fbpx

Amrutatulya: अमृततुल्य!

Amrutatulya

Amrutatulya: हल्ली हा शब्द चहाच्या वर्णनासाठीच मुख्यत्वे वापरला जातो. अर्थात माझ्यासारख्या चहा प्रेमींना तो शब्द यथार्थच वाटेल परंतु तरीही माझ्या मते अमृत तुल्य म्हंटले की एकच पेय नजरेसमोर येते, ते म्हणजे उसाचा रस! गोड, मधुर, तृप्तीदायक असा उसाचा रस आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे. सतत पित्ताने त्रासलेल्या आणि त्यामुळे इच्छा असूनही चमचमीत पदार्थ खाऊ न शकणाऱ्या पित्त प्रकृती धारकांना तर उसाचा रस हा वरदान आहे.

मुळातच उसाचा रस पिण्यासाठी एक ठराविक माहोल तयार झालेला असतो. “चला आज आपण उसाचा रस प्यायला सगळेजण बाहेर जाऊया” असे प्लॅनिंग करून कधीच गुऱ्हाळ गाठले जात नाही. तर प्रवासात शिणल्यावर किंवा उन्हातान्हात बाजारहाट करताना बरीच खरेदी करून दमल्यावर क्षणभर ‘वाईच’ जरा दम खाऊन तिथेच टेकून कोरडा पडलेला घसा शांत करावा या विचाराने हाफ/ फुल / किंवा हल्ली जंबो ग्लास ची ऑर्डर दिली जाते. अगदी झट की पट मामला असतो बरं का ह्या गुऱ्हाळात. एकदम यू गये और यू आये टाईप!

गेलं, ऑर्डर दिली, कूपन दिलं-घेतलं की काही वेळात समोर निर्विकार चेहऱ्याचे तिथले दादा – भाऊ ग्लास समोर आणून ठेवतात. अगदी जन्मोजन्मीचे तहानलेले असल्यागत आपण ते घटाघट पितो. आधी एक फुल दोघांमध्ये बास या हिशोबाने घेतलेला एक फुल ग्लास रस दोघात मग कमी पडतो आणि पुन्हा एक ऑर्डर दिली जाते. रेंगाळले जात नाही की कधी कुठल्या रसवंती गृहात मोठमोठ्याने कोणी वाद घालतात, भांडणे करतायत असेही चित्र दिसत नाही. अहो गोड सुमधुर रस गळ्या पर्यंत प्यायल्यावर कोणाला तिथल्या तिथे आपसात कुठल्या गोष्टीवर वाद घालायचे आठवेल तरी का?

ठाण्यात एकच रसवंती गृह आधीपासून माहीत होतं, जिल्हा परिषदेजवळ, मामलेदार मिसळ भागात असलेले हे गुऱ्हाळ लहानपणी आईबरोबर बाजारात गेल्यावर सगळी कामे झाली की हमखास गाठले जायचे. पुढे कॉलेज मधून येतानाही ते रस्त्यात लागायचे आणि खिशालाही परवडायचे त्यामुळे जाणे व्हायचेच. पण त्याशिवाय माहित असणारी आणि स्वच्छतेच्या विश्वासाची ठिकाणे म्हणजे चरई मधले आणि स्टेशन जवळ कुलकर्णी वडापावच्या बाजूलाच असलेले कानिफनाथ रसवंती गृह. आणि अगदी अलीकडचे म्हणजे गडकरी रस्त्याच्या पुढे कॉर्नरलाच असलेले रसवंती गृह!

नाशिक, शिर्डी, कोल्हापूर भागात बरेचदा जाणे होते तिथेही प्रवासात हायवे नजिक असलेल्या रसवंती गृहात थांबून प्रवासाचा थकवा जाण्यासाठी रसाचा एक डोस घेतलाच जातो.

वाढत्या महागाईचा परिणाम इथल्या दरावर होणे स्वाभाविक आहे… म्हणजे ज्यांनी आधी अवघे पन्नास पैसे दर बघितले आहेत त्यांना वीस रुपये दर बघून अवाक व्हायलाच होते पण त्यामुळे काही रसाशी असलेले नाते तोडून परत पाऊली कोणी जात नाही हेही खरेच.

बदलत्या काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलतायत, काहींची लोकप्रियता आपोआप कमी होतेय तर काहींची ती होण्याच्या मार्गावर आहे. ज्यांची ती होऊ नये असे वाटते त्यापैकीच एक असे हे पेय. सर्रास फ्रुटी,माझाची बॉक्स किंवा बॉटल मधली आणि इतर शित पेय रिचवणाऱ्या चिल्ल्या पिल्याना बघून मुद्दाम यावर आवर्जून लिहावेसे वाटले.

आता हे वाचून,तुम्हालाही उसाच्या रसाची आठवण आली असणारच! कारण काही पदार्थ किंवा खाण्यापिण्याच्या जिन्नसामध्ये काही आठवणीही असतात, आणि आठवणी कधीच स्वस्त नसतात. त्यामुळेच असेल पण रसवंती गृह कधीच ओस पडलेले दिसत नाहीत आणि यातच सर्व आले. 🙏

शुभं भवतू!