Super Star Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन
Superstar Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा मनोरंजन उद्योगातील प्रवास अनेक पिढ्यांमधील अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी आहे.
अमिताभ यांचा जन्म 1942 मध्ये अलाहाबाद येथे हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या तेजी बच्चन यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण नैनिताल येथे आणि दिल्ली विद्यापीठातील किरोरी माल महाविद्यालयात झाले. १९६९ मध्ये भुवन शोम या चित्रपटात आवाज निवेदक म्हणून त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. १९६९ मध्येच आलेल्या सात हिंदुस्थानी मधून त्यांनी मुख्य भूमिका केली आणि नायक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. पुढे मेहमूद ने त्यांना ‘बॉम्बे टू गोवा’ मध्ये भूमिका दिली आणि हा त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा “अँग्री यंग मॅन” म्हणून संबोधले गेले.
Amitabh Bachchan: अष्टपैलू व्यक्तिमत्व
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे केवळ एका अभिनेत्याचे नाव नाही, तर बहुमुखी प्रतिभा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अभिनय, शब्दफेक, उच्चार, देहबोली, मुद्राभिनय, समोरच्या अभिनेत्याला त्याच्या आविष्कारासाठी पुरेसा अवधी आणि संधी देणारे औदार्य यांचा तो दुर्मिळ मिलाफ आहे. चित्रपट अभिनयाव्यतिरिक्त आपण त्यांना अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) चे संस्थापक, चित्रपट निर्माते, पार्श्वगायक, ब्रँड अम्बॅसेडर, सूत्रसंचालक आणि माजी राजकारणी अशा अनेक भूमिकांतून पाहात आलो आहोत. सतत काहीतरी काम करीत राहण्याची धडपड, अभिनयाची कधीही न संपणारी भूक त्याच्यात वयाच्या ८० व्या वर्षीही कायम आहे.
अमिताभ यांनी आपल्या ५० वर्ष्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले आहेत. आपल्या कारकिर्दीत अमिताभ यांनी अनेक चुका केल्या, चुकीचे चित्रपट स्वीकारले, चुकीचे निर्णय घेतले, अमिताभ आता संपला असेही अनेकदा अनेकांना वाटले. पण दरवेळी अमिताभ त्या परिस्थितींवर मात करीत ‘बाऊन्स बॅक’ केले.
हे ही वाचा: पद्मश्री दुर्गा खोटे : Royal व्यक्तिमत्वाची आई
कठीण काळ
ज्यांची माहिती नाही त्यांच्यासाठी, 1999 मध्ये अमिताभ बच्चन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते. त्यांची कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ला मोथे नुकसान झाले होते आणि त्या कंपनीच्या अपयशामुळे अमिताभ कर्जात आकंठ बुडाले होते. तो काळ त्यांच्या जीवनातल्या सर्वात कठीण काळांपैकी होता. बिग बींनी त्यांच्या मुलाखती दरम्यान अनेकवेळा कठीण टप्प्याची आठवण करून दिली आहे. परिस्थिती इतकी वाईट होती की कर्जदार त्याच्या घरी यायचे आणि अपमान करून जायचे. त्या काळात अमिताभ यांनी अनेक तडजोडी केल्या. काढलेल्या कर्जाचे व्याज ही त्यांना भारत येत नव्हते इतकी परिस्थिती बिकट होती. पण अमिताभ झगडत राहिले, प्रयत्न करीत राहिले.
अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले. स्टार प्लस वर सुरु झालेल्या त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) मधून त्यांनी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यांच्या अनोख्या सूत्र संचालनामुळे या कार्यक्रमाला घवघवीत यश मिळाले. त्याच दरम्यान त्यांचे मित्र यश चोप्रा यांनी त्यांना मोहब्बतें मध्ये एक भूमिका दिली. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिस वर तुफान यश मिळाले आणि अमिताभ यांचे दिवस बदलले.
