fbpx

Shirish Kanekar : शिरीष काणेकर – वाढदिवस अभिष्टचिंतन

Shirish Kanekar : मराठी साहित्यातील आजवर अनेक नामवंत लेखक – लेखिकांनी त्यांच्या साहित्यातून वाचकांच्या मनात अढळ स्थान पटकावून वाचकांची दाद मिळवली आहेत. प्रत्येक लेखकाची त्यांच्या वाचकांना आवडणारी एक विशिष्ट लेखन शैली आहे. गंभीर, विनोदी, हळवी, रोखठोक अशा काही शैली मिळून एक स्वतंत्र अस्तित्व असलेले एक खास लेखन म्हणजे लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांची कणेकरी शैलीतील लेखन. या सगळ्याच भावना त्यांच्या लेखनातून व्यतीत होतात म्हणून त्यांच्या चाहत्यांनी स्वतःहूनच ‘कणेकरी शैली’ असे त्यांच्या लिखाणाला जणू घोषितच केले आहे. या आपल्या आवडत्या लेखकाचा आज 81 वा वाढदिवस! त्या निमित्ताने त्यांच्या विषयी लिहिलेला हा अनौपचारिक लेख! अनौपचारिक का? तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या ह्या लेखात मी आणि माझे कुटुंब मागचे अनेक वर्ष त्यांचे लेखन, पुस्तके वाचताना लेखक वाचक ह्या नात्याने जो ऋणानुबंध तयार झाला आहे तोच या लेखातून मी मांडत आहे.

कधी गंभीर, कधी विनोदी, कधी तिरकस तर कधी रोखठोक अशा भाषेत आसपासच्या माणसांची स्वभाव वर्णन, किस्से,अनुभव आपल्या लेखणीतून जेव्हा ते मांडतात तेव्हा आपल्याला वैयक्तिक कधीही न भेटलेली ती माणसे आपल्याही ओळखीची होतात.

त्यांच्या पुस्तकात ते म्हणतात की चाहत्यांनी त्यांच्या लेखनाचे कौतुक करत जाहीर केलेली त्यांची कणेकरी शैली म्हणजे नेमके काय हे मलाच कळले नाही. ह्याचं कारण हे आहे की त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधताना ते जसे बोलतात, एखाद्या चर्चेत ते जसे विचार मांडतात , लिहिताना ते तसेच्या तसे कागदावर उतरवतात. त्यात मुद्दाम , आवर्जून असा कोणताही दिखावा, आव ते आणत नाही. पटलेलं नसताना शुगर कोटिंग बोलणे त्यांना व्यक्तिशः आवडत नाही त्यामुळे त्यांची हीच विचार करण्याची पद्धत त्यांच्या लेखणीतून उतरते. म्हणूनच त्यांच्या चाहत्यांना ती आपलीशी वाटते.

सर्वसामान्यांना कळेल अशी ओघवती भाषा, बोजड – क्लिष्ट शब्दरचना न वापरता रोजच्याच व्यावहारिक भाषेत बोलली जाणारे मराठी शब्द रचना, लेखाची लक्षवेधी सुरुवात आणि शेवट, मनापर्यंत पोहोचणारे मानवी भावभावनांचे शब्दांकन ह्या शिरीष कणेकर यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. ह्याच वैशिष्ट्यांमुळे त्यांची पुस्तके , लेखन आज प्रत्येक सुजाण वाचकाच्या घरात लोकप्रिय आहे.

हे ही वाचा : प्रा. प्रज्ञा पंडित यांच्या ५ पुस्तकांचे शिरीष काणेकर यांच्या हस्ते प्रकाशन

