तदिव्यं कामिनी भुषनास्पदम्।सौभाग्यदं गृहाणेदं प्रसीद हरवल्लभे।।
हरिद्राकुंकमंचैव सिंदूर कज्जलान्निवत्।सौभाग्यद्रव्यं संयुक्त गृहाण परमेश्वरी। समर्पयामि। नमस्कारोमि।

नानाविध यथाप्राप्त पुष्पाणि समर्पयामि। (तुळशीला फुले वाहावीत)

श्री तुलस्यै नमः। धुपं समर्पयामि। ( तुळशीला उदबत्ती दाखवावी )
श्री तुलस्यै नमः। दिपं समर्पयामि। ( तुळशीला दिव्याने ओवाळावे )

त्यानंतर नैवेद्य दाखवावा.

नैवेद्यं गृह्यतां देवि भक्ष्य भोज्य समन्वितम् । षडसैरन्वितं दिव्यं लक्ष्मि देवि नमोस्तुते ॥

नैवेद्यावर तुलसीपत्र किंवा पळीने उदक प्रोक्षण करुन

प्राणायस्वाहा , अपानायस्वाहा व्यानायस्वाहा, उदानायस्वाहा, समानायस्वाहा, ब्रह्मणेस्वाहा नैवेद्यं समर्पयामि। (ह्या नाममंत्राणे समर्पण करावा)

पूगीफलेन संयुक्तं तांबुलं प्रतिगृह्यताम् ॥ श्री तुलस्यै नमः। तांबूलं समर्पयामि। ( तुळशीला विडा व सुपारी ठेवावी )

श्रीतुलस्यै नमः। नानाविध फलानि समर्पयामि। ( तुळशीला फळे अर्पण करावी, बोर, आवळा, केळी इ .तुळशीजवळ ठेवावी )

त्यानंतर मंगलाष्टके म्हणावी. मंगलाष्टके झाल्यावर आरती करावी. व तुळशीजवळ दक्षिणा ठेवून प्रदिक्षणा घालावी.

॥यानिकानिच पापानि ब्रह्महत्या समानि च । तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदेपदे ॥

त्यानंतर हातात पाणी घेऊन तुळशीजवळ सोडावे व पूजा संपन्न करावी.

तुळशीची आरती

जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥

ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥

मंगलाष्टक

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं ॥
बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं थेऊरं ॥
लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ।।
ग्रामो रांजणसंस्थितं गणपतीकुर्यात् सदा मंगलम् ।। १ ।।

गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा ।।
कावेरी शरयु, महेंद्रतनया चर्मण्वती वेदिका ||
क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्यातातया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम् || २ ||

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *