Shri Ganapati Pratishthapna Pooja Vidhi | श्री गणपती प्रतिष्ठापना पूजा विधी : गणेशोत्सव संपुर्ण महाराष्ट्र व भारत देशासह संपुर्ण जग भरात साजरा केला जातो. महाराष्ट्रातल्या जवळ जवळ प्रत्येक घरात आणि अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात गणेश उत्सव साजरा केला जातो. तुम्हाला पुरोहित मिळत नसेल किंवा घरच्या घरीच गणेश स्थापना करावयाची असेल तर ती कशी करावी याची माहिती तुम्हाला आम्ही या लेखामध्ये देणार आहोत.
घरामध्ये जिथे आपण गणपती बसवणार आहोत तिथे सर्वप्रथम सजावट करून घ्या. गणपती बसवताना आपण पुर्वेला, पश्चिमेला (पूर्वेकडे मुख) किंवा ईशान्य कोप-यात असावा. तिथे पाटावर लाल वस्त्र घालुन त्यावर अर्धा मूठ अक्षदा ठेवाव्यात आणि हळद कुंकू वाहून बोटाने त्यावर ‘ओम’, ‘स्वस्तिक’ किंवा ‘श्री’ असे मंगल चिन्ह काढावे. त्यानंतर त्यावर गणेश मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती ठेवताना लक्षात घ्या की प्रतिष्ठापना झाल्यानंतर तुम्ही तिला हलवू शकणार नाही. त्यामुळे मूर्तीची जागा ठरवून घ्या आणि आजूबाजूची सजावट आधीच करून घ्या.
गणेश स्थापना पुजा विधी करण्यासाठी लागणारे साहीत्य :
उपकरणे:
- गणपती मूर्ती
- चौरंग
- पळी
- ताम्हण २
- फुलपात्र
- तांब्या २
- अभिषेक पात्र
- निरांजन
- समई
- पूजेचे ताट
- नैवेद्य पात्र
- निर्माल्य पात्र
- देवाचे वस्त्र
- हात पुसण्याचे वस्त्र
- बसायला आसन, चटई, पाट वगैरे.
पूजा साहित्य :
- अक्षता
- चंदनाचे गंध
- हळद कुंकू
- अत्तर
- यज्ञोपवीत (जानवे)
- कापसाचे वस्त्र
- तेलाची समई
- तुपाचे निरांजन
- उदबत्ती
- पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर)
- प्रसादाचा शिरा, मोदक, पेढे वैगरे
- गुळ-खोबरे वाटी
- कापूर
- विड्याची पाने: 12
- सुपारी: 25
- नारळ
- सौभाग्य द्रव्य – बांगडी, मणी मंगळसूत्र आदी.
- दक्षिणा
- 5 फळे, केळी
- दुर्वा, तुळस, पत्री
- हार, फूले
- रांगोळी
- गोमूत्र किंवा गंगाजल
पूजा आरंभ करण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना
- सर्वात प्रथम जी व्यक्ती पुजा करणार आहे त्यांनी धूतवस्त्र किंवा सोवळे नेसायचे आहे. प्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे.
- देवापुढे समई लावून घ्यावी. जर इलेक्ट्रिक माळ किंवा लाईट्स लावले असतील तर ते ही लावून घ्यावेत. पूजास्थानावर भरपूर प्रकाश असेल याची काळजी घ्यावी.
- गणेश स्थापना जिथे होणार आहे त्या खोलीतील केर काढावा. शक्यतो पूजा करणार्या व्यक्तीनेच केर काढावा. ती भूमी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
- आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. या पैकी काही उपलब्ध नसल्यास पाण्यात उदबत्तीची विभूती घालावी आणि ते पाणी खोलीत शिंपडावे. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.
- देवपूजेची उपकरणे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावीत. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान, फुल किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.
- जिथे गणेश स्थापना होणार आहे त्या जागी रांगोळी काढावी. त्यावर हळदी-कुंकू वहावे.
- देवपूजेला बसण्यासाठी आसन म्हणून लाकडी पाट किंवा स्वच्छ कापडाचे आसन घ्यावे.
- पूजा आरंभ करण्यापूर्वी देवघरात विडा सुपारी ठेवून नमस्कार करावा. कुलदेवता आणि इष्टदेवता यांचे स्मरण करावे. घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि पुरोहित यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
- पूजा करतांना गणपती बाप्पा आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होऊन आसनस्थ झाले आहेत आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा ते स्विकारत आहेत, असा भाव मनात ठेवून प्रत्येक उपचार अर्पण करावा.
- रोज सकाळी मूर्तीवरील निर्माल्य काढून षोडशोपचार पूजा करावी. संध्याकाळी षोडशोपचार पूजा किंवा गंध, अक्षता, फुले वाहून पंचोपचार पूजा करावी.
- पूजेतील श्लोक किंवा मंत्र उच्चारता येत नसतील तर केवळ नाममंत्र उच्चारून देवतेला उपचार (उदा. आसनासाठी अक्षता) समर्पित करावेत. उदा. ‘श्री महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।’, असे म्हणावे.
- पाद्य, अर्घ्य, पंचामृतादी प्रत्येक उपचार दूर्वा किंवा फुलाने करावेत. एकदा उपचार केल्यावर हातातील दूर्वा / फुल ताम्हणात सोडावे आणि पुढील उपचारासाठी नवीन दूर्वा / फुल घावे.
- मूर्ती मातीची असल्यास पूजा करतांना पाद्य, अर्घ्य ते अभिषेक येथपर्यंतचे उपचार दूर्वांनी / फुलाने प्रोक्षण करावेत. मूर्ती धातूची असल्यास मूर्तीवर प्रत्यक्ष उपचार अर्पण करू शकता.
१. आचमन:
१. श्री केशवाय नमः ।
२. श्री नारायणाय नमः ।
३. श्री माधवाय नमः ।
चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविन्दाय नमः ।
पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत.
५. श्री विष्णवे नमः ।
६. श्री मधुसूदनाय नमः ।
७. श्री त्रिविक्रमाय नमः ।
८. श्री वामनाय नमः ।
९. श्री श्रीधराय नमः ।
१०. श्री हृषीकेशाय नमः ।
११. श्री पद्मनाभाय नमः ।
१२. श्री दामोदराय नमः ।
१३. श्री सङ्कर्षणाय नमः ।
१४. श्री वासुदेवाय नमः ।
१५. श्री प्रद्मुम्नाय नमः ।
१६. श्री अनिरुद्धाय नमः ।
१७. श्री पुरुषोत्तमाय नमः ।
१८. श्री अधोक्षजाय नमः ।
१९. श्री नारसिंहाय नमः ।
२०. श्री अच्युताय नमः ।
२१. श्री जनार्दनाय नमः ।
२२. श्री उपेन्द्राय नमः ।
२३. श्री हरये नमः ।
२४. श्री श्रीकृष्णाय नमः ।।
२ . प्राणायाम :
प्रणवस्य परब्रह्मऋषि: परमात्मा देवता देवी गायत्रीच्छंद: प्राणायामे विनियोग:ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्
ॐ तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्
ॐ आपोज्योती रसोमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ।
३ . देवतावंदन :
ॐ श्रीमन्महागणाधिपतये नम:
इष्टदेवताभ्यो नम:
कुलदेवताभ्यो नम:
ग्रामदेवताभ्यो नम:
स्थानदेवताभ्यो नम:
वास्तुदेवताभ्यो नम:
मातापितृभ्यां नम:
श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नम:
सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम:
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम: निविघ्ननमस्तु ।
४. देवतास्तवन:
सुमुश्रषैकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप: ।
धूम्रकेतुर्गणणाध्यक्षो भालचंद्रो गजानन:
द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणुयादपि ।
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ।
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये
सर्व मंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तोषाममंगलम् ।
येषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनं हरि: ।
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंदा्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रियुगं स्मरामि ।
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय:
येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दन:
विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान्
सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ।
अभीपिसतार्थसिद्धयर्थं पूजितो य: सुरासुरै:
सर्वविघ्नहरस्तमै गणाधिपतये नम: ।
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा:
देवा: दिशंतु न: सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दना: ।
५. देशकाल उच्चारण :
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया
