पुरण पोळी
पुरण पोळी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बनविली जाणारी एक गोड पोळी आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्येही पुरण पोळी बनविली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने होळी, गणेश चतुर्थी आणि बैल पोळा या सारख्या सणांना पुरण पोळी बनविली जाते. कशी बनवायची पुरण पोळी? चला पाहुया.
साहित्य
३०० ग्रॅम हरभरा डाळ
३०० ग्रॅम गूळ किंवा साखर
एक छोटा चमचा वेलची पूड, जायफळ आणि सुंठ आवडीनुसार
१५० ग्रॅम गहू पीठ किंवा मैदा
पाणी
अपवाद : गुजरातमध्ये तूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.
कृती
1) कुकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ झाकण ठेवून डाळ ४/५ शिट्यांपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. मोठी आच ठेवू नका. डाळ शिजली की, त्यातील पाणी काढून घ्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी तयार करता येते.
2) डाळीतील पाणी काढल्यानंतर ती डाळ एका पसरत भांड्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. ते आटवताना वरचेवर ढवळत रहा. जर तुम्ही ते मिश्रण ढवळले नाहीत, तर ते करपू शकेल. या मिश्रणात चमचाभर वेलची पूड घालावी. आवडीनुसार थोडे जायफळ घालावे. मिश्रण घट्ट होईल आणि पुरण तयार होईल.
3) पूरण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे आणि ते पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे. पुरण थंड झाल्यावर ते नीट वाटले जाणार नाही. पुरण यंत्र नसल्यास मिक्सर,पाटा वरवंटा किंवा बटाटा मॅशर या पैकी उपलब्ध असलेल्या कुठल्याही साधनाने तुम्ही पुरण वाटू शकता. पूरण बारीक दळले जाणे गरजेचे आहे.
4) यानंतर गव्हाचं पीठ किंवा मैदा घेऊन त्यात 5 ते 6 चमचे तेल घालावे आणि हे पीठ सैलसर मळून घ्यावे. पोळ्यांना पिवळा रंग हवा असल्यास कणिक मळताना त्यात थोडीशी हळद मिसळावी. ही भिजवलेली कणिक 2 तास ठेवून द्यावी.
5) यानंतर पुरणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. तर पीठाचे अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा. त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
7) यानंतर पोळपाटावर थोडे कोरडे पीठ टाकून त्यावर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी.
8) पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवावी. तव्यावर पोळी भाजतेवेळी ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
९) पोळी तयार झाल्यानंतर ती लगेच डब्यात ठेवू नका. एका कागदावर अथवा पसरत ताटात काढून १-२ मिनिटे ठेवा म्हणजे आतली वाफ निवेल आणि पोळी लुसलुशीत होईल.
१०) साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी.
या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.
हे ही वाचा: उकडीचे मोदक