fbpx

Chennai Super Kings on Chepauk: चेन्नईच्या पंढरीत भेटला विठ्ठल

Chennai Super Kings On Chepauk

Chennai Super Kings on Chepauk: महिंद्र सिंग धोनीला बॅटिंग करताना पाहणे आता केवळ त्याची बॅटिंग पाहण्याएवढं साधं राहिलं नाहीये. धोनी आधीच क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉरमॅट्स मधून निवृत्त झाला आहे. आयपीएल मध्ये तो चेन्नई टीम चे या हंगामातही नेतृत्व करीत आहे पण लवकरच तो त्यामधूनही निवृत्त होईल हे निश्चित आहे. धोनीच्या चाहत्यांना हे पुरेपूर माहीत आहे आणि त्यामुळे केवळ त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक स्टेडियममध्ये येत आहेत. धोनी कसा खेळेल, तो धावा करेल की लवकर बाद होईल, त्याची कामगिरी पूर्वीसारखी होईल की नाही ह्या गोष्टी आता चाहत्यांसाठी नगण्य आहेत. आता त्यांना फक्त धोनीला खेळताना पाहायचंय. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सची मॅच कुठेही असो धोनीचे चहाते तिथे गर्दी करत आहेत.

बॅटिंगला येणारा पुढचा फलंदाज जेव्हा महिंद्रासिंग धोनी असतो तेव्हा एक विचित्र स्थिती स्टेडियमवर दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जचे चाहते त्यांच्याच संघातील खेळाडूची विकेट गेली म्हणून आनंद साजरा करताना दिसत आहेत. धोनी बॅटिंगला येतोय ही बाब विकेट जाण्याच्या दुःखापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंददायी आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनी साजरी केली जडेजाची विकेट

20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्येला गती देण्याच्या प्रयत्नात सर जडेजा बाद झाला आणि चेन्नईच्या स्टेडिअमवर आनंदोत्सवाला सुरुवात झाली. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोघांनीही ट्रॉफी जिंकल्याप्रमाणे तो क्षण साजरा केला. एका संघाचे चहाते जडेजाच्या जाण्याचा आनंद साजरा करत होते, तर दुसरे माहीच्या मैदानावर येण्याचा आनंद साजरा करत होता. आनंदाच्या पट्टीवरमोजायचे झाल्यास माहीची 3 चेंडूची छोटी खेळी ही सामन्यातली सर्वात मोठी खेळी होती. जडेजा बाद झाल्यानंतर धोनी शांतपणे मैदानावर आला जणू काही घडलेच नव्हते. संपूर्ण स्टेडियम ‘माही माही’ चा गजर करीत होता. चाहते जल्लोष करत होते आणि पण धोनीच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. त्याच्यासाठी हे नेहमीचे होते पण चाहत्यांना जणू त्यांचा देव दिसला होता. बहुतेकांच्या चेहऱ्यावर ‘भेटला विठ्ठल माझा’ चा भाव होता. वारकऱ्यांच्या दिंडीचे आधुनिक चित्र मैदानावर दिसत होते. स्टेडिअमला चंद्रभागेच्या काठाचे स्वरूप आले होते. धोनीभक्त हातातले पिवळे झेंडे, बॅनर्स नाचवित होते, मुखाने ‘धोनी’नामाचा जप अखंड सुरु होता, ते बेभानपणे नाचत होते,जल्लोष करत होते.

क्रीजवर आलेला धोनीही विटेवर उभ्या असलेल्या विठू रायासारखा सारखा शांत भासत होता. त्याचे हात कटीवर नाही तर बॅटीवर होते इतकाच काय तो फरक होता. मैदानावर धोनीने फील्ड प्लेसमेंटकडे पाहिले, त्याचा गार्ड घेतला आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी तो तयार झाला. मार्क वुडने पहिला चेंडू 148.7kph वेगाने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. फटका खेळण्याची आयती संधी धोनीने सोडली नाही. त्याने थर्ड मॅनवर षटकार ठोकला. कर्णधाराने तिथे आयुष बडोनीला उभे केले होते पण चेंडू डोक्यावरून सीमापार जाताना कसा दिसतो हे पाहण्याशिवाय तो काहीच करू शकला नाही. चेंडू सीमापार झाला आणि प्रेक्षकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. क्षणार्धात स्टेडिअमचे रूपांतर स्वर्गात झाले जिथे प्रत्येकजण आनंदी होता, समाधानी होता आणि उत्सव साजरा करत होता. एक एक करीत मोबाईल फ्लॅशलाईट उजळू लागले आणि स्टेडियम एका मोठ्या दीपमाळेसारखा दिसू लागला. धोनीच्या एका फटक्याने चेपॉकचे रूपांतर ‘लख लख चंदेरी’ तेजाच्या साऱ्या दुनियेत झाले यावर मार्क वुड आणि कंपनीला विश्वास बसत नव्हता पण टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वर पाहणाऱ्यांच्या मनातही ‘कोटी कोटी ज्वाला’ झळाळल्या होत्या. स्टेडियमपेक्षा ते दृश्य खरंतर स्क्रीनवर ते जास्त सुंदर दिसत होते कारण प्रेक्षकांना ते 16 वेगवेगळ्या कॅमेरांतून काही ‘सुंदर’ चेहऱ्यांसह पाहायला मिळत होते.