प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे
श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वंतरे
कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे
दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणेतीरे शालिवाहनशके
शुभनाम संवत्सरे
शुभायने
शुभऋतौ
शुभमासे
शुभपक्षे
शुभतिथौ
शुभवासरे
शुभदिवसनक्षतत्रे
शुभकरणे
शुभस्थिते वर्तमाने चन्द्रे
शुभस्थिते श्रीसूर्ये
शुभस्थिते देवगुरौ
शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु
शुभनामयोगे शुभकरणे
एवंगुणविशेषणाविशिष्टायां शुभपुण्यतिथौ
६. संकल्प :
(येथे पूजा करणाराने स्वत: म्हणावे)
मम आत्मनः श्रुतिस्मृति
पुराणोक्त फलप्राप्तर्थे
श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थे
अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां
द्विपद चतुष्पद सहितानां
क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्धयर्थं
समस्त मंगल अवाप्यर्थं
समस्त अभ्युदयार्थं च अभीष्ट कामनासिद्धर्यं
प्रतिवार्षिकविहितं
पार्थिव सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थं
यथाज्ञानेन यथामिलित उपचारद्रव्यैः
प्राणप्रतिष्ठापनपूर्वकं
ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजनमहं करिष्ये ॥
तत्रादौ निर्विघ्नता सिद्धयर्थं महागणपतीस्मरणं
शरीरशुद्धयर्थं पुरुषसुक्त षडंगन्यासं
कलशशंखघंटापूजनं च करिष्ये ॥
टीप :- ज्या ठिकाणी ‘अमुक’ शब्द आला आहे, तेथें पूजेच्या दिवशी पंचांग पाहून त्याप्रमाणे संवत्सराचे नांव, तिथि व वारांचे नांव, तसेच त्या दिवशी असलेले नक्षत्र, योग, करण, चंद्रराशि, सूर्यराशि व गुरुराशि यांचे उल्लेख करावे.
७. न्यास :
पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठऋषिः
कूर्मो देवता सुतलं छंदः आसने विनियोगः ।
ॐ पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता ।
त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम ॥ इति आसनं विधाय ।
ॐ अपसर्यंतु ते भूता ये भूता भुमिसंस्थिताः ।
ये भुता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाजया ॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशम ।
सर्वेषामविरोधेन पूजाकर्म समारभे ॥
इति भूतोत्सादनं कृत्वा अथ षडङन्यासः ।
ॐ भुर्भुवः स्वःहृदयाय नमः । (छातीला उजवा हात लावावा. )
ॐ भूर्भुवः स्वः शिरसे स्वाहा । ( मस्तकाला उजवा हात लावावा.)
ॐ भूर्भुवः स्वः शिखायै वषट । (शेंडीला उजवा हात लावावा. )
ॐ भूर्भुवः स्वः कवचाय हुम । ( दोन्ही हातांची ओंजळ करून छातीकडे तीन वेळा फिरवावी. )
ॐ भूर्भुवः स्वः नेत्रत्रयाय वौषट । ( डोळे व भुवईच्यामध्ये उजवा हात लावावा. )
ॐ भूर्भवः स्वः अस्त्राय फट । (टाळी वाजवावी ) इति ।
८. कलश पूजा:
कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः ।
मूले त्वस्य स्थतो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ।
कुक्षौ तू सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ।
ऋग्वेदोऽथ जुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः ।
अंगैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टिकरी तथा ।
आयांतु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः ।
गंगे च युमने चैव गोदवरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः ।
कलशाला हळद कुंकू, अक्षता आणि फुल वाहावे. नमस्कार करावा. धूप दीप ओवाळावे.
९. शंख पूजा :
शङ्खं चन्द्रार्क दैवत्यं मध्ये वरुणदैवतम् ।
पृष्ठे प्रजापति विद्यात् अग्रे गङ्गासरस्वती ॥
त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करें
निर्मितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते ।
शंखाला हळद कुंकू, अक्षता आणि फुल वाहावे. नमस्कार करावा. धूप दीप ओवाळावे.
१०. घंटा पूजा :
आगमार्थं तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम् ।
कुर्वे घंटारवंतत्र देवताहवानलक्षणम् ।
घंटा वाजवून पूजा स्थानावर ठेवावी. घंटेला हळद कुंकू, अक्षता आणि फुल वाहावे. नमस्कार करावा. धूप दीप ओवाळावे.
११. दिप पूजा :
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुर्त्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।।
(समई आणि निरंजनाला) हळद कुंकू, अक्षता आणि फुल वाहावे. नमस्कार करावा.
१२. आसन/ मंडप पूजा :
मण्डपदेवताभ्यो नमः ।
देवाच्या पाटावर किंवा पूजास्थळाच्या भूमीवर हळद कुंकू, अक्षता आणि फुल वाहावे. नमस्कार करावा.
१३. उदक प्रोक्षण / शुद्धीकरण :
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।
यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।
दुर्वेने किंवा फुलाने संपूर्ण पूजा साहित्यावर, पूजा स्थळावर आणि स्वतः वर उदक प्रोक्षण करावे.
१४. प्राणप्रतिष्ठा :
गणपती बाप्पाच्या हृदयावर उजवा हात ठेवावा आणि पुढील मंत्र म्हणावा
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठा मन्त्रस्य ब्रह्मविष्णुमहेश्वराय-ऋषयः ऋग्यजुःसामानि छन्दांसि पराप्राण-शक्तिर्देवता आं बीजं ह्रीं
शक्तिः क्रों कीलकम् अस्यां मुर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य प्राणाइहप्राणाः ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य जीव इह स्थितः ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।।
ॐ आंह्रींक्रों अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्रींआं हंसः सोहम् । देवस्य वाङ्मनःचक्षुःश्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखंसुचिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।
अस्यै देवत्वम आर्चायै माम हेति च कश्चन ।।
दुर्वांकुरांच्या देठांना साजूक तुपात बुडवून देवाच्या नेत्रांभोवती काजळ लावल्याप्रमाणे फिरवावे आणि ‘ॐ’ किंवा ‘परमात्मने नमः ।’ असे १५ वेळा म्हणावे.
प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर उत्तर पूजा होईपर्यंत देवाची मूर्ती हलवू नये.
षोडशोपचार पूजा
१. पहिला उपचार – आवाहन
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर ।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पुजलेल्या, अनाथांच्या नाथा आणि सर्वज्ञ गणनायका, मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहयामि ।।
२. दुसरा उपचार – आसन
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना देवांच्या चरणी वहा.
विचित्ररत्न रचितं दिव्यास्तरण संयुतम् ।
स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
३. तिसरा उपचार – पाद्य
उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
सर्वतीर्थ समुद्भूतं पाद्यं गन्धादिभिर्युतम् ।
विघ्नराज गृहाणेदं भगवानं भक्तवत्सल ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । पाद्यं समर्पयामि ।।
४. चौथा उपचार – अर्घ्य
डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा किंवा फुल घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी सिद्धिविनायकाच्या चरणांवर शिंपडा.
अर्घ्यं च फलसंयुक्तं गन्धपुष्पा_क्षतैर्युतम् ।
गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । अर्घ्यं समर्पयामि ।।
५. पाचवा उपचार – आचमन
डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा किंवा फुल घ्या. नंतर ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि श्री गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैर अभिवन्दितम् ।
गंगो_दकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि ।।
६. सहावा उपचार – स्नान
पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा किंवा फुल घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना ते पाणी सिद्धिविनायकाच्या चरणांवर शिंपडा.
गंगासरस्वती रेवा पयोष्णी_यमुनाजलैः ।
स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि ।।
६ अ. पंचामृतस्नान
दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध, तद्नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.
पयो दधि घृतं चैव मधुशर्करयान्वितम् ।
पंचामृतं मयानीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः । पयस्नानं समर्पयामि ।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । दधिस्नानं समर्पयामि ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । घृतस्नानं समर्पयामि ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । मधुस्नानं समर्पयामि ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । शर्करास्नानं समर्पयामि ।।
तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।।
पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे.
६ आ. गंधोदकस्नान
श्रीसिद्धिविनायकाय नमः । गन्धोदकस्नानं समर्पयामि ।। तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।।
(देवांच्या चरणी पाण्यात गंध अन् कापूर घालून ते प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. )
६ इ. अभिषेक
पंचपात्रीमध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा किंवा फुल घ्यावे. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना ‘श्रीगणपति अथर्वशीर्ष’ किंवा ‘संकटनाशन गणपतिस्तोत्र’ म्हणावे.
