fbpx

दसरा सण मोठा…

दसरा सण मोठा

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे.

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. नवमीला नवरात्र उत्थापन आणि आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

पराक्रमाचा सण

दसरा हा पराक्रमाचा सण आहे. विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, अशीही आख्यायिका आढळून येते. अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शास्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत.

प्रथा आणि परंपरा

दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. विजयादशमी म्हणजे विजय मिळवून देणारा दिवस. त्यामुळे कुठलेही नवीन शुभ कार्य, मालमत्ता खरेदी, नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्याची प्रथा आहे. नवीन व्यापार किंवा प्रवासाची सुरवात विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. गावची सीमा लांघण्याच्या प्रथेला सीमोल्लंघन म्हंटले जाते. दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून देण्याची, लुटण्याची परंपराही भारतात आहे. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते.

प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.

सोने लुटण्याच्या प्रथेची गोष्ट

फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

दसरा, विजयादशमीचे महत्त्व

याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.

दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीचे पूजन करावयाचे. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पूजन करायचे, अशी प्रथा प्रचलित आहे.

सरस्वती पूजन

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.

शमीची पूजा करण्याचे कारण

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले, अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात.

भारतातील विविध प्रांतांतील दसरा

महाराष्ट्रात घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात. कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. तेथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.

आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.

म्हैसूरच्या संस्थानाचा विजयादशमी उत्सव पाहायला देश-विदेशातील पर्यटक भारतात येतात. चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

विजयादशमी तिथी आणि मुहूर्त

पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२१ पासून सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे उदय तिथीला आधार मानून दसरा केवळ ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्यामुळे रावणदहन ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्यास्तानंतर करावे. म्हणूनच आपल्याकडे दसरा किंवा विजयादशमीचा सण हा बुधवार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करावा. मात्र, नवरात्रानंतर करण्यात येणारे दुर्गा देवी विसर्जन ६ ऑक्टोबर रोजी करावे, असे सांगितले जाते.