fbpx

Hirvya Suktanchya Pradeshat: हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात – पुस्तक परीक्षण

Hirvya Suktanchya Pradeshat

Hirvya Suktanchya Pradeshat: काही पुस्तके त्यांच्या शीर्षकांनीच औत्सुक्य निर्माण करतात. ही नावीन्यपूर्ण शीर्षके ती पुस्तके कथा संग्रह आहेत, कादंबरी आहे की काव्य संग्रह याबद्दल कमालीचे कुतूहल निर्माण करणारी असतात. आणि म्हणूनच ती लक्षवेधी ठरतात. मुळात कोणत्याही प्रकारचे लेखन हे त्या लेखकाची कल्पनाशक्ती, वैचारिक परिसीमा, सद्सद्विवेक बुध्दी, सामाजिक जाणिवा, संवेदनशीलता स्पष्ट करत असते. एकूणच लेखनात दिसून येत असलेली प्रगल्भता हे त्या लेखकाचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करणारी असते असे मला वाटते.

साहित्याचा समृद्ध वारसा

आपली मराठी भाषा ही भारतातल्या काही प्राचीन भाषांपैकी एक आहे. शतकानुशतके समृद्ध होत आलेल्या ह्या भाषेला साहित्याचा एक समृद्ध वारसा लाभला आहे. अनेक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रं कवितासंग्रह ह्यांनी आपली साहित्य संस्कृती नटली आहे. रामदास स्वामींपासून पु. ल.- व.पु. पर्यंत आणि ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांपासून अगदी आजच्या संदिप कुलकर्णी, गुरू ठाकूर पर्यंत प्रत्येकानं त्यांच्या अनेक दर्जेदार लिखाणांनी ती श्रीमंत केली आहे. चोखंदळ मराठी वाचकांनी त्याला नेहमीच उस्फूर्त दाद दिली आहे. आजही आपल्यापैकी अनेकांकडे स्वत: चा पुस्तक संग्रह असतो. त्यातील आवडत्या पुस्तकांची आपण अनेकदा पारायणं देखील करतो. बऱ्याच कविता, अभंग ओव्या आपल्याला अगदी तोंडपाठ असतात. चांगल्या साहित्याचा आनंद घेणं, ते जपणं, वाढवणं हे आपण मराठी माणसं पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत. आपलं हे साहित्य प्रेम आजच्या स्मार्टफोन संस्कृतीतही कमी झालेलं नाहीये. उलट epub, PDF, Kindle अशा अनेक नव्या रुपात मराठी साहित्य प्रत्येक हातात पोहोचू लागलं आहे आणि त्याचं संवर्धन आणि संग्रह करणे आता अजून सोपं झालं आहे.

अशीच परिपक्व लेखनशैली असलेले प्रगल्भ धाटणीचे पुस्तक नुकतेच हातात आले. कवयित्री संजीवनी बोकील लिखित अतिशय संवेदनशील आणि वैचारिक कवितांचा संग्रह असलेल्या ह्या काव्य संग्रहाचे नाव आहे – ‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात ‘! (Hirvya Suktanchya Pradeshat)

हे ही वाचा: पर्जन्यसरींच्या साक्षीने शब्दसरींचे प्रकाशन

Hirvya Suktanchya Pradeshat: कशी आहे पुस्तक बांधणी

सदैव उत्तमोत्तम साहित्यकृती देणाऱ्या पुणे येथील ‘सौर प्रकाशन’ संस्थेतर्फे प्रकाशित झालेला हा काव्यसंग्रह 24 मार्च 2022 रोजी वाचकांच्या भेटीला हजर झाला आणि अल्पकाळातच काव्यप्रेमींची दाद मिळवण्याचा मानकरी ठरला. ह्या संग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे श्री विराज गपचुप यांनी रेखाटली आहेत तर मांडणी आणि सजावटीची धुरा श्री साईप्रसाद पड्याळ यांनी सांभाळली आहे. प्रतिमा ऑफसेट तर्फे मुद्रित झालेल्या ह्या काव्य संग्रहातील अप्रतिम सुलेखन साक्षी कुलकर्णी यांनी केले आहे.

एक सर्वांगसुंदर, बहारदार पुस्तक वाचकांच्या भेटीला आणताना लेखकाबरोबरच मुद्रक, प्रकाशक, सुलेखक, मुखपृष्ठकार या सर्वच श्रेष्ठींचा मोलाचा वाटा असतो त्यामुळे त्यांचा इथे सन्माननीय नामोल्लेख करत आहे.

‘वाहवा’ मिळवणारी अर्पण पत्रिका

‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’ (Hirvya Suktanchya Pradeshat) हा काव्यसंग्रह वाचकांच्या संग्रही का असावा याची माझ्या मते अनेक कारणे आहेत. अगदी पुस्तकाच्या अर्पण पत्रिका पानापासून सुरुवात करायची तर जेमतेम एका ओळीचे हे अर्पण पत्र वाचकांची ‘ वाहवा ‘ मिळवते.

या अर्पण पत्रिकेत कवयित्री लिहितात की,

माझी कोवळी पाने
सनय आणि स्वप्नाला…
ज्यांनी मला जगण्यासाठीचा
शुद्ध, हिरवा
प्राणवायू पुरवला….

समृद्ध विचारसरणीच्या द्योतक कविता

‘हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात’ (Hirvya Suktanchya Pradeshat) या काव्यसंग्रहात समाविष्ट केलेल्या कविता ह्या कवयित्री संजीवनी बोकील यांच्या उच्च आणि समृद्ध विचारसरणीच्या द्योतक आहेत. धीरगंभीर असे अनेक भावाविष्कर ह्या कविता संग्रहात तुम्हाला वाचायला मिळतील.

काही विशेष उल्लेखनीय कवितांचा मी आवर्जून येथे उल्लेख करते जेणेकरून काव्यसंग्रह हाती येताच तुम्ही त्या कविता आवर्जून वाचाल अशी मला खात्री आहे.

अव्यक्ताची वादळे ही सुलेखांकीत पहिलीच कविता! या कवितेत कवयित्री लिहितात,

अव्यक्ताची वादळे
शिरतील आता
हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात
घुमतील घोष…

मनुष्याच्या मनात कितीतरी वादळे दडलेली असतात. अनेक भावभावनांची, मानापमानाची ही वादळे, ही घुसमट मनातून व्यक्त होण्यासाठी आतुरही असते पण तत्क्षणी स्वतः भोवतीचे अंतर्मुखतेचे कवच अबाधित राहण्यासाठी सावधही असते. ह्याच मानसिक विचारांच्या आंदोलनांचे शब्दांकन या कवितेत कवयित्रिने केले आहे.

गळ्यापर्यंत बुडून
जीवाने आकांत केला
तेव्हा कवितेचा चर खोदला
भळभळ वाहून गेलं
गढूळ पाणी
मागे उरली मऊ माती…

व्यक्त होणे, संवाद साधणे ही मनुष्याची भावनिक गरज आहे. आणि म्हणूनच जे गद्यातून व्यक्त केले जाऊ शकत नाही, भाष्य केले जाऊ शकत नाही ते कवितेतून तितक्याच सहजरीत्या मांडले जाऊ शकते. आपले मर्म,आपली सल कवितेतून व्यक्त केल्यावर मन हलके होते,जगण्यास पुन्हा नवीन उमेद मिळते हे या कवितेतून सांगितले आहे.

हे दयानिधे
अनंता उदारा
त्रैलोक्यदीपा दावी किनारा
जीर्ण नाव माझी
भवसागर भवती

ही प्रार्थना ही भगवंताच्या आळवणीने मन कृतार्थ करणारी आहे.

निसर्ग आणि मन याचे नाते फार जवळचे आहे.
मनाला प्रफुल्लित किंवा उदासीन करण्याचे सामर्थ्य निसर्गाकडे असते. म्हणूनच प्रत्येक कवी, कवयित्रीच्या लेखणीतून पाऊस या विषयावर लिहिले गेले आहे.

याही काव्य संग्रहात आपल्याला याविषयीची कविता वाचायला मिळते…,

दूर डोंगरात
पाऊस कोसळे
कशासाठी डोळे
भरतात!

कोणते काहूर
दाटून गळ्याशी उभी दारापाशी
तिन्हीसांज!

संग्रहातील प्रत्येक कविताच आवर्जून उल्लेख करावा अशी आहे. पण कवितेबरोबरच त्या सर्व कवितांचे शीर्षक अतिशय विचारपूर्वक आणि कलात्मकतेने लिहिले गेल्याने उल्लेखनीय झाले आहेत.

उदाहरण द्यायचे झाले तर,

बेटावर एकांताच्या सळसळले
जे पाण्यावरती लिहिले
वेड्या मनाचं अथांग राज्य
मौनाच्या पडद्यापाशी
बसस्टॉपवरचे गलबत
वाहत्या पाण्यावरच्या फेसफुलांना
आकाशमोगरी खाली
चिंब ओलेत्या वेलीला

या सर्व कविता त्यांच्या नावीन्यपुर्ण शिर्षकासह वाचनीय झाल्या आहेत.

बोकील यांच्या लेखनाचे कौतुक

लेखिका कवयित्री संजीवनी बोकील यांच्या लेखनाचे कौतुक करत कवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, संजीवनी मराठे आणि सुधीर मोघे अशा अनेक रथी महारथी यांनी केले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच या शुभेच्छापत्रांना मानाचे स्थान देऊन सकारात्मक आणि प्रेरणादायी शब्दांनी संग्रहाची सुरुवात लेखिकेने केली आहे.

काही पुस्तके ही वाचनालयात, प्रदर्शनात, एकमेकांना भेट देण्यास अगदी समर्पक अशी असतात तसेच ‘ हिरव्या सूक्तांच्या प्रदेशात ‘ (Hirvya Suktanchya Pradeshat) हे पुस्तक देखील आहे. पण त्याही पेक्षा , महाविद्यालयीन मराठी अभ्यासक्रमात हे जरूर अंतर्भूत असावे जेणेकरून आधुनिक मराठी वाङमयाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वाचता आणून अभ्यासता येईल आणि आजच्या काळात, आजच्या आव्हानांना शब्दांकित करणारी नव कविता कशी आहे हे नवीन पिढीला कळेल. सर्व ऑनलाइन माध्यमात आणि जवळच्या पुस्तक दालनात हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. सर्व वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

लेखिका कवयित्री संजीवनी बोकील यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!