७. सातवा उपचार – वस्त्र
कापसाची दोन तांबडी वस्त्रे घ्या अन् ‘समर्पयामि’ म्हणतांना त्यांतील एक वस्त्र मूर्तीच्या गळ्यात अलंकारासारखे घाला, तर दुसरे मूर्तीच्या चरणांवर ठेवा.
रक्तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमंगलम् ।
सर्वप्रद गृहाणेदं लम्बोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।
८. आठवा उपचार – यज्ञोपवीत
सिद्धिविनायकाला यज्ञोपवीत (जानवे) अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात.
राजतं ब्रह्मसूत्रं च काञ्चनस्यो त्तरीयकम्
।विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपविताचा तू स्वीकार कर.
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
श्री उमायै नमः । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
यज्ञोपवीत हे श्री गणेशाच्या गळ्यात घालावे आणि नंतर ते मूर्तीच्या उजव्या हाताखाली घ्यावे. पूजेत महादेवाची मूर्ती नसल्याने ज्या ठिकाणी महादेवाचे आवाहन केले असेल, त्या ठिकाणी यज्ञोपवीत अर्पण करावे.
९. नववा उपचार – चंदन
श्री गणपतीला अनामिकेने गंध लावावे.
श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् ।
विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।
श्री उमायै नमः । हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ।।
(हळद-कुंकू वहावे.)श्री उमायै नमः ।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । सिन्दूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)
१०. दहावा उपचार – फुले-पत्री
उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावीत.
माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो ।
मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ।।
गणपती बाप्पाला हार घालावा, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वा बाप्पाच्या डोक्यावर किंवा सोंडेत अर्पण कराव्यात.
सेवन्तिका बकुलम्पक पाटलाब्जैः पुन्नागजाति करवीर रसालपुष्पैः ।
बिल्वप्रवाल तुलसीदल मालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ।।
अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावीत. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी, चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्वरा, तू प्रसन्न हो.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।
महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे.
श्री उमामहेश्वराभ्यां नमः । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा
पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.
श्री गणेशाय नमः । पादौ पूजयामि ।। (चरणांवर)
श्री विघ्नराजाय नमः । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर)
श्री आखुवाहनाय नमः । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर)
श्री हेरम्बाय नमः । कटिं पूजयामि ।। (कमरेवर)
श्री कामारिसूनवे नमः । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर)
श्री लम्बोदराय नमः । उदरं पूजयामि ।। (पोटावर)
श्री गौरीसुताय नमः । हृदयं पूजयामि ।। (छातीवर)
श्री स्थूलकण्ठाय नमः । कण्ठं पूजयामि ।। (गळ्यावर)
श्री स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयामि ।। (खांद्यांवर)
श्री पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्त्राय नमः । वक्त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नमः । नेत्रे पूजयामि ।। (डोळ्यांवर)
श्री सर्वेश्वराय नमः । शिरः पूजयामि ।। (मस्तकावर)
श्री गणाधिपाय नमः । सर्वाङ्गं पूजयामि ।। (सर्वांगावर)
पत्रीपूजा
पुढील नावांनी देठ देवाकडे करून ‘समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. (सर्व ठिकाणी प्रत्येक प्रकारची पत्री उपलब्ध असेलच, असे नाही. त्यामुळे जी पत्री उपलब्ध झाली नसेल, त्या पत्रीच्या ठिकाणी देवाला २ दूर्वा किंवा अक्षता वहाव्यात.)
श्री सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान)
श्री गणाधिपाय नमः । भृङ्गराजपत्रं समर्पयामि ।। (माका)
श्री उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल)
श्री गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्या दूर्वा)
श्री लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा)
श्री गजकर्णाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस)
श्री गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा)
श्री वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी)
श्री एकदन्ताय नमः । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा)
श्री विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर)
श्री विनायकाय नमः । अश्मन्तकपत्रं समर्पयामि ।। (आपटा)
श्री कपिलाय नमः । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई)
श्री भिन्नदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा)
श्री पत्नीयुताय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण)
श्री बटवेनमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब)
श्री सुरेशाय नमः । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार)
श्री भालचन्द्राय नमः । मरूबकपत्रं समर्पयामि ।।(मरवा)
श्री हेरम्बाय नमः । सिन्दुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड)
श्री शूर्पकर्णाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई)
श्री सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)
यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे उच्चारून एकेक दूर्वा अर्पण करतात.
दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)
दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावाने दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर ‘दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे.
श्री गणाधिपाय नमः ।श्री उमापुत्राय नमः ।श्री अघनाशनाय नमः ।श्री एकदन्ताय नमः ।श्री इभवक्त्राय नमः ।
श्री मूषकवाहनाय नमः ।श्री विनायकाय नमः ।श्री ईशपुत्राय नमः ।श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ।श्री कुमारगुरवे नमः ।।
नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदन्तेभवक्त्रेति तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।
श्री सिद्धिविनायकाय नमः । दूर्वामेकां समर्पयामि ।।
११. अकरावा उपचार – धूप
उदबत्ती ओवाळावी किंवा धूप दाखवावा.
वनस्पति रसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः ।
आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्त असलेला आणि सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।।
१२. बारावा उपचार – दीप
आज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्या देवेशा, मी अग्नीने संयुक्त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, भक्तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
१३. तेरावा उपचार – नैवेद्य
उजव्या हातात २ दूर्वा (दूर्वा नसल्यास तुळशीपत्र किंवा बेलाचे पान चालेल.) घेऊन त्यांच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून दूर्वा हातातच धराव्यात. दुर्वांसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु ।
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।
शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्ती अचल करावी. या लोकात माझे अभीष्ट आणि ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्त व्हावी. खडीसाखर आदी खाद्यपदार्थ; दही, दूध, तूप आदी भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा.
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः ।पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।।
प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः ।
उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।।
टीप – वेदोक्त पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या ठिकाणी ‘ॐ प्राणाय स्वाहा ।’ अशा प्रकारे मंत्र म्हणतात.
पूजकाने हातातील १ दूर्वा नैवेद्यावर ठेवावी आणि दुसरी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहावी. उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.
नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि ।
उत्तरापोशनं समर्पयामि ।हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।
फुलाला गंध लावून देवाला वहावे.
श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।।
आरती
नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करावी.
- आरती करतांना ‘श्री गणेश प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती करावी.
- आरतीचे तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत (छातीपासून कपाळापर्यंत) ओवाळावी.
- आरतीला उपस्थित असलेल्यांनी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन ती म्हणावी.
- आरती म्हणतांना ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला वाद्ये हळुवार वाजवावीत. घंटा मंजुळ नादात वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
मराठी आरती संग्रह आणि हिंदी आरती संग्रह आपल्या वंदे महाराष्ट्र (Vande Maharashta) पोर्टल वर इथे उपलब्ध आहेत.
आ. कापूर आरती
कर्पूरगौरं करूणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम्।
सदा वसंतं ह्रदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि ॥
आरती झाल्यावर ‘कर्पूरगौरं करुणावतारं०’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी. उपस्थितांना आरती देण्याआधी देवघरातल्या देवांना आणि कुलदेवतेला ओवाळावी आणि मग इतरांना द्यावी.
इ. आरती ग्रहण करणे
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.) सध्या बर्याच ठिकाणी आरतीनंतर ‘मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार’ या क्रमाने उपचार केले जातात. परंतु शास्त्रात आरतीनंतर ‘नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प’ हा क्रम सांगितला आहे. यासाठी येथे याच क्रमाने उपचार दिले आहेत.
१४. चौदावा उपचार – नमस्कार
पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.
नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।
साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ।।
सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटीयुगधारिणे नमः ।।
नमोऽस्त्वनन्ताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या अन् सर्वांचे हित करणार्या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्त्र शरिरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या; सहस्त्र नावे असलेल्या; सहस्त्र कोटी युगांना धारण करणार्या; शाश्वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । नमस्कारान् समर्पयामि ।।
१५. पंधरावा उपचार – प्रदक्षिणा
नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावेत आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वतःच्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी.
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्य भावेन रक्ष माम् परमेश्वर ।।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
श्रीसिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।।
१६. सोळावा उपचार – मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना
श्रीसिद्धिविनायकाय नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि । (देवाला मंत्रपुष्पांजली अर्पण करावी.) नंतर पुढील प्रार्थना करावी.
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।
अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. जी काही मी तुझी पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्त्रो अपराध घडत असतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धी आदींद्वारे काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.
अनेन देशकालाद्यनुसारतः कृतपूजनेन ।
श्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयतां ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
अर्थ : देव माझ्यावर प्रसन्न होवो. हे सर्व कर्म ब्रह्माला अर्पण करतो.
जयघोष
देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
पूजेच्या शेवटी व्यक्त करावयाची कृतज्ञता
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझ्या कृपेने माझ्याकडून भावपूर्ण पूजा झाली. तुझ्या कृपेने पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहिले. पूजेतील चैतन्याचा मला लाभ झाला. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
या वेळी डोळे मिटून ‘मूर्तीतील चैतन्य आपल्या हृदयात येत आहे’, असा भाव ठेवावा.
तीर्थप्राशन आणि प्रसादग्रहण
उजव्या हातावर तीर्थ घेऊन पुढील मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करावे.
अकालमृत्यु हरणं सर्वव्याधि विनाशनम् ।
देव पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ।।
अर्थ : अकाली मृत्यू येऊ नये आणि सर्व व्याधींचा नाश व्हावा, या उद्देशाने मी देवाचे (श्री उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायकाचे) चरण धुतलेले पवित्र तीर्थ प्राशन करून माझ्या जठरामध्ये धारण करतो. तसेच प्रसादही भावपूर्णरीत्या ग्रहण करावा.
मोदक वायनदान मंत्र
एका केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये १० किंवा २१ मोदक ठेवावेत. त्यावर केळीचे पान किंवा ताट उपडे ठेवावे. त्यावर गंध-फूल वहावे. नंतर पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय ।
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् ।
विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।
यानंतर आचमन करून ‘विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.
उत्तरपूजा
कुलाचाराप्रमाणे मूर्तीचे विसर्जन योग्य दिवशी करावे. त्या वेळी गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्यासाठी दही, भात, मोदक असे पदार्थ पूजेत असावेत. प्रारंभी स्वतःला कुंकुमतिलक लावावा. नंतर आचमन करावे आणि हातांत अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा.
श्री सिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थम् उत्तराराधनं करिष्ये ।
तदङ्गत्वेन ध्यान गन्धादि पञ्चोपचारपूजनमहं करिष्ये ।
श्री उमामहेश्वरसहितसिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।
(आता मी उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक देवतेला नमस्कार करून त्याचे ध्यान करत आहे.)
१. गंध (चंदन) लावणे
श्रीसिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।
(लेपनासाठी चंदन अर्पण करत आहे.)
श्री उमायै नमः । हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि ।।
(श्री उमादेवीला नमस्कार करून हळदी-कुंकू वहात आहे.)
२. पत्री आणि फुले वहाणे
श्रीसिद्धिविनायकाय नमः । नानाविधपत्राणि समर्पयामि ।।
श्रीसिद्धिविनायकाय नमः । ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।।
(श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करून या ऋतूमध्ये उत्पन्न झालेली नानाविध पत्री आणि फुले अर्पण करत आहे.)
३. धूप (उदबत्ती) दाखवणे : श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि ।। (धूप दाखवत आहे.)
४. दीप ओवाळणे : श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।। (दीप ओवाळत आहे.)
५. नैवेद्य दाखवणे : श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।। (नैवेद्य अर्पण करत आहे.) (वरील उपचार करतांना करावयाच्या कृती यापूर्वी सांगितल्या आहेत.)अनेन कृतपूजनेन श्री उमामहेश्वरसहितश्रीसिद्धिविनायकः प्रीयताम् ।
अर्थ : या पूजेने उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक देवता प्रसन्न होवो. (‘प्रीयताम्’ म्हणतांना उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)
नंतर पुढील मंत्र म्हणावा.प्रीतो भवतु । तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।
अर्थ : देव माझ्यावर प्रसन्न होवो. या पूजेचे फळ मी ब्रह्माला अर्पण करतो.उजव्या हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणावा.
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिध्द्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. नंतर त्या अभिमंत्रित अक्षता श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच श्री उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर वहाव्यात. नंतर मूर्ती स्थानापासून थोडी हालवावी आणि कुलाचारांनुसार वहात्या पाण्यात तिचे विसर्जन करावे. (पूजेविषयीचे सविस्तर शास्त्रीय विवेचन सनातन-निर्मित ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ यात दिले आहे.)