fbpx

Dry Fruits For Diabetics: ‘हा’ सुका मेवा ठरतो मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान? मधुमेहामध्ये कोणते ड्रायफ्रुट्स खावेत?

Dry Fruits For Diabetics

Dry Fruits For Diabetics | मधुमेहामध्ये कोणते ड्रायफ्रुट्स खावेत?: मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये आहार खूप महत्वाची भूमिका बजावतो. तुमचा आहार मधुमेहाचा धोका कमी करू शकतो. ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांना आहाराबद्दल अधिक सजग असावे लागते. योग्य आहार तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करू शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सकस आहार घेतल्यास शारीरिक दुर्बलता कमी होऊ शकते.

दररोज सुक्या मेव्याचे सेवन करणे आवश्यक

जे पदार्थ इतर वेळीस शरीराला पोषक असतात तेच पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांना मात्र जीवघेणे ठरू शकतात. सुका मेवा हे याचं मुख्य उदाहरण आहे. सुक्या मेव्यात असे अनेक पोषक सत्व असतात ज्यामुळे शरीराला दैनंदिन ऊर्जा मिळते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज सुका मेवा खाणे आवश्यक आहे. मात्र, मधुमेहामध्ये सुका मेवा अतिशय विचारपूर्वक खावा. असे अनेक ड्रायफ्रुट्स आहेत जे मधुमेहाच्या रुग्णाने खाणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला मधुमेहाचे रुग्ण कोणते ड्रायफ्रूट्स खाऊ शकतात ते सांगत आहोत.

मधुमेहामध्ये कोणते ड्रायफ्रुट्स खावेत?

  1. बदाम- मधुमेह असो किंवा इतर कोणताही आजार, बदाम प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. मधुमेहाचे रुग्णही रोज बदाम खाऊ शकतात. यामुळे शरीरात इन्सुलिन निर्मितीची प्रक्रिया वेगवान होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेही रुग्ण रोज ७-८ भिजवलेले बदाम खाऊ शकतात.
  2. अक्रोड- व्हिटॅमिन ई भरपूर असलेले अक्रोड मधुमेहामध्ये खाणे चांगले आहे. अक्रोडापासून शरीराला भरपूर फायबर मिळतं. त्यात खूप कमी कॅलरीज असतात. अक्रोड शरीरातील रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. मूठभर अक्रोड खाल्ल्याने टाइप २ प्रकारच्या मधुमेहाचा धोका कमी होतो.
  3. पिस्ता- पिस्ता खायला खूप चविष्ट असतात. भाजलेले पिस्ते चवीला खारट असतात आणि मधुमेही रुग्णही ते खाऊ शकतात. पिस्ता खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. पिस्त्यात व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे शरीराला निरोगी बनवण्यास मदत करते.
  4. काजू- काजू जितका चविष्ट आहे तितकाच फायदेशीर आहे. दररोज मर्यादित प्रमाणात काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. काजूच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. मधुमेहामध्ये काजू खाऊ शकतो.

मधुमेहामध्ये कोणता सुका मेवा खाऊ नये?

मधुमेहाच्या रुग्णाने मनुका खाऊ नये. तुम्ही १-२ मनुके खाऊ शकता, पण जास्त खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहामध्ये अंजीरही खाणे टाळावे. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी खजूर खाऊ नये. हे ड्रायफ्रुट्स गोड असतात, ज्याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखर वाढू शकते.