Vaalvi Marathi Movie: वेड लावणारा ‘वाळवी’

Ved Lavnaara Vaalvi

Vaalvi Marathi Movie: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वेगवेगळ्या भाषेतले १३-१४ चित्रपट भारतभर प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिस वर ‘दृश्यम २’ ची जादू कायम असताना, रितेश जेनेलियाचा ‘वेड’ सर्वांना वेड लावत असताना तीन हिंदी चित्रपटांसहित अनेक प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षक विभागले गेले. त्यात दक्षिण भारतीय सिनेमा वरीसू, थिनुवू , वॉल्टर वरैया, वीरा सिम्हा रेड्डी सारखे ‘मोस्ट अवेटेड’ सिनेमे घेऊन आला. हॉलिवूडही Planes सारखा ॲक्शनपट घेऊन प्रेक्षक मिळवायच्या शर्यतीत उतरला. इतक्या चित्रपटांच्या गर्दीत परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा मराठी थ्रिलर (Vaalvi Marathi Movie) चित्रपटही रिलीज झाला आणि समीक्षकांची वाहवा मिळून देखील प्रेक्षकांची वाटच पहात राहिला.

Vaalvi Marathi Movie: ‘झी स्टुडिओज’ची निर्मिती

‘झी स्टुडिओज’ची निर्मिती असतानाही या चित्रपटाची म्हणावी तशी प्रसिद्धी झाली नाही. काही टीव्ही शोज आणि युट्यूब चॅनल्स वगळता चित्रपटाची फारशी प्रसिद्धी केली गेली नाही. जे रितेशने ‘वेड’ साठी केले ते ‘वाळवी’ साठीही होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. इतका चांगला चित्रपट केवळ प्रेक्षक न मिळाल्याने डब्यात जाणार असे वाटत होते.

केवळ चांगली स्टारकास्ट आणि परेश मोकशीवरचा विश्वास म्हणून प्रेक्षक सिनेमागृहात गेले आणि परेशने त्यांना निराश केले नाही. चित्रपट सिनेमागृहातून बाहेर येणारा प्रत्येकजण ‘आपण हे काय पाहिले’ अश्या मुद्रेने बाहेर पडताना दिसत होता. सिनेमागृहातून बाहेर येऊनही क्लायमॅक्सच्या धक्क्यातून बाहेर येत नव्हता. या आधी त्यांची अशी अवस्था ‘सैराट’ पाहिल्यानंतर झाली होती. मधुगांधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या जोडप्याने कीटक जातीतल्या “वाळवी’ ला सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिलं.

हे ही वाचा: ‘पठाण’ अवतार

Vaalvi Marathi Movie: चित्रपटाचा खरा हिरो दिग्दर्शक

चित्रपटात गाणी नाहीत, पात्रांचा परिचय, कथेची प्रस्तावना वगैरे औपचारीकताही नाहीत. चित्रपट सुरू होतो आणि थेट मूळ मुद्द्याला हात घालतो. सुरुवात चुकवणे किंवा पॉपकॉर्न – लू ब्रेक्स साठी खुर्ची सोडणे असं काहीही करायला वाव नाही. पुढे काय होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही आणि तसा प्रयत्न करण्याइतकाही वेळ नाही. चित्रपट सुसाट धावतो आणि धक्यांमागून धक्के देत रहातो. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते या सगळ्यांनीच आपापल्या चौकटी मोडत वेगळ्या भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांचा अभिनय अप्रतिम आहेच पण चित्रपटाचा खरा हिरो परेश मोकाशी आहे. त्याचं दिग्दर्शन आणि धक्कातंत्र या साध्या थ्रिलर कथानकाला ‘कल्ट’ चित्रपटांच्या रांगेत नेवून बसवतं. आणि चित्रपटाची नायिका आहे ‘वाळवी’. ती कशी हे पहाण्यासाठी आपण चित्रपटगृहात नक्की जायला हवं.

केवळ माऊथ पब्लसिटीच्या ताकदीवर हा चित्रपट प्रेक्षक खेचू लागला. सध्या सोशल मीडियावर, कॉलेज कट्ट्यांवर, रेल्वे प्रवासात ‘वाळवी’च्याच चर्चा होत आहेत. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते इतरांना तो recommend करीत आहेत आणि प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतो आहे. पण हे सुखद चित्र फार काळ टिकेल असं वाटत नाही. पुढच्या आठड्यात येणाऱ्या ‘पठान’ ने ॲडवांस बुकिंग मध्ये दम दाखविला आहे. त्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांना लागलेली ही ‘वाळवी’ आठवडाभरात नाहीशी होईल अशी भीती आहे.

हे ही वाचा: ‘बापमाणूस’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मराठी प्रेक्षकांनी या चांगल्या कलाकृतीला उदंड प्रतिसाद द्यावा. नवीन चित्रपट बघण्याचा विचार असेल आणि अजून पाहिला नसेल तर पठान ऐवजी नक्की पहा आपला मराठमोळा थ्रिलर… वाळवी.