कटाची आमटी
घरी पुरण घातलं आहे आणि कटाची आमटी (Katachi Aamti) बनली नाही असं कुठल्याही महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात सहसा होत नाही. डाळ शिजवल्यानंतर त्यात असलेले पाणी वेगळे काढले जाते ज्याला ‘कट’ असे म्हणतात. या कटाची आमटी कशी करायची ते आज आपण पहाणार आहोत.
साहित्य:
- चणा शिजवलेली चणा डाळ (पुरणपोळीचे पाणी गाळताना उरलेली)
- कांदा- खोबऱ्याचे वाटण
- आलं-लसूण पेस्ट
- कडिपत्ता
- लाल तिखट
- गरम मसाला
- तेल
- मीठ
- गूळ (आवडत असल्यास)
कृती:
- पुरणपोळी (Puran Poli) साठी ज्यावेळी आपण डाळ शिजवायला घेतो. त्याचे पाणी आणि चणा डाळ ही खास कटाच्या आमटीसाठी काढली जाते. तुम्ही नुसती चणाडाळही शिजवून घेऊ शकता. पण असे करताना तुम्ही त्यातले पाणी काढून टाकू नका. ते पाणीच याची चव वाढवते.
- कांदा- खोबऱ्याचे वाटप करणे हे फार सोपे असते. जर तुम्हाला हे वाटप येत नसेल तर तुम्ही साधारण चार जणांसाठी 1 ते 1 ½ वाटी खोबरे घ्या. आणि त्याच्या निम्मे कांदा. तव्यावर तेल गरम करुन त्यावर उभा चिरलेला कांदा परतून घ्या.
- त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट किंवा अख्खे आलं-लसूण घाला. त्यामध्ये खोबरं घालून ते छान परतून घ्या. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. आमटीसाठी हे कायम बारीक वाटून घेणे फारच गरजेचे असते.
- तयार मिश्रणात तुम्ही आधीच लाल तिखट घातले नसेल तर ते तुम्ही नंतर घातले तरी चालू शकेल. आता आमटी करण्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये कडिपत्त्याची फोडणी घाला. आता तयार केलेले कांदा- खोबऱ्याचे वाटप घाला. ते छान परतून घ्या. आता त्यामध्ये शिजलेली चणा डाळ घाला. आता आमटी किती पातळ हवी त्यानुसार त्यात पाणी घाला.
- एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट गरजेनुसार घालून घ्या. त्यामध्ये मीठ घालून छान उकळून घ्या.
- आवडत असल्यास थोडा गूळ घाला
- वर कोथिंबीर भुरभुरा तुमची कटाची आमटी तयार होईल.