fbpx

Jagadamba Talwar: शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

Jagadamba Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार (Jagadamba Talwar) ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. “२०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यादृष्टीने सांस्कृतीक मंत्रालयाकडून मोठा आराखडा तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमापर्यंत जगदंबा तलवार ब्रिटनने दिली, तर हा आनंदोत्सव आणखी उत्साहात साजरा होईल”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जगातील सर्व संपत्ती पेक्षा ही तलावर अमूल्य असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रिन्स ऑफ वेल्स यांना दिली भेट

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही इतिहासाची साक्षिदार आहे. शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी एक असलेली ‘जगदंबा’ तलवार करवीरच्या छत्रपती घराण्याकडे होती. ही तलवार सध्या इंग्लडच्या राणीच्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. १८७५-७६ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवे एडवर्ड) भारतभेटीवर आले होते. त्यावेळी कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) राज्य करत होते. यावेळी एडवर्ड यांना ही तलवार भेट म्हणून देण्यात आली होती. ही तलवार पुन्हा भारतात यावी, अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “ब्रिटनमध्ये असलेली तलवार आणि उदयनराजे भोसलेंकडे असलेली तलावर, या दोन्ही तलवारी महत्त्वाच्या आहेत. इंग्रजांनी जे जे आपल्याकडून नेले, ते आणण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा: ५० खोके घेतल्याच्या आरोपाविरोधात मानहानीचा दावा, शिंदे गटाचा मोठा निर्णय!

Jagadamba Talwar: कशी आहे ‘जगदंबा’ तलवार?

जगदंबा तलवार जुनी युरोपियन एकपाती, सरळ तलावर आहे. या तलवारीच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून एकामध्ये IHS असं तीन वेळा कोरलंय. तलवारीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे. मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत.

मराठी अस्मितेचा मानबिंदू

जगदंबा तलवार (Jagadamba Talwar) देशात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले होते. मात्र त्याला यश आलं नाही. दीडशे वर्षांच्या राजवटीत ब्रिटिशांनी भारतातल्या अनेक ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेल्या. यातल्या काही भेट म्हणून दिल्या गेल्या होत्या तर काही चक्क लुटून नेल्या होत्या. यामध्ये मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शिवरायांची जगदंबा तलवार सर्वात अनमोल आहे. ही तलवार जर महाराष्ट्रात परत आली तर ती ख-या अर्थानं महाराजांना आदरांजली ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *