fbpx

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणाल बोरसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त.’

एकदा भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. तेथील एकएक वास्तू निरखत मी नव्या दिल्लीचे रस्त्यावरून हिंडत होतो. राष्ट्रपती भवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तू वरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्षून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा आहे, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आपला राष्ट्रध्वज मला आगळावेगळाच भासत होता. त्याच्याकडे पाहत असतानाच मला असं वाटू लागले की, जणू काही राष्ट्रध्वज माझ्याशी बोलत आहे. त्या विचारतच मी बागेत बसलो. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा फडकत होता.

मी एकटक त्याच्याकडे पाहत होतो. मला जणू तो सांगत होता, “तू माझ्याकडे एवढ्या आदराने पाहतोस. त्याचं कारण तुला माहित आहे का?” राष्ट्रध्वज मला विचारत होता, ” मी तुझ्या राष्ट्राचे प्रतीक आहे. मी म्हणजे भारत. मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान ठरतो. माझ्यामागे माझा उज्वल इतिहास आहे. माझे आजचे हे रूप आजचे हे स्थान मिळवण्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले. माझ्या शूर सुपुत्रांची साथ मला सदैव लाभली.”

“1857 पासूनच भारतीयांनी आपल्या गुलामाची जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालवला होता. परक्या इंग्रजीच्या बलाढ्य शक्तीला ते टक्कर देत होते. माझा जन्म झाला 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीमध्ये झाला. या दिवशी मादाम कामा या राष्ट्रभक्त महिलेने समाजवादाच्या जागतिक परिषदेत भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझी निर्मिती केली. ते माझे पहिले रूप! तेव्हा माझा रंग हिरवा होता आणि चारही बाजूने बारीक सोनेरी पट्टी होती. पुढे प्रत्येक स्वातंत्र आंदोलनात माझी उपस्थिती होतीच. माझ्या वीरांनी रक्त सांडण्याची स्फूर्ती मिळावी म्हणून मी माझ्या अंगावरील सोनेरी पट्टीचा रंग हा केशरी केला. माझ्या रूपात वेळोवेळी बदल होत गेले. हिरव्या व केशरी रंगांमध्ये पांढरी पट्टी आली आणि तर कधी माझ्यावर ‘वंदे मातरम’ ही अक्षरे आली. तर कधी सूर्य,चंद्र, कधी कमळ. 1920 नंतर मी तिरंगा बनलो व स्वदेश प्रेमाचे प्रतीक असा चरखा माझ्यावर आला. स्वातंत्र्योत्तर काळात मी ‘राष्ट्रध्वज’ बनलो, तेव्हा माझ्या अंगावर अशोकाचे हे निळे चक्र आले. मला फक्त खादीच्याच कापडाचा वापर करून बनवले जाते. खादी हे हाताने बनवलेला कापड आहे. ज्याची सुरुवात महात्मा गांधींनी केली होती.”

“माझा केशरी रंग देशभक्ती आणि त्याग याचे प्रतीक आहे तर माझा पांढरा रंग आमची शांतताप्रियता आणि मांगल्य सुचित करतो; आणि हिरवा रंग आमच्या धनधान्याच्या समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सुचित करतो की, ‘हे राज्य धर्म, नीती आणि प्रगती यांच्या पथावर सदैव राहील’ हे युवका, समजलं ना माझ्या संदेश? आता तुमच्या नव्या पिढीवर फार मोठी जबाबदारी आहे. कसली माहिती आहे? माझी शान टिकवण्याची.”

“अरे मित्रा, आजवर माझ्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात हातावर लाठ्या बसल्या, बंदुकीच्या गोळ्या लागल्या तरी त्यांनी मला कधीही खाली पडू दिले नाही. स्वातंत्र्यसैनिक देशासाठी हसत हसत फासावर चढले तेही मला हातात घेऊन. काहीजणांनी सरकारी कचेरीवरील ‘युनियन जॅक’ काढून तेथे मला फडकवण्यासाठी सहा सहा महिन्यांची सजा भोगली. ते सारे रोमांचकारक क्षण आजही डोळ्यांसमोर आहेत. हे सुपुत्र जेव्हा माझ्या रक्षणासाठी बलिदान करतात तेव्हा मी दुःखी अंत:करणाने माझ्या उच्च स्थानावरून खाली येतो.”

“1947 साली 14 ऑगस्ट च्या रात्री व 15 ऑगस्ट च्या पहाटे मी जेव्हा ध्वज स्तंभावर चढत होतो, तेव्हा कोट्यावधी डोळे माझ्याकडे लागले होते. तेव्हापासून माझे सुपुत्रांनी माझी शान राखली आहे. रणांगणावर जसा मी फडकलो, तसाच क्रीडांगणावरही विजयी पताका फडकवीत राहिलो. हिमालयाच्या शिखरावरही शोभलो. परदेशातही मला आत मानाचे स्थान आहे; कारण मी एका स्वातंत्र्य देशाचा राष्ट्रध्वज आहे.”

“मुला, तू एवढ्या अभिमानाने माझ्याकडे पाहतोस म्हणूनच मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलत आहे. नाहीतर आजचा युवक आपल्या स्वतःच एवढा गुरफटलेला असतो की त्याचे माझ्याकडे लक्षही जात नाही. पण लक्षात ठेवा, माझा सन्मान म्हणजे तुमच्या राष्ट्राचा सन्मान म्हणजेच पर्यायाने तुमचाच सन्मान आहे.” पाहता पाहता आवाज बंद झाला; मी मात्र त्या राष्ट्रपतीभवनावरचा ध्वज डौलाने फडकत असलेला पाहून सुखावत होतो.

– कुणाल बोरसे

ठाणे