हे ही वाचा : आयपीएल २०२३ चे वेळापत्रक

सलग षटकार

बाउन्स बॅक करण्याच्या इच्छेने, मार्क वुडने त्याचा पुढचा चेंडू टाकला. बाउन्सर टाकण्याच्या त्याने प्रयत्नात आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. धोनी पटकन पोझिशनमध्ये आला आणि त्याने स्क्वेअर लेगवरून फटका मारला. क्षणार्धात चेंडू स्टँडच्या दुसऱ्या मजल्यावर गेला जेव्हा धोनीची शक्ती वुडच्या वेगात मिसळली तर काय होते याचा प्रत्यय प्रेक्षकांना आला. थालाच्या दोन बॅक टू बॅक षटकारांनी त्यांचा दिवस चांगला झाला. मार्क वुड हा जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्या वेगाला सामोरे जाण्यासाठी तुमचे रिफ्लेक्सेस चांगले असण्याची गरज आहे. धोनीची रिफ्लेक्स अॅक्शन 20 वर्षांच्या क्रिकेटपटूसारखी होती.बाहेर गेलेला चेंडू मैदानात आणण्यासाठी एक मिनिट खेळ थांबवण्यात आला. ब्रॉडकास्टर्सचे आभारच मानायला हवेत की त्यांनी या वेळात जाहिराती दाखविल्या नाहीत. उलट धोनीचा तो शॉट आणि क्राउड रिअॅक्शन्स ते वेगवेगळ्या अँगलने रिप्ले करत राहिले. तो एक उंच षटकार होता आणि प्रत्येक कोनातून बघताना, शॉट किती सफाईदार आणि शक्तिशाली होता याची प्रचिती येत होती. एक क्रिकेटप्रेमी म्हणून धोनीचा तो फटका किती अवघड होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यात वुडसारखा वेगवान गोलंदाज बॉलिंग करतअसताना तो खेळणे अधिक कठीण होते पण चाळीशी पार केलेल्या धोनीने ते लीलया करून दाखविले होते केले.

5000 IPL धावा

आपण फार काही करू शकत नाही हे जाणून मार्कने परत धाव घेतली आणि तिसरा चेंडू 151.2kph वेगाने टाकला. धोनीने तो जोरदार स्लॅश केला परंतु तो पूर्णपणे चुकला आणि चेंडू डीप कव्हरवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईच्या दिशेने हवेत गेला. त्याने स्वत:ला नीट पोजिशन मध्ये आणले आणि सहजतेने झेल पकडला. अजिबात गडबड नाही. धोनीने हातमोजे काढले आणि उजव्या हाताखाली बॅट ठेवली आणि चालायला सुरुवात केली. अवघ्या 3 चेंडूत 12 धावा झाल्या. धोनी बाद झाला पण या छोट्याश्या खेळीत त्याने आयपीएलच्या ५००० धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर आणखी दोन चेंडू टाकले गेले आणि चेन्नई सुपर किंग्जने आणखी 2 धावा केल्या. पण चेपॉकमधील प्रेक्षक अजूनही महिंद्रसिंग धोनीच्या षटकारांचा आनंद साजरा करत होते.

चेपॉकच्या प्रेक्षकांनी त्यांच्या ‘थाला’साठी १४२६ दिवस वाट पाहिली आणि थालानेही त्यांना निराश केले नाही. चाहत्यांनी त्याची चेपॉकची स्टेडिअमवर आणि इंटरनेटवरही साजरी केली. जेव्हा तो फलंदाजी करत होता तेव्हा जिओ सिनेमाला 1.7 कोटींचा प्रेक्षक मिळाला. सोशल मीडियावरही धोनी ट्रेंड करीत होता. सगळीकडे फक्त माहीची जादू होती!