कारकिर्दीचा सुवर्णकाळ
१९७३ ते १९८३ हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कारकिर्दीतला सुवर्णकाळ होता. ‘जंजीर’ने सुरू झालेल्या प्रवासात ‘अभिमान’, ‘नमक हराम’, ‘कभी कभी’, ‘शोले’, ‘कस्मे वादे’, ‘चुपके चुपके’ , ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘नसीब’, ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘शक्ती’ असे अनेक सुपर हिट चित्रपट दिले. प्रेक्षक फक्त अमिताभ यांना पाहायला, त्यांचे डायलॉग्स ऐकायला थिएटर मध्ये येत. एखाद्या शोची तिकिटे मिळाली नाहीत तर पुढच्या शो साठी रांगेत उभे राहण्याचीही त्यांची तयारी असे.
‘कुली’च्या सेट वर झालेला अपघात
अमिताभ यांच्या यशस्वी घोडदौडीला २६ जुलै १९८२ रोजी ‘कुली’च्या सेटवर झालेल्या अपघाताने पहिला अर्धविराम आला. एखाद्या अभिनेत्याला यश-लोकप्रियता मिळणे आणि प्रेक्षकांना त्याच्याबद्दल आपलेपणा वाटणे, यातला फरक या अपघाताने ठळकपणे स्पष्ट केला. घराघरांत लोक अमिताभला आराम पडावा, या दुखापतीमधून तो सहीसलामत बाहेर यावा म्हणून प्रार्थना करत होते. ही लाट एवढी प्रचंड होती की पुढे ‘कुली’च्या पटकथेत अमिताभच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू दाखवला होता, त्यात बदल करून त्याला जिवंत ठेवण्यात आले. या अफाट लोकप्रियतेचा हा प्रत्यय त्यांना राजकारणात घेऊन गेला. अमिताभ खासदार म्हणून निवडून आले आणि पुढे राजकारणात भरकटत गेले. हा आपला प्रांत नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या अनुभवातून शहाणे होऊन ते अभिनय क्षेत्रात परतले ते कायमचेच.
दुसरी इनिंग
यानंतर नायक म्हणून त्यांच्या कारकीर्दीचा दुसरा बहर सुरू झाला. त्यात ‘अग्निपथ’, ‘मैं आझाद हूँ’ सारखे काही बरे आणि ‘मृत्युदाता’, ‘लाल बादशाह’सारखे भंपक चित्रपट करून झाल्यावर त्यांनी ‘मोहब्बतें’मधून चरित्रभूमिकांकडे मोहरा वळवला. अमिताभ चरित्र भूमिका करू लागल्यानंतर लेखकांच्या कल्पकतेला पंख फुटले. एखाद्या अभिनेत्याच्या अस्तित्वाने संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच आशयदृष्ट्या नवे वळण कसे लागू शकते, याचे हे उदारहरण आहे. रूढ नायकाच्या चौकटीत बसणार नाहीत अशा व्यक्तिरेखा, कथानके आणि तरीही किमान ‘पहिल्या चार दिवसांच्या गर्दीची हमी’ असे समीकरण तोवर व्यावसायिक चित्रपटांत दिसले नव्हते. हा सिलसिला आजही सुरू आहे आणि यशस्वी-अयशस्वी प्रयोगांसह, दिवसेंदिवस अधिकच फुलतो आहे.
आजही अमिताभ यांना डोळ्यांपुढे ठेवून लेखक पटकथा लिहित आहेत आणि हाती आलेली पटकथा वाचून होताच अनेक नव्या दिग्दर्शकांनाही आधी अमिताभची आठवण होते आहे. वयाच्या ८० व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना एखादी पटकथा वाचायला द्यायची म्हटले तर त्याच्या कार्यालयाने ती वाचण्यासाठी स्वीकारल्यानंतर किमान सहा महिने तरी थांबावे लागते.
नुकतेच त्यांचे गुडबाय आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट पारदर्शीत झाले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे द इंटर्न, उंचाई आणि प्रोजेक्ट के चा हिंदी रिमेक या असे काही चित्रपट आहेत.
अशा या महानायकाची कारकीर्द आजही फुलताना बहरताना आपण बघत आहोत हे प्रेक्षक म्हणून आपले भाग्यच आहे. आज अमिताभ ८० वर्षाचे झाले. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
हॅपी बर्थ डे बच्चन साहेब!