Sarojini Naidu – Nightingale of India: भारताची कोकिळा सरोजिनी नायडू
Sarojini Naidu: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण पणाला लावलेली, आपले सर्वस्व अर्पण केलेली, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून आपले अमूल्य योगदान दिलेली प्रत्येक व्यक्तिमत्त्व होती. त्यातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या उदंड कार्यांमुळे आपल्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सरोजिनी नायडू. भारताची कोकिळा असे ज्यांना संबोधले जाते त्या सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.
जन्म आणि शिक्षण
सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद येथील सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी) होते. अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील ब्रह्मनगर गावचे. अघोरनाथ १८७८ साली हैदराबाद येथे शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे तेथेच निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. सरोजिनींच्या आईचे नाव वरदासुंदरीदेवी बंगाली कवयित्री होत्या. अशा सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात सरोजिनीचा जन्म झाला. सरोजिनींचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. 1892 साली वयाच्या बाराव्या वर्षी मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या. त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे 1895 साली त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या. लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्या मायदेशी परतल्या.
Sarojini Naidu: भारताची कोकिळा
आईपासून प्रेरणा घेत सरोजिनीही लहानपणापासूनच कविता करू लागल्या होत्या. सरोजिनींच्या कवितांमुळे त्यांना ‘भारताची नाइटिंगेल’ किंवा ‘भारत कोकिला’ ही उपाधी महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली. सरोजिनींच्या कवितेत लहान मुलांच्या कविता आणि देशभक्ती, प्रणय आणि शोकांतिका यासह अधिक गंभीर विषयांवर लिहिलेल्या दोन्ही कवितांचा समावेश आहे. 1912 मध्ये प्रकाशित, “इन द बाजार्स ऑफ हैदराबाद” ही त्यांची सर्वात लोकप्रिय कविता आहे.
इंग्लंड मध्ये वास्तव्यास असतांना सरोजिनींचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले. यानंतर १९१७ मध्ये त्यांचा ‘द ब्रोकन विंग’ (१९१७) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता खूप लोकप्रिय झाल्या होत्या . पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला आणि ‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला.
हे ही वाचा: क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
प्रभावी वक्तृत्व
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान कार्यकर्त्यां, उत्कृष्ठ वक्त्त्या आणि संवेदनशील कवयित्री म्हणून सरोजिनी नायडू यांची ओळख होती. त्यांचे भाषण श्रोत्यांना खिळवून ठेवणारे असे असा आपला इतिहास सांगतो. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोपाळकृष्ण गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.
स्वातंत्र्य लढ्यातील कार्य
सरोजिनी नायडूंनी गोपाळकृष्ण गोखल्यांना गुरूस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. १९१४ मध्ये सरोजिनी महात्मा गांधींना भेटल्या, ज्यांना त्यांनी राजकीय कृतीसाठी नवीन वचनबद्धतेची प्रेरणा देण्याचे श्रेय दिले. 1917 नंतर, त्या गांधींच्या ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या अहिंसक प्रतिकाराच्या सत्याग्रह चळवळीत सामील झाल्या. ब्रिटीश राजवटीपासून मुक्त होण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑल इंडिया होम रूल लीगचा एक भाग म्हणून सरोजिनी 1919 मध्ये लंडनला गेल्या. पुढच्या वर्षी त्यांनी भारतातील असहकार चळवळीत भाग घेतला. देशावर पराकोटीचे प्रेम असलेल्या सरोजिनी नायडूंनी राष्ट्रीय आंदोलनादरम्यान महात्मा गांधीना साथ दिली.
पुढे 1930 मध्ये, ऐतिहासिक अशा मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. गांधींना सुरुवातीला महिलांना दांडी यात्रेसाठी सामील होण्याची परवानगी द्यायची नव्हती, कारण अटकेच्या उच्च जोखमीसह ती यात्रा शारीरिकदृष्ट्या कष्टाचीही होती. पण सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि खुर्शेद नौरोजी यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे मन वळवले आणि मोर्चात सामील झाल्या. 6 एप्रिल 1930 रोजी गांधींना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी सरोजिनी नायडू यांची मोहिमेच्या नव्या नेत्या म्हणून नियुक्ती केली.
गांधी-आयर्विन कराराच्या पार्श्वभूमीवर सरोजिनी नायडू यांना ब्रिटिशांनी 1932 मध्ये तुरुंगात टाकले होते. त्यानंतर 1942 मध्येही ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल ब्रिटिशांनी नायडू यांना पुन्हा तुरुंगात टाकले. त्यांना 21 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता.
Sarojini Naidu: समाज कार्य
सरोजिनी नायडूंनी भारतीय स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्कांचा, विशेषतः महिलांच्या शिक्षणाचा प्रचार केला. न्याय तर्काच्या पाच भागांच्या वक्तृत्व रचनांनुसार त्यांनी अनेकदा युक्तिवाद केले. त्यांनी 1906 मध्ये कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय सामाजिक परिषदेला संबोधित केले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. तसेच पूर निवारणासाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यातही त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1911 मध्ये ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्ण पदक मिळाले होते, जे त्यांनी नंतर एप्रिल 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले.
सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. याशिवाय, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्षा आणि INC परिषदेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. आजही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा करताना सरोजिनी नायडूंचे नाव आवर्जून प्रामुख्याने घेण्यात येते. त्या काळातही सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या आणि आज जेव्हा महिला प्रत्येक क्षेत्र यशस्वीपणे पादाक्रांत करत आहेत तेव्हा देखील सरोजिनी नायडू यांचे नाव आणि त्यांचे गौरवशाली कार्य प्रत्येक भारतीय स्त्रीला अभिमानास्पद वाटते.