कळायला लागलं तेव्हापासून माझे ठाण्यातल्या वाचनालयात वडिलांबरोबर जाणे येणे होते. लहान असतानाच बालकथा वाचायचं वेड कमी झाल्यावर मग पुढे इतर साहित्या बरोबरच ललित लेखन, प्रवासवर्णन ह्याचं वाचन वाढलं. ह्या सर्व साहित्य प्रवाहात ज्यांचा हातखंडा आहे अशा शिरीष कणेकर यांच्या पुस्तकांना घरात कायमच मानाचं स्थान मिळालं. त्यांचे लेखन वाचतानाच मी अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून खूप काही शिकले आहे. लिहावे कसे, लेखाची सुरुवात आणि शेवट कसा असावा, ललित लेखन करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत, लिखाणाचा प्रवास कसा असावा, लिहिताना कुठे थांबावं, कुठे थांबू नये ह्या सगळ्या लेखन संबंधी तांत्रिक गोष्टी मी त्यांची पुस्तके, लेख वाचून शिकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझे आजवर जे काही लेखन प्रकाशित झाले आहे त्याचे श्रेय मी माझ्या आयुष्यातील ज्या महत्त्वाच्या व्यक्तींना देते त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे श्री शिरीष मधुकर कणेकर.

नुकतेच माझ्या पाच पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यात पार पडले. नुकतेच म्हणजे सरांच्या वाढदिवसाच्या बरोबर एक महिना आधी 6 मे रोजी! माझी मनापासून इच्छा होती की माझ्या ह्या सर्व पुस्तकांचे प्रकाशन कणेकर सरांच्या हस्ते व्हावे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी माझ्या ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष स्थान स्वीकारून मला कृतकृत्य केलं. ज्यांचे लेखन वाचत लहानाची मोठी झाले त्यांच्याच हस्ते माझी पुस्तके प्रकाशित झाली हे माझे अहोभाग्य आहे.

कणेकर सर, तुम्ही आम्हा वाचकांना आजवर खूप काही दिले, तुमच्या लिखाणातून आम्हाला तुम्ही कधी खळखळून हसवले, तर कधी तुमचे भावनिक लेखन वाचताना डोळ्यांच्या कडा पाणावल्या देखील! माझी फिल्लमबाजी, कणेकरी यासारखे कार्यक्रम करताना प्रेक्षकाना खो खो हसवलेत, कधी व्यक्तिचित्रे रेखाटताना माणसे कशी ओळखायची हेही शिकवलेत…! तुम्ही जेव्हा लता,आशा, राजेश खन्ना ह्या सारख्या कलाकारांचे किस्से सांगता तेव्हा आम्हाला वाटतं की आम्हीही त्यांना भेटलो आहोत.

अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचे लेखन मला फार जवळचे का वाटते तर अनेक लेखात तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख केला आहे, त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. खरं सांगते, ते वाचताना वाचक म्हणून तर माझे डोळे भरून येतातच, पण रे वाचताना मला माझेही वडील आठवतात. त्यांच्यासाठी खूप काही करायचं राहुन गेलं असं जेव्हा तुम्ही लिहिलं ते वाचताना ती हुरहूर माझ्याही मनात दाटून येते.

एका लेखात त्यांनी लिहिले आहे की त्यांचे वडील वयाच्या 51व्या वर्षी गेले तर आई अवघ्या 26व्या वर्षी! दोघांच्या वयांची बेरीज त्यांच्या आजच्या वयापेक्षाही कमी भरते. रोज रात्री निजताना जेव्हा ते त्यांच्या फोटोला नमस्कार करतात तेव्हा जणू त्यांचे आईवडील म्हणतात की अरे आम्ही लहान आहोत तुझ्यापेक्षा! आम्हाला कसला नमस्कार करतोस!

कणेकर सर, ह्या तुमच्या भावनांनी फक्त तुमचेही नाही तर तुमच्या वाचकांचेही डोळे भरून येतात!

माझ्या मते तुमच्याबद्दल तुमचे एका वाक्यात वर्णन करायचे तर श्री कणेकर म्हणजे ‘ स्वच्छ, नितळ मनाची व्यक्ती ‘! ज्यांच्या बोलण्यावर, मतावर समोरचा माणूस व्यक्ती डोळे झाकून विश्वास ठेवू शकते अशी व्यक्ती म्हणजे श्री शिरीष मधुकर कणेकर!

आजच्या ह्या शुभदिनी, तुमच्या 81व्या वाढदिवशी माझ्याकडून आणि तुमच्या सर्व चाहत्यांकडून तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा! तुम्हाला सुदृढ निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! सर, तुम्ही पुष्कळ जगा आणि कायम आनंदी रहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *