fbpx

Shivpratap Din Sohla 2022: मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत साजरा होणार शिवप्रताप दिन सोहळा

Shivpratap Din Sohla 2022

Shivpratap Din Sohla 2022: अफझल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महराजांनी हिंदवी स्वराजाची मुहूर्त मेढ रोवली. या शिवरायांच्या पराक्रमानिमित्त दरवर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होतो. पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांचा व भवानी मातेचा जयजयकार करीत साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात शिवप्रेमी, प्रतिनिधी, प्रतापगड पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग असतो. हा सोहळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा केला जातो त्यामुळे दरवर्षी अनेक राजकीय नेत्यांचीही या सोहळ्याला उपस्थिती असते.

Shivpratap Din Sohla 2022: कार्यक्रमाचे स्वरूप

शिवप्रताप दिनाच्यानिमित्त दरवर्षी काही खास कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं ज्यात स्थानिकांचाही समावेश असतो. या वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे खेळ, ढोल-लेझीम पथके यांचा सहभाग, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, छत्रपतींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व छत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्प वृष्टी तसेच शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे गायन आदी भरगच्च कार्यक्रम हे दरवर्षीच्या येथील शिवप्रताप दिनाचे खास वैशिष्ट असते. पूर्वी हा सोहळा प्रतापगड उत्सव समिती व महाराष्ट्रातील विविध भागातील शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात साजरे करायचे. त्यानंतर गेल्या 10-12 वर्षांपासून आजतागायत शासनाच्या वतीने तो साजरा केला जातो.

हे ही वाचा: शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

Shivpratap Din Sohla 2022: मुख्यमंत्रांची उपस्थिती

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीलगतचे अवैध बांधकाम नुकतेच हटवून जमीनदोस्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवप्रतापदिन शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठय़ा उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या सोहळय़ासाठी प्रतापगडावर यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते प्रतापगडावर जरीकाठी भगवा फडकविण्यात येणार आहे. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्युत रोषणाई, लेझर शो, मशाल महोत्सव, आतषबाजी केली जाणार आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

शिवप्रताप दिन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. शिवप्रतापदिनी सकाळी भवानी मातेची पूजा, अभिषेक व आरती होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रमानंतर शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपुतळय़ास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे.

हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा कोथळा बाहेर काढत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा वध केला. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रतापगडावर तिथीनुसार शिवप्रतापदिन शासनाच्या वतीने साजरा केला जातो. यंदा तिथीनुसार तो ३० नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर साजरा होत आहे.